मरणारे ऋग्ण मेले, कोवळे जीव मारले गेले (आपण फक्त, हतबलपणे संख्या मोजत रहायची)…बाॅम्बफेक अथवा मिसाईलफेक करुन त्यांना मारताना, ज्यांच्या अंतःकरणाला कुठला विचार शिवला नाही, ज्यांचं अंतःकरण किंचितही द्रवलं नाही… ते इस्त्रायली नेत्यान्याहू-सरकार, गाझा-इस्पितळावरील हल्ल्यानंतर “तो मी नव्हेच”, या बदमाषीपूर्ण भांडवली-शैलीत… “तो हल्ला करणारे, आम्ही नव्हेच” असं, गेंड्याची कातडी पांघरुन निगरगट्टपणे जगभरच्या प्रचार-प्रसार माध्यमांतून बोंबलत सांगू लागलेत…!!!
वरील खोटा दावा करताना, बदमाषी करण्याच्या नादात ‘तुर्किश टाईमझोन’मधली वेळ चुकल्यामुळे, झालेली चूक सुधारण्यासाठी, तो गाझा-इस्पितळावरील हल्ल्याचा व्हिडीओ, इस्रायलकडून घाईघाईने ‘डिलीट’ करुन वेळ सुधारुन पुन्हा नव्याने तो टाकण्यात आला… हे ही आवर्जून लक्षात घेतलं पाहीजे.
गाझा-इस्पितळावरील इस्त्रायली-नृशंस हल्ला, “Fact OR Fiction” जे काही असेल ते, असो… पण, मरणारी माणसं, क्रूरपणे मारले गेलेले कोवळे जीव, ही कुठली ‘Fiction’ नसून अंतःकरण पिळवटून टाकणारी ‘Fact’ आहेच! जे काही घडलंय, पुढे घडणार आहे… ते इस्रायली-ज्यूंच्या आजवरच्या (विशेषतः, विसाव्या शतकाच्या मध्यापासूनच्या, इस्त्रायल-राष्ट्र निर्मितीच्या आंतरराष्ट्रीय-कांडानंतर) अमानवी-क्रूर वसाहतवादी मनोवृत्तीतूनच घडतंय, हे इस्त्रायली-सरकार नाकारु शकेल?
पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या संख्येने असणारी तेथील मूळची ज्यू (यहुदी) लोकं देखील, बाहेरुन (युरोप-अमेरिका-इंग्लंडमधून) येऊन इस्रायल-राष्ट्र पॅलेस्टाईनभूमिवर जबरदस्तीने वसवणार्या ‘गोर्या कातडी’च्या ज्यू लोकांविषयी अत्यंत कडवटपणे बोलतात व अपुऱ्या संसाधनांनिशी लढणार्या पॅलेस्टाईन अरबांना मनापासून संपूर्ण पाठींबा देतात, हे विशेषच.
आधुनिक भांडवली-व्यवस्थेत केल्या जाणाऱ्या प्रचारतंत्रावर, विविध माध्यमांतून पसरवल्या वा पेरल्या जाणाऱ्या बातम्यांवर, मग त्या शासकीय बाबीसंदर्भात असो वा ‘काॅर्पोरेटीय क्षेत्रा’संदर्भात, जराही विश्वास ठेवणं…अलिकडच्या काळात खूपच कठीण होत चाललंय (हेच तंत्र वापरुन, भारतातल्या मूठभर वर्णवर्चस्ववादी-शोषक वर्गाने, पिढ्यानपिढ्या बहुजन समाजाला अज्ञान व अंधश्रद्धेत ढकलून, त्यांचं आजवर हजारो वर्षे शोषण केलेलं आहे, त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केलेले आहेत… ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व, आजचा संघ आणि भाजपा करतो… त्यातूनच, इस्रायलला त्यांचा पाठींबा का, हे ही आकळतं)… भारतातल्या ‘गोदी-मिडीया’वर चारपाच वर्षांचं शेंबडं पोर देखील विश्वास ठेवायला तयार नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे, आपल्या देशात.
एका बाजुला, हे भयंकर महाभारत घडत असतानाच, ‘कतार’ नावाचा अरब देश, ब्रिटनशी (ज्याने, पॅलेस्टाईनभूमिवर क्रौर्यपूर्ण हडेलहप्पीने इस्रायल-राष्ट्रनिर्मिती करण्यात प्रमुख भूमिका निभावली होती) तब्बल २७ वर्षांचा गॅस-पुरवठ्याचा करार करतोय… ऐकायला, वाचायला कसं वाटतं? भांडवली-व्यवस्थेतल्या.आत्यंतिक स्वार्थी विचारसरणीत ‘माणुसकी किंवा नितीमत्ते’ला बिलकूल थारा नसतो आणि नसतो थारा, कुठल्याही मानवी-संवेदनांना; तर, भूतदयेला कुठून असणार…???
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)