लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)
लेख क्रमांक ९
* *राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं….
राजकारण, हे तुमचं हवापाणी, अन्न-वस्त्र-निवारा, आरोग्य-शिक्षण व जगण्यातल्या सुरक्षिततेसह सगळ्याच बाबी ठरवत असल्याने… “मला काय त्याचं”, या वृत्तीने राजकारण पराङ्मुख राहिल्याने बदमाषांचं फावतं आणि सॅम्युअल जाॅन्सन व मार्क ट्वेन म्हणतो तसं, “Patriotism and Politics, is the last refuge of a scoundrel” ठरतं… आणि, कामगारांसारख्या पिरॅमिडच्या तळाच्या वर्गाला त्याची भयंकर कटू फळं भोगावी लागतात!
सध्या भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कामगारवर्गाचं ‘बिगर-राजकियीकरण’ (Depoliticisation) अगदी टिपेला पोहोचलंय…भारताचं सोडाच, जगातल्या अगदी पहिल्यावहिल्या ‘समाजवादी-साम्यवादी’ रशियाचं उदाहरण घेतलं; तरी लेनिनपश्चातच्या प्रदीर्घ कालखंडात रशियन-कामगारांचंही पुरेसं सशक्त व सखोल ‘राजकीय-प्रशिक्षण’ न झाल्यानेच…नव्वदीत सोविएत युनियनच्या पतनानंतर साधा निषेध म्हणूनही ‘राजकीय-प्रशिक्षणशून्य’ रशियन कामगारांनी ना संप केला, ना ते रस्त्यावर उतरले! महाराष्ट्रात डाॅ. दत्ता सामंतांसारख्या लढवय्या कामगार-नेत्याची तत्कालीन भांडवली-व्यवस्थेकडून कट रचून हत्या झाल्यानंतर देखील, मराठी-कामगाराने घरात बसून रहाणेच पसंत केले होते. डाॅक्टरांच्या हत्येसोबतच कामगार-चळवळीचं एक पर्व संपलं आणि महाराष्ट्रातील कामगार-चळवळीची मृत्यूघंटा कर्णकर्कश्श स्वरात घणघणायला लागली! जगभरात कामगार नेते व कामगार-चळवळचं राजकारण चालवते; पण, आपल्याकडे राजकारणाप्रति ‘उदासीन’ असणाऱ्या वा ‘विपरीत वर्ग-जाणीव’ बाळगून जातधर्मात अडकलेल्या बहुतांश कामगारांमुळे, कामगार नेत्यांना राजकारणात काळ कुत्रंदेखील विचारत नाही… ही शोकांतिका, त्या कामगार-नेत्यांची नसून भांडवली-व्यवस्थेकडून रोज वेगवेगळ्या प्रकारचे आघात झेलणाऱ्या कामगार-कर्मचारीवर्गाची आहे!
* *’मराठीत्व’, हेच ‘राष्ट्रीयत्व’….
…लक्षात घ्या, भारत हा देश म्हणून कधिही एकसंध नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसेल… घटनात्मकदृष्ट्या ‘भारतीय-नागरिकत्व’ एकचं असलं; तरीही प्रत्येक राज्याचं, प्रत्येक भाषिकाचं स्वतंत्र वेगळं असं ‘अस्तित्व’ आहे… म्हणूनच ‘अलिखित’ स्वरुपाचं; पण, व्यवहारतः कार्यरत असं, वेगळं ‘राष्ट्रीयत्व’ देखील आहे! त्याअर्थानेच ‘मराठीत्व’ हेच, महाराष्ट्राचं प्राथमिक ‘संघराज्यीय-राष्ट्रीयत्व’ आहे! हे प्रत्येक राज्याचं विभिन्न ‘राष्ट्रीयत्व’, त्यांच्या त्यांच्या राजकारण्यांनी बव्हंशी जपलं. उत्तरेतल्या राजकारण्यांनी ‘भारतीय राज्यघटने’अंतर्गत भारताच्या कुठल्याही भागात-प्रदेशात जाऊन निवास, व्यवसाय, नोकरी वगैरेचं मुक्त-अनिर्बंध स्वातंत्र्य, आपल्या राजकारणातल्या व घटना-समितीतील ‘संख्या-दबावा’ने उत्तरेतल्या लोंढ्यांच्या सोयीसाठी, असं खास मिळवल्यानंतर… तिथल्या राजकारण्यांची बदमाषी, भ्रष्टाचार व अकार्यक्षमता झाकली रहाण्याची आपसूकच तरतूद झाली; जसा, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’मुळे फारच तुटपुंज वेतन देता येण्यानं, काॅर्पोरेटीय व्यवस्थापकीय मंडळींचा भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, बदमाषीपूर्ण व्यवहार झाकला रहाण्याची उत्तम सोय झाली. आमच्या आघाडीच्या मराठी राजकारण्यांकडून ‘मराठीत्व’ जपण्याची आपल्या राजकारणापुरती, सोयीची नौटंकी तरी करण्यात आली किंवा त्यांच्यापैकी कुणाकुणाला ‘जाणता राजा’ वगैरे बनण्याचं सोंग वठवत पंतप्रधानपदाची स्वप्न पडत होती; तर, कुणाकुणाला कसलं कसलं ‘सम्राट’ व्हायचं होतं आणि ते शिक्षण, आरोग्य, बांधकाम वगैरे क्षेत्रात; तसेच, जातधर्मीय भावनिक राजकारणात ‘सम्राटपट’ भूषवते झाले देखील! पण, भांडवलदारांची दलाली करण्याच्या त्यांच्या फसव्या व अवसानघातकी राजकारणामुळे… एकीकडे त्यांनी ‘कंत्राटी-कामगार पद्धती’ला आशिर्वाद देत, कामगार-चळवळीच्या गळ्याला नख लावलं आणि दुसरीकडे राजकारणात-अर्थकारणात ‘मराठीत्व’ जपण्याऐवजी…मराठी-माणसाचं “गुजराथी-मारवाडी-जैन भांडवलदार (वरच्या बाजुने) व उत्तरेतले घुसणारे लोंढे (खालच्या बाजुने)” असं एक ‘मराठीघातकी सँडविच’ तयार करुन, त्यात ‘मराठीत्व’ भरडून टाकलं! ‘उत्तर-पश्चिमेतले लुटारु-भांडवलदार गुजराथी आणि उत्तर-पूर्वेतले ‘कंत्राटी-गुलाम’ असलेल्या भैय्यांचे लोंढे’ (ज्यांना भले ते थोडं चुकीचं असलं तरी ‘भैय्ये’, या एकाच मापाने आपण मोजतो), यांच्या अडकित्त्यात सापडून, महाराष्ट्र जीर्णशीर्ण-विदीर्ण झालाय!
* *दुर्दैवाने, जनतेला झोपेतून जागे करणारे राजकारणी नको असतात…तिचं ‘सांत्वन’ करुन तिची झोपमोड होऊ न देणारे, हवे असतात….
जगाच्या आजवरच्या इतिहासावरुन ध्यानात येईल की, अभावाने वा अपवादानेच सर्वसामान्य जनता, व्यवस्थेतल्या आमूलाग्र व क्रांतिकारक बदलाच्या बाजुने उभी रहाते…जेव्हा कधि, जनकल्याणाचा मूलभूत विचार करणाऱ्या जातिवंत-प्रामाणिक राजकीय नेत्याला वा राजकीय पक्षाला ती आपलं नेतृत्त्व बहाल करते; तेव्हाच, तिच्या हालअपेष्टा थांबतात व जगण्यात स्थैर्य व सुखसमाधान-शांति येते.
दुर्दैवाने तिला ‘जपजाप्य-पूजाहवन करा, निवेदनं द्या, रामनामाने वह्या भरा, देवदर्शनासाठी पायपीट करा वा तासनतास रांगेत उभं रहा’…म्हणजे, तुमचे ग्रहदोष दूर होऊन ईश्वर तुमच्यावर कृपेचा वर्षाव करेल; असं सांगून तिचं ‘सांत्वन’ करणारे धर्मसंप्रदायाचे दुकानदार फार प्रिय असतात किंवा सतत संपर्कात राहून अडीनडीला, किरकोळ मदतीसाठी धावून येणारे वा प्रसंग आनंदाचा असो अथवा दुःखाचा…आपल्यासमोर तत्काळ उभे ठाकणारे राजकारणी आवडतात (जे तसेही, नोकरीधंदा न करणारे ‘बिनकामा’चे सदैव मोकळे वा मोकाटच असतात). लहान मुलांच्या हातात खेळणी देऊन त्यांना तात्पुरतं गप्प करण्यासारखीच…जनतेला अन्याय-शोषणाविरुद्ध शांत राखण्यासाठी, ही कृत्ये वरकरणी त्यांना करावी लागतातच… तिचं त्यांची ‘शक्ति’ व तिचं त्यांची “मर्यादा’!
…पण, त्यामुळेच जनतेचं पिढ्यानपिढ्या फार मोठं नुकसान होत रहातं व तिच्या आयुष्यात सुखासमाधानाचा ‘आनंदरस’ निर्माण होण्याऐवजी; जगणं, एक अडीअडचणींची, रोजच्या संघर्षाची ‘सर्कस’ बनते. हे जे असलं फुटकळ राजकारण करणारे ‘सर्ववेळ’ (Full time or All time politicians) राजकारणी असतात… ते मूलभूत स्वरुपाची कुठलीही कामं करताना कधिही दिसत नाहीत, दिसणार नाहीत; उदाहरणच घ्यायचं झालं तर, दर्जेदार आरोग्य व शिक्षण सेवा सार्वजनिक क्षेत्रात उभारणे, कामगारांना नोकरीत सुशिक्षितता व सन्मानजनक वेतनमान देणे, लोकांना सहजी परवडेल अशापद्धतीने शहरं-उपनगरांतून चांगला ‘निवारा’ उपलब्ध करुन देणे, भ्रष्टाचाराच्या मुळावर आघात करणे वगैरेंचं घेता येईल.
* *मराठी-माणसाच्या चुका आणि तो आपल्या चुकांची भोगत असलेली सजा….
नोकरीच्याच नव्हे; तर, व्यवसायाच्या संधिही दुरापास्त झाल्यानेच मराठी सुशिक्षित लोकं देखील अमेरीका, इंग्लंड, कॅनडा वगैरे ठिकाणी स्थलांतर करतायत… सोपं नाही तिथे जगणं, खूप कष्टाचं आहे; तरीही, ते त्यांना रुचतं, परवडतं…एवढी वाईट अवस्था महाराष्ट्रानं स्वतःची करवून घेतलीय.
आपल्यावर अन्याय होत असूनही महाराष्ट्राने ‘राज्यघटना’ निमूटपणे बिनतक्रार पाळत, हे सगळे परप्रांतीय लोंढे सामावून घेतले… पण, ते आमच्या राजकारण्यांना आपल्या पंखाखाली घेत, आता आमच्याच मुळावर उठलेत….हो, आम्ही मराठी माणसं चुकलो, खूप खूप चुकलो आणि पिढ्यानपिढ्या त्याची फळंही भोगली की! अजून किती भोगायची? आम्हाला काय तुम्ही फासावर लटकवणार की काय? संबंधितांनो, लक्षात ठेवा, फासावर फक्त खून केल्यानंतरच लटकवता येतं!
आम्ही आजवर चुकीचे राजकारणी निवडले, चुकीचं राजकारण केलं…पण, याचा अर्थ, तुम्ही आमची मरणाची ‘कोंडी’ करायला मोकळे आहात, असा मात्र होत नाही. आमच्या उद्धारासाठी लोकशाही व सनदशीर मार्ग शोधायला आम्ही कधिही मोकळे आहोत आणि तो मार्ग आम्ही आमच्यासाठी निवडूच!
‘कंत्राटी-कामगार पद्धती’ने तुम्ही कामगार-चळवळचं नव्हे; तर मराठी-माणूसच संपवत आहात…ते ही त्याच्या हक्काच्या लालकाळ्या मातीच्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातून… हे ध्यानात न येण्याएवढे आम्ही मूर्ख, अज्ञानी नाही.
(क्रमशः)