विश्वगुरूंचा नेतान्याहूंना लोकशाही, EVM आणि निवडणूक-विजयाचा काल्पनिक गुरुमंत्र…!

आपला खासमखास इस्त्रायली दोस्त ‘बिबी’, निवडणुकीत मार खात असताना आणि विरोधकांवर निवडणुकीत पैसा-वाटपाचा आरोप करत असताना…आमचे दिल्लीश्वर ‘विश्वगुरु’ गालातल्या गालात छानसे मिस्कील हसले आणि दोस्ताला चार सांत्वनाचे शब्द फोनवर ऐकवताना म्हणाल्याचं समजतं,

“नेतान्याहू दोस्ता, तू अगदीच पोरकट निघालास रे…मी तुला कित्ती कित्ती हुश्शार समजत होतो आणि तू किती बावळट निघालास? अरे बघ, आम्ही भाजप-संघीय लोकं, एवढी ‘स्मार्ट’ की, आमच्याकडे आम्ही खुलेआम PMCare Fund, इलेक्टोरल-बाॅण्ड्स, बोगदे-पूल व महामार्ग कंत्राटांतली भरभक्कम टक्केवारी व टोलवसूली आणि शिवाय, अंबानी-अदानीसारख्या लंगोटीयार दोस्तांकडून कित्येक टेंपो भरभरुन ‘निवडणूक-चंदा’ (जोडीला अयोध्येतल्या राममंदिरातली ‘चंदाचोरी’, तोंडी लावण्यापुरती असते) वगैरे गोळा करतो…तो पैसा राजरोस वाटतो आणि मतदारांची मतं बोली लावून सर्रास विकत घेतो…तुला असलं काही सुचलं नाही का, बिबी? हल्ली तर निवडणुका हमखास जिंकण्याची ‘नवी आयडिया’ म्हणून, आम्ही ‘लाडक्या बहिणीं’ना महाराष्ट्रात ‘दीड हजार’ तर, बंगालमध्ये ‘जनसुराज’च्या प्रशांत किशोरमुळे, थोडी हवा टाईट होती आमची म्हणून दहा हजार’ वाटले; ते ही, पक्षाच्या भरगच्च ‘काळ्या’ खिशाला बिलकूल चाट न देता, सरकारी-तिजोरीतूनच परस्पर व्यवस्था लावतच…पुढल्या वर्षी तर बघ, आमच्या उ. प्रदेशच्या निवडणुकीत आम्ही लाडक्या बहिणींना ‘पन्नास हजार’ वाटले तरी, आश्चर्य वाटून घेऊ नकोस! एक गोष्ट मात्र माझ्या कानात सांग, तुझ्याकडूनच आम्ही उसनवार घेतलेल्या ‘पेगॅसस’ टाईपचीच छुपी साॅफ्टवेअर्स वापरुन, निवडणुकीतली ‘EVMs’ आम्ही बिनधास्त ‘मॅनेज’ करत असताना; तू गलदटासारखा अजून जुन्यापुराण्या मतपत्रिकांमध्येच अडकून पडलायस? बरं, एवढीच व्यवस्था लावून थांबणारे, ते आम्ही नव्हेच; आमची ‘नागपुरी-शिकवण’च ‘लय भारी’ बघ! आम्ही चक्क निवडणूक-आयोग, सरन्यायाधीशांसारख्या बड्या हस्तींना, काखेत मारुन ‘SIR’सारख्या राज्यघटनेला धाब्यावर बसवणार्‍या मतदान-प्रक्रिया, बुलडोझर फिरवल्यासारख्या देशभर सुरु केल्यात…नेहमीच काय आम्ही चोरीचपाटीचे धंदे तुझ्याकडून शिकायचे? कधितरी, तू सुद्धा आमच्याकडून काही शिक! तू काय आयुष्यभर त्या पॅलेस्टाईनी आणि लेबॅनाॅनवाल्यांवरच तुझे ते ‘मर्कावा’ रणगाडे फिरवणार काय? कधि निवडणुकीत आपल्या नागरिकांवर पण फिरव, आमच्या ‘SIR’सारखे! फोन ठेवताना, तुला एक विनंती करतो बाबा, ते तुझे निवडणुकीचे निकाल लवकर लाव की…दोनतीन दिवस उलटून गेले तरी, अजून निकाल पूर्ण झाले नाहीत म्हणजे रे काय? अरे इकडे आम्ही, सत्वर निकाल लागावेत म्हणून ती ‘EVM’ची धोंड, समस्त भारतीयांच्या गळ्यात मारुन ठेवलीय…तू ही अशी निवडणुकीतली दप्तरदिरंगाई शांतपणे खपवून घेण्याने, आमच्या इकडे लोकं ‘मतपत्रिके’वर मतदानाची मागणी नाही का करणार? लक्षात ठेव, दोस्ताला मदत करावी; त्याला अडचणीत कधि आणू नये…त्यालाच ‘दोस्ताना’ म्हणतात, “तोदा रबा” (Toda Raba / תודה רבה)!”

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)