‘४ काळ्या कामगार-संहिता’ (4 Black Labour-Codes), या ‘३ काळ्या शेतकी-कायद्यां’सारख्याच श्रमिकवर्गाचं दमन-शोषण करणाऱ्या असल्यामुळे…आम्ही सत्तेवर येताच त्या रद्द करु” ….इति, राहुल गांधी

नोकरी-सुरक्षिततेचा पायाच उखडून टाका; म्हणजे, कामगारांच्या एकजुटीची इमारतच उभी रहाणे नाही…”ना रहे बाँस, ना रहे बाँसुरी”, अशा भाजप-संघीय कुटील-विचारधारेवर आधारित आहेत, ‘४ काळ्या कामगार-संहिता’…!!!
सगळी भाजप-संघीय सरकारे वरकरणी पुतनामावशीसारखं कामगार-कर्मचारीवर्गाबद्दल खोटा कनवळा दाखवत आम्ही फक्त, या ‘४ काळ्या कामगार-संहितां’द्वारे सगळे कामगार-कायदे एकत्रित व सुटसुटीत केलेत, असं म्हणत असले; तरी ती त्यांच्या नेहमीच्या प्रचारकी ‘गोबेल्स-तंत्रा’सारखी ‘लोणकढी थाप’ आहे! ब्रिटनमध्ये ६५ हून अधिक तर, अमेरिकेत एकूण १८० च्या आसपास कामगार-कायदे प्रभावीपणे अंमलात आणले जात असताना…त्यांना आजवर कधि कुठली प्रशासकीय-अडचण जाणवली नाही; मग, भाजप-संघीय सरकारलाच, ती का व्हावी…??? …या प्रश्नातच, सगळं उत्तर आपसूकच आलं!
कामगारवर्गाला व भोळ्याभाबड्या जनसामान्यांना ‘हिंदुत्वा’च्या नावाखाली गंडवण्यासाठी…”श्रम, शक्ति, निती-२०२५” अथवा ‘मनुस्मृती, याज्ञवल्यस्मृती, नारदस्मृती, शुक्रनिती, अर्थनिती’ वगैरे संस्कृत-शब्दांचं अवडंबर माजवून, भुलवण्याचा (Sugar-Coating); भाजप-संघीय ढोंगी-शब्दबंबाळ ‘मुखवटा’ टराटरा फाडून, खरी विषाक्त-वस्तुस्थिती खालीलप्रमाणे अगदी थोडक्यात मांडता येईल…

** कामगारांच्या युनियन करण्याच्या कलम १९ (१) (क) खालील ‘घटनात्मक’ अधिकाराची व ‘आखरी रास्ता’ म्हणून संघटितरित्या ‘संप’ करण्यासारख्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जाऊन…काश्मिरी-दहशतवादापेक्षा खतरनाक असलेल्या ‘कंपनी-दहशतवादा’ला (Corporate-Terrorism) अजून भयंकर ऊत येईल आणि त्यातून पुढे, कामाच्या ठिकाणी व्यवस्थापकांकडून ‘बाॅलिवूड’सारख्या महिलावर्गाच्या लैंगिक छळवणुकीला व शोषणाला थेट चालना मिळेल…

** ‘वैयक्तिक-करार’ करण्याच्या ‘फोडा-झोडी’च्या कामगारघातकी तरतुदीमुळे…कामगार-संघटनेच्या सशक्त माध्यमातून पगार-बोनसवाढीचे करार करणं, अशक्यप्राय होणार…

** कामगार-कर्मचारीवर्गाच्या ‘कायमस्वरुपी’ नेमणुका बंद होऊन, ठराविक काळाकरीता नेमलेले ‘मुदतबंद-वेठबिगार’, ही ‘गुलामी-प्रथा’ सुरु होणार (थोडक्यात, ‘हायर अँड फायर’ धोरण येणार) व त्यातूनच, सर्वच कामगारांचं ‘माणूसपण’ संपणार आणि त्यांचं कारखान्यातल्या कच्च्यामालासारखं ‘वस्तूकरण’ होणार…

** तात्पुरती कामगार-कपात (Lay-offs), कायमची कामगार-कपात कायद्याने अगदी सहजसोपं होणार…

** ३०० हून कमी कामगार असलेल्या कंपन्या, एखाद्या नाक्यावरच्या पानठेल्यांसारख्या, सरकारी-पूर्वपरवानगीविनाच सहजी बंद करता येणार…

** ‘गुलामी व नव-अस्पृश्यता’स्वरुप असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात न्यायालयीन लढा लढणं अशक्यप्राय होणार…

** लढाऊ व प्रामाणिक कामगार-संघटनांची किरकोळ तांत्रिक सबबींखाली कायदेशीर असलेली ‘मान्यता’ रद्द करण्याचं भयंकर ‘भांडवली-षडयंत्र’…

** उद्योगाच्या व्याख्येत व कामगार-कायदे लागू होण्यासाठी आवश्यक किमान-संख्येत मोठे कामगार-घातकी बदल…
——————————
१) “भांडवली-व्यवस्थेचा ‘द्रोणागिरी’ पर्वत आपल्या हातावर उचलून धरणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या ‘हनुमाना’ला…४ नव्या कामगार-संहितांद्वारे ‘माकड’ बनवण्याचे भाजप-संघीय डावपेच मतपेटीतून उधळून लावा!”

२) “रामासाठी जन्मभूमी अयोध्येत ‘राममंदिर’…तर, औद्योगिक-सेवा क्षेत्रात कामगार-चळवळीसाठी ‘स्मशानभूमी’ तयार करणार्‍या…कामगार-शेतकऱ्यांचा नं. १ चा शत्रू असलेल्या भाजप-संघीय ‘मोदी-शाह’ सरकारचा त्रिवार निषेध! निषेध!! निषेध!!!”

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)