सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ५

मराठी कामगार-कर्मचारीवर्गाची हीनदीन, अवनत-अवमानित अवस्था निर्माण होण्याचं तिसरं प्रमुख कारण म्हणजे…जगभरात प्रगत देशांमध्ये ‘कामगारविश्वाभोवतीच राजकारणाची दुनिया फिरत असते आणि कामगार नेतेच बव्हंशी देशाचं राजकारण चालवतात… तर, आमच्या महाराष्ट्र-देशात याच्या पूर्णतः विपरीत स्थिती आहे! ‘कामगार-धर्मा’च्या अथवा कामगारांच्या ‘वर्ग-जाणिवे’च्या दृष्टीकोनातून कामगार-कर्मचारीवर्ग निद्रिस्त असल्यामुळे, जाज्वल्य कामगार नेत्यांना राजकारणात काळं कुत्रं देखील विचारत नाही! आणि, त्यामुळेच, त्यांच्यात फूट पाडणं, हा भांडवलदारवर्गाच्या (हा भांडवलदारवर्ग कंपनीत, सुपरवायझरपासून सुरु होत कंपनीच्या CEO व मालकांपर्यंत येऊन संपतो) हातचा मळ ठरतो!
भांडवलशाहीत कामगारांच्या हातून त्यांची परंपरागत उत्पादन-संसाधने (उदा. सुतारकाम, विणकाम, लोहारकाम वगैरे करणाऱ्यांची त्या त्या कामाची अवजारे वा हत्यारे) हिसकावून घेतली जाऊन, ती पूर्णतया भांडवलदारांच्या ताब्यात आल्याने, कसबी कामगाराला त्यांच्या कंपन्या-कारखान्यांमधे कामासाठी जावं लागते व तेथे ते असहाय्यतेचा सतत सामना करत रहातात…त्यामुळे, “कामगार किंवा कर्मचारी म्हणून, आपल्याप्रमाणेच इतरांच्या व पुढील पिढ्यांच्या हिताचा विचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आपसूकच येऊन पडते व त्यासाठीच, सदैव संघटित राहून सर्वांच्या हिताच्या दृष्टीने विचार व निर्णय करणं त्यांच्यासाठी बाध्य ठरतं, ज्याला कार्ल मार्क्स “निवडीद्वारे (उदा. सर्वसंमतीने वा मतदानाद्वारे) आपापसात निर्माण झालेली आत्मीयता” (Elective Affinity) म्हणतो!
…पण, महाराष्ट्रात विशेषतः, राजकारण जनसामान्यांच्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या मुद्द्यांवर चालण्याऐवजी भावभावनांच्या निष्फळ कल्लोळावर आणि तथाकथित नेत्यांच्या वैयक्तिक ‘करिश्म्या’वर म्हणजेच, भल्याबुर्‍या मार्गाने राखलेल्या निव्वळ जनसंपर्कावरच (उदा. लग्न-वाढदिवस सोहळ्यांमधली उपस्थिती व ज्यात अंत्यसंस्कार प्रसंगही आलेच, सार्वजनिक मंडळांच्या भेटीगाठी व त्यांना रसद-पुरवठा, रस्त्यांच्या कानाकोपर्‍यातली शहरं पूर्ण विद्रूप करणारी फालतू बॅनरबाजी, सार्वजनिक हिताचा काडीमात्र विचार न करता अथवा तशी धोरणं न आखता केवळ जनतेच्या छोट्यामोठ्या व्यक्तिगत कामांवर लक्ष केंद्रित करणं वगैरे वगैरे) व एकूणच भपकैबाजीवर राजकारण अतिशय उथळपणे चालत रहातं…आणि, म्हणूनच महाराष्ट्रातली आम मराठी-जमात देशोधडीला लागलीय.

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) (क्रमशः)