हे गणराया, गणनायका, बुद्धीदात्या, बुद्धीच्या देवता….

तू आज आलायस खरा,
पण, तुझ्यात ना, अलीकडे मला फार फार फरक जाणवायला लागलाय…
बुद्धीचं लेणं घेऊन तू येतोस खरा,
पण, हिंदुत्वाचं थोतांड माजवणाऱ्यांनी
अन् हिंदुत्वाच्या मखरात
तुझी ‘राजकीय-प्रतिष्ठापना’ करणाऱ्यांनी…
नासवलेल्या, नादावलेल्या
आमच्या मायमराठी लेकरांना अन् मोकाट सुटलेल्या मराठी तरुणाईला…
ते तुझं, बुद्धीचं लेणं द्यायला,
फारच तू विसरायला लागलायस हल्ली…
तेव्हा, बंगल्याबाहेर नाही का लावतात पाटी, “कुत्र्यापासून सावधान!”,
…तशी एक पाटी, मी तुझ्यासाठी बनवून आणलीय,
“बोगस हिंदुत्ववाद्यांपासून सावधान!”
…म्हटलं, न जाणो त्यांच्या सोंगाढोंगाला निदान तू तरी, फसायला नकोस!
…नाहीतर, बुद्धीचं दैवत, हा तुझा लौकिक डागाळणार नाही का?
…त्याला कारणही तसंच आहे, बाप्पा!
रस्तोरस्ती ‘डीजे’वर कर्कश्श गाणी लावून तुझ्या आगमनापासून विसर्जनापर्यंत…
कान फुटेस्तोवर ढोलताशे बडवून…हेच हिंदुत्वाचं सोंगढोंग वठवणारे, काय ती तुझी, भक्ति-आरती वगैरे करतात ना?
लंबकर्णा, त्या ध्वनी प्रदूषणानेच तुझे कान, प्रतिवर्षी अजून थोडे लांब लांब होतायत का रे?
…आणि, तरीही, त्या बेगडी भक्तिला तू फसलास तर,
केवढी पंचाईत व्हायची!
…रानडे, गोखले, आगरकरांचा विरोध डावलून,
टिळकांनी जनजागृतीसाठी तुला रस्त्यावर आणून ठेवला; तर, मुंबईतल्या उत्सवी-आयोजनात भिक्षुकीपेशाच्या…
अन्याय्य वर्चस्वाविरुद्ध बंड करुन उठलेल्या प्रबोधनकारांनी,
थेट, तुझ्या मूर्तिभंजनाची धमकी दिली होती…
…खरंतरं, इथपर्यंत सगळं ठीकच होतं, गणराया!
पण, मग सगळी बुद्धीच गहाण ठेवल्यासारखा, हल्ली उभा महाराष्ट्र…
गल्लोगल्ली-रस्तोरस्ती,पानठेल्यांसारखा उत्सवी ‘ठेला’ तुझा मांडून,
…आणि, मंडपाच्या पलिकडे “नोटबंदी तिथे ओशाळावी”…असा पत्त्यांचा भला थोरला जुगार मांडून,
घोर कलियुग कसं असतं, ते तुझं तुला दाखवलं जात असतानाही…
तू काहीही न करता, मणिपूर जळत असताना मख्ख बसणाऱ्या, दिल्लीश्वरांसारखा मख्खच कसा?
तू कुणा मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, ही पॅसिफिक समुद्रापारची हाक नाही…की,
दिल्ली पोलिसांसारखी तू पॅलेट-गन चालवावी,
लाठ्यांना खिळे ठोकावेत…अशीही आमची अपेक्षा नाही;
पण, मराठी ‘जेन-झी’ला तू काही आवर घालशील की, नाही?
…हे असं बेजबाबदार वागणं, बुद्धीदात्या शोभतं तुला?
तू स्वतःला भारताचा पंतप्रधान समजतोयस की काय, असं बेजबाबदार वागायला??
…आणि, हे बघ, तुला खरंच पंतप्रधान व्हायचंच असेल ना, गजानना; तर तुझ्या लंबकर्णात नागपुरी गुज्जूगुपित (गुजगुपित नव्हे) सांगतो…
इथे तवा आयताच तापलेला आहे…तू फक्त पोळ्या लाटायची तसदी घे!
(पोळ्यांवर भागवायचं हं…तसंही गूळपीठ महागल्याने, मोदकाचा प्रसाद, खिशाला अंमळ भारीच रे गणराया; तेव्हा जरा समजून घे)…
सांगायचा मुद्दा; तुला त्या EVM किंवा SIR घोटाळ्यांचा आसरा घ्यायची गरजच नाही, बाप्पा!
आधीच ‘मंद’ बुद्धीचे भक्त ‘अंध’, भारतभर हातपाय पसरुन बसलेत…त्यात, तुझ्या ‘डीजे’वाल्या ‘ढ’ भक्तांची मोठी भर!
अरे मग, लागली की आपली संसदीय ‘मेजाॅरिटी’ची सोय…टेन्शन कसलं?
‘कमोड’वर सुद्धा ‘इलेक्शन-मोड’मध्ये बसत…नायडू-नितीशच्या नाकदुर्‍या काढायचं,
…ते आघाडीबिघाडीचं, आता झंझटच नाही!

हे बघ, तुझ्यावर मी उगीच काही आरोप वगैरे करत नाहीय की, खोटंही बोलत नाही…
खोट्टं खोट्टं पण, ते रेटून मोठ्ठं मोठ्ठं बोलणं शिकायला, मी काही…
५२ वर्षे तिरंगा न फडकवणाऱ्यांच्या कुठल्या शाखेत…
कधि हाफ-पँट घालून गेलेलो नाही…की,
उगीचच विरोधकांवर बेछूट आरोप करायला
…आणि ‘ठरवून’ कुणाकुणाची खोटी बदनामी करायला,
‘भगव्या’ राजकीय तालमीतही तयार झालेलो नाही….
…तू विघ्नहर्ता ना रे?
मग, तुझे भोंदू हिंदुत्ववादी भक्त, विघ्नकर्ते कसे?
…ते ही, फक्त आपल्या विरोधकांच्या बाबतीतच??
तू जसा “गणानां त्वां गणपती” म्हणजे, गणांचा नायक म्हणून तुझ्या ‘गणा’त सामील होणार्‍यांचं रक्षण करतोस ना…
तसेच हे, सत्ताधारी ‘दिल्लीश्वर’सुद्धा,
उफराट्या पद्धतीने का होईना; पण, एकदा का कुणी त्यांच्या भगव्या वा राममंदिर-चंदाचोर ‘भामट्या’ गणात सामील झाला रे झाला की, बघ…
“संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे” अशी वाॅशिंग-मशिनमधल्या कपड्यांसारखी एकदम पलटी मारुन,
विघ्नकर्त्याचे त्यांच्यासाठी, तुझ्यासारखेच डिट्टो विघ्नहर्ते होतात!
…सध्या महाराष्ट्रात, ‘दिल्लीश्वर’ ज्यांना पावला, अशा गणांची संख्या,
“सूरत ते गोवा, व्हाया गुवाहाटी” पंचतारांकित प्रवास करत,
…एकदाची जी “अलिबाबा आणि चाळीस चोरांएवढी झाली”, ती संख्या “वाढता वाढिता वाढे भेदिले संसद-मंडळा” म्हणून, अजूनही देशभर पुढे ‘सिंहासन बत्तिशी’सारखी वाढतच चाललीय की रे बाप्पा…आहेस कुठे तू?

…बाकी काही म्हण, पण ‘लंबोदरा’, तुझं सुटलेलं पोट मात्र, हल्ली पार खपाटीला जात चाललंय…आमच्या महाराष्ट्रातल्या कंत्राटी-कामगारांसारखं!
…एवढी त्यांच्याविषयी सहसंवेदना बरी नव्हे गणराया…त्याचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो रे ‘राजा’ (हे आपलं मुंबईतलं तुझं खास संबोधन)!
अरे, तुझ्यापेक्षा ते आजमितीला, हाताच्या बोटावर मोजण्याएवढे शिल्लक राहीलेले,
कंपन्यांमधले ‘कायम कामगार’ बरे शहाणे म्हणायचे की रे…
…कारण, त्यांना खेटूनच गुलामासारखं राब राब राबणार्‍या कंत्राटी-कामगारांकडे, ढुंकून पण पहात नाहीत ते!
आपले स्वतःचे पगार-बोनस वाढल्याशी त्यांना मतलब!
…कशाला उगीच बाता मारत बसायच्या आपण कामगारधर्माच्या, रे गणराया?
हं आठवलं…देवा, तुला त्या अग्निपथावरील भग्नवीरांच्या ‘वाळक्या’ पोटाची समस्या, अंतर्ज्ञानाने आधीच समजली, म्हणून तर, तू एवढा वाळलास नाहीस ना रे?
कसल्या ‘लष्करा’च्या भाकर्‍या भाजू पहातोयस गणेशा,
…हो की, जरा प्रोफेशनल!

…बरं हे बघ, तू जाच्यावर बसून आलायस ना; त्या तुझ्या मूषकाला तरी आवर बाप्पा,
तुझा तो ‘वाहन’ वगैरे आहे, हे ठीक…
पण, सध्या त्याने महागाईचं उग्र रुप धारण केलंय…
तुझं वाहन मूषक, सरळ रोखठोक भाषेत सांगायचं तर…
तुझा तो उंदीर, ‘महागाईचं प्रतीक’ बनलाय!
…सारखा आपला आमचा खिसा, सरावलेल्या खिसेकापूसारखा कातरत असतो,
वर चिंचोळ्या तोंडातून कर्णकटू हिंदुत्वाचा ‘चित्कार’ की ‘फुत्कार’ काय म्हणतात तो, सारखा टाकत असतो!
…जीव आमचा नुसता नकोसा केलाय मेल्यानं, आवर त्याला!

सरतेशेवटी गजानना, गणराया… जे जाणवलं ते अखेर धाडसानं बोलतोच; अगदी जंतरमंतरवरच्या जेन-झी सारखं!
तुझा प्रेमळ दयाळू, कृपाळू असणारा चेहरा…हल्ली काहीसा उग्र, संतप्त का दिसू लागलाय, बाप्पा?
तुझा देह म्हणजे, मनुष्ययोनी आणि मस्तक म्हणजे, पशुयोनी…यातून, ८४ लक्ष योनिंमधल्या एकत्वाचा किंवा अद्वैताचा,
“तत् त्वम् असि” असा, हिंदुत्वाचा महान संदेश देणार्‍या मंगलमूर्तिराया…
अरे आम्ही सारे मानव मातलो, उन्मत्त झालो…
त्यातून निसर्ग-पर्यावरणाचा, वन्यजीवांचा, जलचरांचा, पक्षी-कीटकांचा…
केवढा विध्वंस करुन बसलोय आम्ही…भौतिक ‘विकासा’च्या नादानं!
…खूप खूप संतापलायस का रे, तू आम्हा मर्त्य मानवांवर?
तुझं विसर्जन दरवर्षी आम्ही करता करता,
त्या आमच्या अक्षम्य अपराधाची सजा म्हणून,
जागतिक-तापमानवाढीच्या पर्यावरणीय महासंकटातून, होऊ घातलेल्या जगबुडीत; तूच, आमचं विसर्जन करण्याची…”वार्ता विघ्नाची” देऊ पहातोयस की, काय…???

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)