कॉर्पोरेट-दहशतवाद

गेली अनेक वर्षांपासून कंपनी-दहशतवादाबद्दल (Corporate-Terrorism) कंठशोष करुन आम्ही बोलतो आहोत, जीव तोडून लिहीतो आहोत… पण, लक्षात कोण घेतो ???

‘दहशतवाद’, हा कोणाचाही, कुठल्याही कारणाने असो… त्याची नांगी वेळीच साफ ठेचून टाकलीच पाहीजे! विशेषतः, “जातधर्मीय आणि काॅर्पोरेटीय दहशतवाद” तर, जिथे असेल तिथे, जिथे दिसेल तिथे… कठोरपणे समूळ निपटून काढलाच पाहीजे.

…मात्र, जिथे ‘सततच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध दाद मागणं अशक्य झालेलं असल्यास, त्यातून कधिही न सुटणारी, न फुटणारी अशी तळागाळातल्या माणसांच्या आयुष्याची ‘कोंडी’ झालेली असल्यास… त्याविरुद्ध, प्रासंगिक स्वरुपाचा होणारा पिडीतांचा उत्स्फूर्त ‘हिंसे’चा उद्रेक, हा वेगळ्या स्वरुपाचा असतो आणि त्याकडे, वेगळ्या सहानुभूतीपूर्वक नजरेनं पाहीलंच पाहीजे. कारण, निव्वळ, “Justice delayed, is justice denied” असंच नव्हे; तर, “Justice delayed, is ‘deadliest’ form of denial” होय.

तसेच, असा हिंसेचा मार्ग क्वचित प्रसंगी, अन्याय-अत्याचाराचा कहर झाल्यानंतर पत्करला जाणं, हे भारतीय अध्यात्मिक शिकवणुकीनुसार ‘हिंसे’त गणला न जाता, तो मार्ग एकप्रकारे ‘अहिंसे’चाच मार्ग म्हणूनच गणला जातो, कारण त्याच्या बुडाशी सातत्याने होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचं निर्मूलन, हे ‘आखरी रास्ता’, या नात्याचं महान उद्दिष्ट असतं… याउलट, जे अत्यंत थंड डोक्याने (आजवर, पिढ्यानपिढ्या आपल्या देशातले ‘मनूवादी’ आणि आजकाल कंपन्यांमधील ‘व्यवस्थापकीय मंडळी, जे करत आलेली आहेत) नामानिराळे राहून, “फोडा आणि झोडा” या बदमाषीपूर्ण नीतिने तळागाळातल्या माणसांमध्ये ‘आग’ लावण्याचे नीच धंदे करतात आणि कोंबड्या-कुत्र्यांसारखे आपापसात रक्तरंजित झुंजीला प्रेरित करतात, ते वरकरणी जरी ‘अहिंसक’ दिसत असले… तरी, त्या वरवरच्या अहिंसेच्या पोटात खोलवर, फार मोठी व अतिशय घृणास्पद स्वरुपाची ‘हिंसक प्रवृत्ती’ दडलेली आणि मुरलेली असते.

आपल्या भारतात बुद्धिमंत मंडळींची बिलकूल कमतरता नाही… मोठी कमतरता आहे ती, ‘चांगल्या, नीतिमान’ बुद्धीच्या संवेदनशील माणसांची. व्यवहारात दुर्दैवाने, हे चित्र दिसतं की, जेवढे जास्त उच्चशिक्षित, तेवढे जास्त फसवे, बनवाबनवी करणारे आणि कारस्थानी वृत्तीचे असतात {बँकींग, काॅर्पोरेटक्षेत्रात आणि नागरी-प्रशासनात (IAS, IPS वगैरे) तर, यांची फारच मोठी मांदियाळी असते}!

“शिक्षण आणि संस्कृती”, याचा अर्थाअर्थी संबंध नसतो, तो असा… आणि, असलाच, तर समाजाप्रति सकारात्मक कमी आणि असा, नकारात्मक, समाजावर वाईट प्रभाव टाकणारा मात्र, जास्त असतो!

बोईसर (पालघर) एमआयडीसीतील ‘विराज प्रोफाइल’मध्ये उपलब्ध माहितीनुसार, जे काही घडलं आणि जे काही इतका दीर्घकाळ घडत होतं… त्याच्या मुळाशी, ही ‘व्यवस्था’ जाणंच शक्य नाही; कारण, ती त्या मालकांची, व्यवस्थापकांची पूर्ण मिंधी आहे (पोलिस, कामगारखातं, औद्योगिकसुरक्षा खात्यासह संबंधित इतर सर्व खात्यातील सरकारी अधिकारीवर्ग नियमितपणे आपापले ‘हप्ते’ गोळा करुन जात असल्याचं, कामगारवर्गात सर्रास बोललं जातं). मुंबई लेबर युनियनचे एक पदाधिकारी श्री. सदानंद प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे व्यवस्थापनाची प्रचंड दहशत तर, होतीच; शिवाय, भरीसभर म्हणून त्यातूनही कामगारांना भुलविण्यासाठी ‘ब्रह्मकुमारी’ या तथाकथित आध्यात्मिक संस्थेची प्रवचनं कंपनीत ठेवली जायची आणि त्यावेळेस सर्व कामगारांचे मोबाईल तात्पुरते व्यवस्थापन ताब्यात ठेवायची, जेणेकरुन कोणीही तिथे काय चाललंय, याचं ‘शूटींग’ करु नये. शोषण, अन्याय-अत्याचारपिडीत संतप्त कामगारांना ‘आध्यात्मिक अफू’ पाजून षंढ आणि थंड करण्यात आल्यानंतर (ही अशी, तळागाळातील शोषित जनतेला थंड आणि षंढ बनवण्याची ‘सुपारी’, बहुतेक सगळ्याच अशा, तथाकथित आध्यात्मिक संस्था किंवा संप्रदाय, भांडवलदारांकडून व राजकारण्यांकडून घेत असतात आणि बदल्यात त्यांच्या ‘आध्यात्मिक-उद्योगां’साठी बक्कळ आर्थिक व राजनैतिक पाठबळ मिळवत असतात), व्यवस्थापनाच्या दावणीला बांधलेल्या दलाल, बटीक युनियनचं ‘सभासदत्व’ घेण्यासाठी मोठा दबाव टाकला जायचा… या अशा, कामगारांची साफ मुस्कटदाबी करणार्‍या, अनेकोनेक व्यवस्थापकीय क्लृप्त्या बदमाषीने बेधडक तिथे राबवल्या जात होत्या आणि मोठ्याप्रमाणावर ‘कंत्राटी-कामगार’ कामाला लावून कामगारांचं अतोनात शोषण चालू होतं, असंही ते पुढे म्हणाले. खरंतरं या सगळ्याचीच सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, पण हे कधिही होणं शक्य नाही… हे ही आपण पूर्णतया जाणून असतो.

तेव्हा, “प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडायला हवा की, आपण नेमक्या कुठल्या राज्यात रहातोय? अंधारयुगात की, लोकशाहीच्या प्रकाशात?”

‘सामना’ दैनिकाच्या यासंदर्भातील बातमीत (दि.८ मे-२०२२) सरतेशेवटी म्हटलंय की, बोईसर पोलिस पुढील तपास करत आहेत… कसला कर्माचा तपास, ते करणार आहेत आणि असे आजवर खरेखुरे किती तपास केले गेले? आहे हिंमत त्यांच्यात, पडद्यामागच्या खर्‍या गुन्हेगार व्यवस्थापकीय सूत्रधारांना अटक करुन कायद्याच्या हवाली करण्याची? पोलिस एवढंच करणार की, या निमित्ताने युनियन-नेतृत्त्व ‘पोलिसी ताकद’ वापरुन कायमचं साफ मोडूनतोडून टाकणार आणि लढाऊ कामगार संघटना साफ उध्वस्त करणार… हाच, त्यांचा पुरुषार्थ, बस्स! पडद्यामागच्या खर्‍या गुन्हेगार व्यवस्थापकीय मंडळींना हात घालायची, खाकी वर्दीची हिंमत आहे?

… आणि, झालंय ही अगदी तस्संच! काल दि.८ मे-२०२२ रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोईसर पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक म्हणाले की, दंगल घडविण्यासाठी ज्या कामगारनेत्यांनी चिथावणी दिलीय, त्यांचा पोलिसांनी शोध घेतला असून त्यांना कायद्याच्या हवाली केलं जात आहे. बघा, युनियनच्या कुठल्याही व्यवहाराबाबत ‘व्यवस्थापकीय-हस्तक्षेप’ करण्यास कामगार-कायद्यानुसार पूर्णतया बंदी असतानाही, हे ‘आगलावे धंदे’ करणाऱ्या व्यवस्थापकीय मंडळींवर पोलिस, कायमची जरब बसेल, अशी काही कारवाई करणार आहेत का? बेकायदेशीररित्या कंपनी-दहशतवाद, थापेबाजीचा बेबंद अवलंब करत व युनियन-नेतृत्त्वाची खोटी बदनामी करत अफवा पसरवणाऱ्या, सगळ्याच कंपन्यांच्या व्यवस्थापकांना, कामगार-कामगारांमध्ये दंगल माजवण्यास कारणीभूत ठरणारे मोठे गुन्हेगार असूनही, कायमच ‘मोकळं रान’ दिलं जाताना सर्वत्र दिसतं.

सदानंद प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार ४१ कामगार (बहुतेक त्यातील सगळे कमिटी-सभासद) आणि ३ मुंबई लेबर युनियनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना १६ मे पर्यंत पोलिस कोठडीत डांबण्याचे आदेश, स्थानिक न्यायालयाकडून पोलीसांनी मिळवले आहेत. याचा अर्थ, या तब्बल ९ दिवसांच्या पोलिस कोठडीतील मुक्कामात या सगळ्यांनाच इतकं बदडलं जाईल, पोलिसी खाक्या इतक्या क्रूर पद्धतीने दाखवला जाईल (तोच तेवढा, पोलिसांचा ‘पुरुषार्थ’) की, पुन्हा म्हणून, त्यातील अनेकांची अन्याय-अत्याचाराविरुद्ध युनियनबाजी करण्याची हिंमतच साफ मोडूनतोडून टाकली जाईल; शिवाय, ते कायमच्या नोकर्‍या गमावतील (इतरही कुठे त्यांना नोकर्‍या मिळू देणार नाहीत, हे व्यवस्थापकीय हरामखोर लोक), आयुष्यातून उठतील, ते वेगळंच! अशावेळेस, सगळीकडे पहावं तर… कारस्थानी, पाजी व्यवस्थापकीय मंडळी, एसी केबिनमध्ये आरामात बसून या अशा, घटनाक्रमाचा  मनमौजीपणे आनंद घेताना दिसतील व “युनियनबाजी कायमची संपवण्याचं” प्रोजेक्ट कसं पार पाडलं, याची एकमेकाला ‘शाबासकी’ देत (त्यातून बढती किंवा प्रमोशन मिळवत), रात्री पार्टीत उंची मद्याचे घोट घेत, आपला ‘विजय’ साजरा करताना दिसतील…. अनेक ठिकाणी, हेच घडताना आम्ही आजवर पहात आलेलो आहोत. त्यातूनच, उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गावर आपसूकच एक प्रचंड दडपण व दहशत बसवली जाऊन कामगार-कर्मचारीवर्गाचं व कामगार-संघटनांचं साफ खच्चीकरण साधलं जातं… त्यासाठी, येऊ घातलेल्या “४ काळ्या कामगार-कायद्यांच्या ‘कामगार-संहिते’ची (Labour-Code) प्रतिक्षासुद्धा, संबंधित व्यवस्थापकीय मंडळींना करायची गरज नाही!

या विराज प्रोफाईलच्या बातमीसोबतच, मुंबईस्थित पावणे एमआयडीसीत एकाचवेळी सहा कारखान्यांमध्ये आग लागून तीन कामगार बेचिराख झाल्याची दुसरी नवी बातमी येऊन धडकली… काय कारवाई होणार आहे, या संबंधित व्यवस्थापकीय मंडळींवर, जे कंपनीचे पैसे वाचवायला बेधडक अप्रशिक्षित व अतिशय ‘स्वस्त’ असलेले ‘कंत्राटी-कामगार’ (जे कंत्राटी-कामगार पद्धतीतल्या गुलामगिरीमुळे आतून संतप्त व संत्रस्त असल्याने मन लावून नीट काम करुच शकत नाहीत) कामाला लावून आजवर असंख्य रासायनिक कारखान्यांची सुरक्षितता धोक्यात आणत आहेत? आजवर असे, किती अपघात झाले, किती कामगार मेले आणि त्यामुळे, किती व्यवस्थापकीय मंडळींवर कारवाई होऊन ती गजाआड गेली, देईल कोणी याचा हिशोब?

सारांश हा की, कामगार एक ‘गुलाम’ म्हणून या सगळ्या व्यवस्थेला हवा तसा वापरायचाय, कामगार म्हणजे जणू कारखान्यातला ‘कच्चामाल’च… एकवेळ मातीला किंमत आहे, पण कामगारांना किंमत नाही, ही जळजळीत वस्तुस्थिती आहे… या वरील दोन्ही घटनाक्रमांतून हेच सिद्ध होतेय, इतकंचं!

पांढरपेशे किंवा त्यांची तरुण उच्चशिक्षित पांढरपेशी मुलंसुद्धा, या अशाच गुलामगिरीत अडकलेली असूनही, त्यांचं ‘भाजप’चं प्रेम, ‘अंधभक्ति’ थांबायला तयार नाही, हे फार मोठं आश्चर्य व दुर्दैव होय… I.T. इंजिनियर्स वगैरे फक्त, बाऊन्सर्सच्याच केवळ, धाकात नसतात; तर, काही बड्या कंपन्यांमधून “अतिरेक्यांच्या हल्ल्यापासून संरक्षणा”चं बादरायण निमित्त पुढे करत… थेट कार्बाईनधारी कमांडोंचाही त्यांना हरघडी सामना करावा लागतो. मग, कुठली ते युनियन करणार आणि आपल्यावरच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध कुठून आवाज उठवणार? इतर कंपन्यांतील इंजिनियर्सची, यापेक्षा वेगळी कुठली मुस्कटदाबी नसतेच. त्यांना, उच्चशिक्षित अजूनही वाटेल तशी वेडीवाकडी बोलणी खावी लागतात, १०-१२ तासच नव्हे; तर, दररोज १५ तास नोकरी गमावण्याच्या ‘कंपनी-दहशती’त कायम दबून, राबराबून काम करावं लागतं… मग, आपली मुलं, एवढी मेहनत व खर्च करुन शिकवायची ती काय, यासाठीच?

बाकी कामगार-संघटना, या अशावेळी आपापसातील स्पर्धेपोटी, असूयेपोटी मदतीला धावून येत नाहीत… ही अजून एक कामगार-चळवळीची शोकांतिकाच होय! “कालपरवापर्यंत इतर कुठल्या कंपनीतली… आज विराज प्रोफाईलमधली वय झालेली ‘आजी’ मरण पावल्याचं फारसं दुःख आपण बाळगणार नसलो, त्यात सहसंवेदनेनं व तळमळीने सामील होणार नसलो… तर, ‘काळ सोकावतो आहे’, याचं नीट भान बाळगा”… ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate-Terrorism) आणि ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’वर आपण निवडणुकीतील मतदानाचं लोकशाही-हत्यार जबाबदारीने वापरुन; जर, प्रहार करणार नसलो… तर, मग, आपल्यासह पुढील पिढ्यांना परमेश्वर काही, कुठला ‘अवतार’ धारण करुन वाचवायला येणार नाही, हे मात्र, पक्कं मनावर बिंबवून ठेवा…

सरतेशेवटी, “चिमणीसारखा इवलासा जीव देखील, तिच्या घरट्यात स्वच्छंद विहार करत, स्वातंत्र्याचा यथेच्छ उपभोग घेत, चिवचिवाट करु शकतो”… असं, गौतम बुद्ध म्हणायचे!

मग, “माणूस, ही जगन्नियंत्याची सर्वोच्च निर्मिती म्हटली; तर, कामगारांसारख्या जिवंत हाडामांसाच्या ‘माणसा’ला (की, त्याला ही क्रूर, निर्मम ‘व्यवस्था’… यांत्रिक, निर्जीव ‘रोबो’ समजते?) त्याची स्वतःची संघटना, संघटना-नेतृत्त्व मोकळेपणाने निवडण्याचं स्वातंत्र्य नको द्यायला ???”

… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)