भले आता, आमच्यासारख्या मंडळींच्या (ज्यात, प्रामुख्याने डावी मंडळी व काँग्रेसचे अध्वर्यू राहुल गांधी आले) दबावामुळे व त्यात भरडून निघणाऱ्या शस्त्रसज्ज तरुणाईमधील प्रचंड असंतोषामुळे, ‘अग्निपथावरील अग्निवीरां’च्या लष्करी-गुलामगिरीच्या योजनेत केंद्र सरकारला सुधारणा करावी लागली असली; तरी, मजा बघा की, ज्या सातारा जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुळातले आहेत, त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातूनच मोठ्याप्रमाणावर तरुणवर्ग सैन्यात भरती होतो ना; मग, ‘अग्निपथातल्या अग्निवीरां’च्या गुलामगिरीबद्दल ब्र तरी काढण्याची हिंमत झाली का कधि त्यांची? अहो, मग ‘दिल्लीश्वर’ नाराज नाही का होणार??
बरं, नोकरीच्या ठिकाणी ‘कंत्राटी-कामगार पद्धती’मुळे व ‘कंपनी-दशतवादा’मुळे (Corporate-Terrorism) मराठी ‘Gen-Z’ तरुणाई, ‘फुटबॉल’सारखी इकडूनतिकडे लाथाडली जात असताना… महाराष्ट्राच्या छाताडावर थयथया चाललेला, हा लाखो-करोडो ‘मराठी-आत्म्यां’ना हरघडी पायदळी तुडवणारा नृशंस फुटबॉलचा सामना…रोखण्याची हिंमत, अंशाने तरी कधि, आपले ‘सातारकर महाराज’ दाखवू शकलेत, दाखवू शकतील?
…उलटपक्षी, या अगतिक-दिशाहीन झालेल्या मराठी तरुणाईला सणावारांची, सार्वजनिक-पूजा/उत्सव व खेळ-महोत्सवांच्या अतिरेकाची ‘अंमली मात्रा’च ते आजवर पाजत आलेत. जगण्याचा कोंडमारा झालेल्या मराठी तरुणाईच्या मनांचं व संवेदनांचं ‘बधिरीकरण’ करण्यासाठी, त्यांना फाजील-उत्सवप्रियतेची ‘भूल’ (Anaesthesia) देत…परप्रांतीयांच्या (विशेषतः, गुजराथी-भाषिक व उत्तर भारतीय) आर्थिकहितांची अजून किती ‘कलमं’, महाराष्ट्राच्या मायमराठी देहावर करायचीत, या तथाकथित हिंदुत्ववादी-राजकारण्यांना?
…तेव्हा, आपले यजमान, तुटपुंज्या पगारात ‘कंत्राटी-गुलामी’त खितपत पडलेले असल्याने; नाईलाजास्तव, या महागाईत संसाराचा गाडा हाकण्यासाठी ‘रिक्षाचं हँडल’ हाती घ्यावं लागलेल्या किंवा मोलमजुरीत लोकांचे स्वयंपाक-धुणभांडी करणाऱ्या, शहरं-उपनगरांतील गोरगरीब मराठी ‘दिड हजारी’ लाडक्या बहिणींनो, …किमान आता तरी लक्षात घ्या की, “यांना प्रेम ना साताऱ्याचं, ना ठाण्याचं, ना उर्वरित महाराष्ट्राचं!” त्यांचं पहिलं प्रेम ‘सत्ता’ आणि दुसरं प्रेम ‘पैसा’ आहे, बस्स्!
“राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी” असं बेताल विधान, बेधडक करणाऱ्या आणि ‘राजकीय सट्टेबाजी’तून ‘विकास’ नावाच्या ‘विनाशा’ला आवतण देणाऱ्या; ‘सातारकर महाराजां’ना बजावणारं कुणी आहे का, आहे का कुणी…की, “सत्तेतल्या ‘माजा’साठी नव्हे; तर,’समाजा’साठी मूलभूत स्वरुपाचं काम करावं लागतं…ते ही, कुठलाही पक्षपात न करता! तेच पिढ्यापिढ्यांसाठी ललामभूत होतं…आणि, ते करायचं, तर हिरण्यगर्भासारखी तेजःपुंज आंतरिक ऊर्मि असावी लागते!” …गलिच्छ राजकारणाने भंजाळलेल्या, उपमुख्यमंत्र्यांच्या ‘पश्चिम महाराष्ट्रा’ने, ती ‘शिवरायांच्या रायगडा’तून किंवा छत्रपती शाहूंच्या कोल्हापुरातून थोडी ‘उसनी’ घ्यायला, काय हरकत आहे?
नाशिक, काशी, वाराणसी, उज्जैन, अयोध्येतले धर्माचे ठेकेदार…भ्रष्ट, अन्यायी, अत्याचारी, शोषक राजकारण्यांशी अभद्र ‘युती’ करुन धर्मच्युती-कर्तव्यच्युती करीत असताना; किमानपक्षी आपण श्रीकृष्णाचा गीतेतला सल्ला देण्याचं आपलं काम, ‘धर्मकर्तव्य’ म्हणून पार पाडूया…भले, मग तो सल्ला, “पालथ्या घड्यावरच्या पाण्या”सारखा वरकरणी निष्प्रभ का ठरेना; किमान तो मठ्ठ घडा, ओतल्या पाण्याने उलट्या दिशेनं भिजेल तरी!
“वासुदेवा, असं मी कुठलं महापाप केलं होतं की, माझ्या अंध नजरेसमोर माझे शंभर पुत्र मारले गेले?” असा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश करणाऱ्या धृतराष्ट्राला ‘कर्मसिद्धांत’ समजावून देताना, त्याच्या मस्तकावर हात ठेऊन श्रीकृष्ण दृष्टांत देतो, तो असा की, “पन्नास जन्मांपूर्वी पारध्याच्या जन्मात असताना, धृतराष्ट्राने काही एकरांवर पसरलेल्या एका वडाच्या झाडावर, अंगभूत क्रौर्याच्या अनावर खुमखुमीतून वाळल्या गवताचा मोठा जाळ पेटवून दिला होता…त्याक्षणीच, आगीच्या भडक्यात उडण्याची संधिच न मिळालेल्या शेकडो पक्षांचा आणि अजून पुरेसे पंख न फुटल्यामुळे उडूच न शकणाऱ्या हजारो अश्राप पिल्लांचा भाजून तडफडत निर्घृण बळी गेला. तेच पारध्याच्या जन्मातल्या धृतराष्ट्राचं ‘संचित’ कर्म, ‘प्रारब्ध’ बनून परिपक्व झालं व त्याच्या शंभर पुत्रांचे प्राण हरण होण्याच्या दुःखाच्या डागण्या त्याला देऊनच शांत झालं!”
नरेंद्र, अमितभाई, देवेंद्र, एकनाथ, अदानी, मेहता आणि अजून जे जे म्हणून कोणी…अशा वन्यजीवांचा, वृक्षवनस्पतींचा आणि स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ असलेल्या आदिवासी-गोरगरीबांचा तळतळाट घेणारे ‘लाभार्थी वा हितसंबंधी’ आहेत… ते धृतराष्ट्रासारखेच, त्यांच्या ‘क्रियमाण कर्मा’द्वारे, यथावकाश स्वतःचं ‘प्रारब्ध’ तयार करण्याच्या मार्गाला लागलेत!
|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (समाप्त)

