‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष म्हणून नव्हे; तर, या देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून मला अशा मोठ्या राजकीय व्यक्तिंच्या निधनापश्चात, काही साधेसुधे प्रश्न सतावत रहातात.
प्रश्न असा…. ज्याची गेले काही दिवस, नंतर पुढे कित्येक महिने, वर्षे…. विविध दूरदर्शन वाहिन्यांवरुन साग्रसंगीत, रसभरीत (अगदी अंतःकरण गदगदून टाकणारी) चर्चा चालू राहील…. ती स्व. अटल बिहारी वाजपेयींची ‘संवेदनशीलता’, ही अशी विशिष्ट कोंदणातच बसणारी काही गोष्ट आहे की, संवेदनशीलता सर्वव्यापी असते?
ज्या देशात चार महान धर्म जन्माला आले, त्या भारत नांवाच्या देशाचं आध्यात्मिक तत्त्वज्ञान, हे गर्जून सांगत आलय की, “चराचरात परमेश्वर भरलेला आहे” आणि परमात्म्यातचं दुसरं रुप म्हणजे, “सत्य आणि संवेदनशीलता”! याचाच अर्थ, संवेदनशीलता सर्वव्यापी असेल तरच, ती जातिवंत म्हणायची ना?
आमच्या नेत्यांची संवेदनशीलता कवितेच्या बंदिस्त चौकटीतच वा खाजगी स्वरुपातच मर्यादित रहाणार असेल…आणि, ती सार्वजनिकरित्या राजकीय व्यवहारात मात्र उतरणार नसेल; तर, नेमकं त्या ‘सोयी’च्या संवेदनशीलतेला काय म्हणायचं???
उदाहरण म्हणून सांगतो…. मी ही कामगार चळवळ गेली तीन तपे, म्हणजे जवळपास चार दशके फार जवळून पहातोय. अटलजी पंतप्रधान झाले, एक कवी मनाचा हळवा माणूस पंतप्रधान झाला, म्हणून एक भारतीय म्हणून मलाही मनस्वी आनंद झाला. पण, तो आनंद फार काळ काही टिकला नाही. लवकरच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत ‘खाजगीकरणा’चं पेव फुटलं. भारत अॅल्युमिनियम, हिंदुस्तान झिंक एका पाठोपाठ एक सार्वजनिक कंपन्या, या खाजगीकरणाच्या धोरणाला बळी पडू लागल्या आणि वेदान्ता, अंबानी, अदानीसारखे इतर अनेक खाजगी उद्योग, सरकारी उद्योगांचं सरण रचून भरभराटीला आले. अटलजींच्या मंत्रिमंडळात तर, एक स्वतंत्र ‘निर्गुंतवणूक खातं’च तयार करण्यात आलं होतं. कदाचित, अटलजींना पंतप्रधान म्हणून थोडा अधिक अवधि मिळाला असता तर, सगळ्याच सरकारी उद्योगांचं म्हणे खाजगीकरण झालं असतं, असं उद्योग वर्तुळात सर्रास म्हटलं जातं (म्हणजे, नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर, “Goverment has no business, to be in business). तर दुसरीकडे, काँग्रेसच्या राजवटीने अगोदरच “१०० पेक्षा कमी कामगार संख्या असणाऱ्या कारखान्यांना देशात, कारखाना बंद करायला सरकारी परवानगीची अट काढून टाकल्याने”, पानाची एखादी टपरी वा एखादा हातगाडीचा व्यवसाय, सहजी हवा तेव्हा बंद करता यावा; तेवढ्या सहजतेनं धडाधड बेगुमानपणे देशात कायम कामगार नोकरीला असलेले कारखाने जाणिवपूर्वक बंद केले जाऊ लागले…. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्याला फार मोठी दुर्दैवी चालना मिळाली. शेकडो-हजारो कामगार जिथे, कारखान्याच्या एका छताखाली काम करायचे; त्याच्या, आपल्या सोयीसाठी व कामगारांची सहजी मुस्कटदाबी करता यावी म्हणून, मालकांनी आणि उच्चशिक्षित व्यवस्थापकांनी अक्षरशः चिरफळ्या उडवल्या….. छतांच्या, छत्र्या झाल्या आणि या पंचवीस-पन्नास ते अगदी नव्याण्णव पर्यंतच मर्यादित संख्येनं कामगारांना (म्हणजे शंभरपेक्षा एक ने तरी कमी) सामावून घेणाऱ्या या छत्र्यांमध्ये “कंत्राटी-कामगार” नांवाचे “नव-अस्पृश्य व गुलाम” राबायला लागले. हे असलचं प्रशिक्षण, HR-शैक्षणिकसंस्थांमधून वा व्यवस्थापकीय शिक्षणसंस्थांमधून दिलं जात असतं, ज्यातून संवेदनाशून्य, अमानुष व नफेखोर प्रवृत्तीचे प्रशिक्षित तरुण HR-Managers वा व्यवस्थापक म्हणून सर्रास घडवले जातात. आऊटसोर्सिंग तिथूनच सुसाट फोफावायला लागलं आणि आता तर, सगळ्या प्रकारच्या शोषणाची हद्द करणारी FTE (Fixed Term Employee) ही नवी लुटारु व ध्वस्त करणारी संकल्पना कायदेशीर रुप धारण करतेय!
या सगळ्या वातावरणात, ज्या कामगार-कर्मचाऱ्यांच्या शोषणाला आणि नोकरीतल्या असुरक्षिततेला कसलाही निर्बंध राहीलेला नाही…. त्यांच्या, करोडो आत्म्यांचे ‘आक्रोश’ कधि अटलजींच्या कवितेचा विषय व त्यातल्या ‘संवेदनशीलते’चा हुंकार बनताना दुर्दैवाने आम्हाला दिसला नाही… असो!
कोणी म्हणेलसुद्धा की, कारखाने बंद करताना सरकारी परवानगी, ही मुळातून हवीच कशाला? मग, प्रश्न असे उभे रहातात की, कारखान्यांना सरकारी संरक्षणासह, विविध सवलती द्यायच्याच कशाला? उद्योग, हा काही कुठल्या निर्वात पोकळीत अस्तित्वात येऊ नाही शकत…. फार मोठी लांबलचक गुंतागुंतीची राजकीय व प्रशासकीय यंत्रणा त्यापाठीमागे उभी असते आणि उभा असतो संपूर्ण समाजाचा ढाचा. भांडवली व्यवस्था केवळ, बड्या ‘शेअर-होल्डर्सचे आर्थिक हितसंबंध पहाणार, पण, ‘स्टेक-होल्डर्स’शी मात्र त्याना फारसं काहीही देणंघेणं नसणार, हा उफराटा व सरळसरळ माणुसकीविरोधी व्यवहार, केवळ ते रोजगार निर्माण करतात म्हणून कसा काय खपवून घ्यायचा? हे रोजगार, प्रत्यक्षात पोटावर रोजमार असतात, ही बाब तर अलाहिदाच. बरं, तुम्हाला पूर्ण ‘व्यवसाय-स्वातंत्र्य’ (laissez faire) हवं ना; मग, निदान किमान-वेतनमान तरी ‘सन्मानजनक’ राहू द्या…. पण, तसला UBI (युनिव्हर्सल बेसिक इन्कम) सारखा साधा विचारही, भांडवलदारांच्या पिंडाला कधि आजवर शिवलेला नाही!
लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चर्चा हा देश करतो… पण, तुटपुंज्या वेतनामुळे संसाराचा गाडा हाकणं मुश्किल झाल्यामुळे शहरं-उपनगरांमधून कुटुंबासह होणाऱ्या लाखो कामगार-कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांविषयी कुणी साधा उच्चारही करत नाही…. हे महापातक, नेमकं कोणाच्या माथी मारायचं? कुणाच्या ‘असंवेदनशीलते‘चे हे बळी आहेत??
अटलजी, आपण एक संवेदनशील पंतप्रधान होतात म्हणून, या वेतन-संरचनेसंदर्भात, नोकरीतल्या सुरक्षिततेसंदर्भात जागतिक पातळीवर जशा संरचना उभ्या केल्या गेलेल्या आहेत, त्यादृष्टीने कधि काही नेटाने प्रयत्न केले असतेतं तर, फार मोठं कार्य आपल्या हातून घडल्यासारखं झालं असतं. उदा. नाॅर्वेसारख्या युरोपियन देशांमध्ये नोकरी गमावल्यास पुढील नोकरी लागेपर्यंत कमाल चार वर्षांपर्यंत तरी शेवटच्या पगाराच्या ९०% रक्कम सरकातर्फे दिली जाते. आपल्याकडे नोकरीवरुन काढताना तुटपुंज्या पगारातल्या PF-Base वर आधारित असलेली फक्त सेवेच्या प्रतिवर्षीसाठी 15 दिवसांची क्षुल्लक स्वरुपाची ‘ग्रॅच्युईटी’ आजही तेवढीचं दिली जाते.
आपल्या कारकीर्दीत रोज उठून सार्वजनिक उद्योगांचं श्राद्ध घातलं जाऊ लागलं आणि त्यासोबतच उद्योग-व्यवसायातल्या उरल्यासुरल्या माणुसकीचंही श्राद्ध घातलं गेलं… बेबंद नफेखोरीनं माणुसकीला ग्रहणच लावलं असं नाही; तर, ती मुळापासून उखडून फेकून दिली आणि निसर्ग-पर्यावरणाचा साफ विध्वंस केला! पण, या गोष्टी आपल्या संवेदनांच्या पल्ल्याबाहेरील (range) बहुधा होत्या…. त्यामुळेच, त्या बाधितांच्या-शोषितांच्या व्यथा-वेदनांना आपल्या कवितांमधून ‘स्थान’ मिळू शकलं नाही!
नुसत्या भारत-पाकिस्तान मैत्रीसाठी वाऱ्या केल्या, राजनैतिक प्रयत्न केले…. एवढ्यानेच ‘संवेनशीलता’ कशी सिद्ध व्हावी? ज्या श्रीरामाच्या मंदिराचा मुद्दा बनवून आपण सत्तेत आलात किंवा ज्या रामाचा आपल्या पक्षाला सदैव ढोंगी आधार घ्यावासा वाटतं आलेला आहे…. त्या प्रातःस्मरणीय मर्यादापुरुषोत्तमाच्या संदर्भात एक सांगितला जाणारा किस्सा मुद्दाम उधृत करतो… जेव्हा, चौदा वर्षांचा वनवास भोगून राम अयोध्येला परतला; तेव्हा वेशीवर स्वागतासाठी आलेल्या भरताला, जे मोजकेच महत्त्वाचे प्रश्न श्रीरामाने विचारले, त्या विचारल्या गेलेल्या प्रश्नातला पहिला प्रश्न हा होता की, “भरता, आपले प्रजानन आनंदी आहेत ना आणि मिळणाऱ्या वेतनावर आपल्या राज्याचे सेवक संतुष्ट आहेत ना???” रामासारखी आपणही अशी, आपल्याच कारकिर्दीत देशोधडीला लागत असलेल्या कामगारांची काळजी घेतली असतीत… किमानपक्षी, अमोघ वक्तृत्वाचं देणं लाभलेल्या आपल्यासारख्या लोकनायकाच्या निदान भाषणांमधून, कधि ही कळकळ वरपांगी जरी दिसली असती, तरी या देशातला तळागाळातला कामगार इतका साधाभोळा आहे की, त्याने तेवढ्यावरही समाधान मानलं असतं. एक नमुनेदार व ज्वलंत प्रातिनिधिक उदाहरण म्हणून सांगतो की, आपण मुंबईत आल्यावर ज्यांच्या बंगल्यात हमखास मुक्कामाला असायचात, त्या भाजपाच्याच …… चंद्रकांता गोयल कुटुंबियांचा “प्रदीप मेटल” म्हणून कारखाना नवी मुंबईत (रबाळे-टीटीसी) आहे…. तिथे, जेव्हा माझ्यावर तिथल्या कामगार संघटनेचं नेतृत्त्व करण्याची वेळ आली, तेव्हा तिथली कामगारांच्या संदर्भातली एकूण भीषण परिस्थिती व भयानक आर्थिक-शोषण पाहून मला जबरदस्त धक्का बसला (अर्थात, तेथील बहुसंख्य कामगार उत्तर भारतीय आहेत, हे वेगळं सांगायला नकोच)… हा आपल्या तथाकथित ‘संवेदनशीलते’च्या दिव्याखालचा अंधार नव्हे काय?
आपण आपल्या कवितांमधून वर्णिल्याप्रमाणे, भारत-पाकिस्तान दोन राष्ट्रांच्या संघर्षात काय किंवा आपल्याच राष्ट्रातल्या उसळणाऱ्या जातधर्मीय दंगलींमध्ये काय…. आपली “काव्य संवेदना” दर्शवते तसा, वहाणाऱ्या रक्ताचा रंग लाल असतो… अगदी बरोबर! पण, त्या क्रौर्यापाठीमागचं खरं इंगित, हे कुठेतरी प्रचंड आर्थिक शोषणात दडलेलं असतं…. चोरपावलाने मग, त्याच्यामागून जातधर्म, पंथभेद वगैरे बाबी घुसत असतात, हे वैश्विक सत्य नव्हे काय? ज्या भांडवलदारांची आपण आणि आपला भाजपा पक्ष तरफदारी करत आलाय; त्यांना त्यांचा असा कुठला देश, कुठे असतो? त्यांचं प्रेम “देशावर” वगैरे नसतचं कधि; तर, असतं फक्त धंद्यातल्या नफ्याच्या “धनादेशावर”!
मला पडतो तो दुसरा प्रश्न असा की, गेली काही दशके या देशात (जगाचं आपण सोडून देऊ) औद्योगिक व जीवनशैलीचा ‘विकास’ नांवाचा नवा जीवनविरोधी बाजारु प्रकार, सर्वदूर भयानक धुमाकूळ घालतोय…. ज्यात, सगळ्या प्राणीमात्रांचं, वनस्पतीसृष्टीचं, जलचरांचं, किटक-जीवजीवाणूंचं अस्तित्वच आपण अत्यंत क्रूरपणे उध्वस्त करत सुटलोय… विकासाच्या या बुलडोझरपुढे निसर्ग-पर्यावरणासह अवघी सजीवसृष्टी धोक्यात येत असताना आमची ५१ कवितांवाली ‘संवेदनशीलता‘, कुठे पेंड खात असते? सजीवसृष्टीच्या मुळावर उठलेल्या या ‘विकास’ नांवाच्या विनाशावर, आपल्या संवेदनशीलेनं किती फटकारे, कधि ओढले आणि सत्ता राबवताना निसर्ग-पर्यावरण संरक्षण-संवर्धनाबाबत मूलतः तशी कुठली धोरणं कधि अंमलात आणली?
अटलजी, आपण स्वर्गवासी झालात, याचं आम्हाला खचितच दुःख आहे… कुणाच्या भावना हकनाक दुखावण्यासारखं कधि आम्ही काही करत नाही. पण, हा देश… हा महाराष्ट्र प्रदेश, झपाट्याने ढोंग्यांचा आणि मूर्खांचा प्रदेश व्हायला लागलाय (म्हणूनच, शिवबा-संतांच्या महाराष्ट्रातसुद्धा तो ‘जातधर्मा’च्या कच्छपी लागलेला दिसतोय), म्हणून काही ढळढळीत अनुभवजन्य सत्य, प्रखर सूर्यप्रकाशासारखं मांडण्याचा माझा छोटेखानी प्रयत्न आहे. असं बघा की, आपण अत्यवस्थ झाला होतात, हे नुसतं कळताच तमाम जनतेसोबत देशभरातल्या वंचित-शोषित कामगारांनीसुद्धा एकदिलाने सोशलमिडियातून आपल्या अंतःकरणापासून वाटणाऱ्या दुःखाला मोकळी वाट करुन दिली…. एवढा, आपल्या सरकारच्या हातून त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय होऊनसुद्धा, आपल्या सरकारचे अपराध पोटात घालून कामगारांनी आपल्यावर निस्सीम प्रेम केलं (तसं, कामगारांना उध्वस्त करणाऱ्या महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांवरही भोळसट कामगारांनी प्रेम केलं आणि त्यांना आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान केलं)…. या अशा साध्याभोळ्या कामगारवर्गासाठी खरचं अटलजी, आपण काहीतरी भरघोस करुनच मग जायला हवं होतत…. तुम्ही उद्योगपतींना भरभरुन दिलतं, थोडी आपली कृपादृष्टी कामगारांकडे वळली असती; तर, आज देशात-महाराष्ट्रात उद्रेकजन्य परिस्थिती उभी राहिली नसती. ही अपेक्षा आपल्याकडूनच केली जाऊ शकत होती.
आता असा आशेचा किरण कुठे दिसण्याच्या सर्व शक्यता मावळलेल्या आहेत…. कारण, सत्तेच्या सिंहासनावर ‘रामनाम‘ जपत आपल्या नावाच्या पादुका रचून, उद्योगपतींची दलाली करणाऱ्या ह‘राम‘खोरांकडून काही अपेक्षा करणं, म्हणजे बैलाकडून दुधाची अपेक्षा करणं आहे, एवढं तरी निश्चितच कळतं आम्हाला….
म्हणून राहून राहून, आपल्या निधनाच्या दुःखासोबत, त्या आपल्या हातून राहून गेलेल्या या गोष्टीचंही फार फार वाईट वाटतयं !!!
…. जाता जाता, स्व. अटल बिहारी बाजपेयींच्या मृत्यूपश्चात ज्या पद्धतीने भाजपा एकापाठोपाठ एक कार्यक्रमांचा रतीब लावत आहे, त्यावर सडकून टीका करत अटलजींच्या भाचीने म्हणजे करुणा शुक्लाने हे, अटलजींच्या मढ्यावरचं ‘राजकीय‘ लोणी खाण्याचे धंदे, भाजपाने तत्काळ बंद करावेत… असं अत्यंत उद्वेगाने म्हटलयं. याचसंदर्भात, पुढे मिळालेल्या माहितीनुसार म. प्रदेशमधील रायपुरच्या अटलजींच्या श्रद्धांजली सभेत म. प्रदेश सरकारचे दोन मंत्री, अजय चंद्राकार व ब्रजमोहन अग्रवाल खो खो हसतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत तर, दुसरीकडे म. प्रदेशच्याच ग्वाल्हेरमध्ये अटलजींच्या अस्थिकलश यात्रेत सहभागी झालेल्या अटलजींच्या जवळच्या नातलगांकडे, यात्रेपश्चात स्थानिक व केंद्रीय भाजपा पदाधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्यांना अखेरीस घरी परतण्यासाठी शोधाशोध करत कशाबशा रिक्षा गाठाव्या लागल्या!
उत्तरेत राम, मध्यप्रदेशात अटलजी, तर कधि दक्षिणेत शिवछत्रपती, पेरियार…. राजकीय सोंगढोंग नाचवत फक्त ‘नाम‘ जपा…. नांव तुझं भाजपा !!!
….. राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष)