“राजकीय हत्या आणि पैसा”, या जुगलबंदीतून ‘सत्ता एके सत्ता’…असा ‘राजकीय सट्टा’ लावणाऱ्या ‘सत्ताबाजां’नी आरंभलेला “विकास नावाचा विनाश”! (धर्मराज्य-लेख मालिकेतील लेख क्र.१)

“राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी”, इति, एकनाथराव शिंदे

(महाराष्ट्रातल्या कडकडीत दुष्काळी परिस्थितीत…सत्ताधाऱ्यांच्या कंत्राटदार दोस्तांवर, सरकारी तिजोरीतून नाशिकच्या कुंभमेळ्यात ३५ हजार कोटींच्या चाललेल्या उधळणीच्या पार्श्वभूमीवरील वाक्ताडन….)

‘दिल्लीश्वर’ दोन गुज्जू आणि अंबानी-अदानीसारखा ‘भांडवलदार’ गुज्जू-शेठजीवर्ग…यांना सांभाळताना, एकनाथरावांची चाललेली, डोंबाऱ्यासारखी तारेवरची कसरत व त्यांची उडत असलेली त्रेधातिरपीट, ही एक राजकीय शोकांतिका म्हणायची की, काळाने उगवलेला सूड? …त्यातूनच, अशी बेजबाबदार वाक्ताडनं बाहेर पडत असतात.
तेव्हा, मराठ्यांनो, एकनाथरावांचं हे असलं… लोकशाहीविरोधी व संविधानविरोधी, संतापजनक वक्तव्य पहाता…जरा आपल्या धर्मसंप्रदायी-नशेला आणि फाजील-उत्सवप्रियतेला, आतातरी ‘राजकीय-जागृती’ची फोडणी द्या; तर आणि तरच, तुम्हाला आकळून येईल की, “संत एकनाथ ते ‘नागपुरी’ देवेंद्रनाथ आणि ‘सातारकर’ एकनाथ”, हा कसा आणि किती, महाराष्ट्राचा दुर्दैवी उलटा प्रवास सुरु आहे तो!

गौरीगणपती, दहीहंडी, दसरा आणि येऊ घातलेल्या दिवाळीच्या कर्णकर्कश्श गोंधळाचा आसरा घेत…देशभरातील निवडणुकांमध्ये झालेल्या मतांच्या राजरोस चोरीवरुन (Via EVM + SIR) व त्यासंदर्भातील, राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखालील ‘व्होटचोर गद्दी छोड’ आंदोलनावरुन आणि महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरुन…तुमचं लक्ष, सहजी भरकटत दूर नेता यावं आणि त्या भरकवटण्यातून, सरकारी-तिजोरीतला तुमचा पैसा लुटता यावा म्हणून; सध्या सुरु झालीय; “नाशिकच्या तपोवनातील हजारो वृक्षांची निर्घृण कत्तलीसह, ‘कुंभमेळा’ नावाच्या ‘दंभमेळ्या’ची ३५ हजार कोटींची जोरदार तयारी!”

देवेंद्रनाथ आणि एकनाथ’ या दोघांची पावलं, अगदी अचूक ‘नाॅन बायाॅलाॅजिकल’ विश्वगुरुंच्या पावलावर पडायला लागलीयत; दिल्लीश्वर ‘नरेंद्र महाराज’, वाराणसीत दिवे पाजळतात; तर आमचे महाराष्ट्रीय मंत्रीद्वय, नाशिकच्या कुंभमेळ्यात!
एकनाथराव नाशिकला म्हणाले, ते तसं सत्यच आहे की, “आपली भूमी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव वगैरे संतसज्जनांची आहेच; पण, एकनाथरावांना हे कुणीतरी सांगायला हवं की, ती, लाखोंचे निर्बुद्ध कळप बाळगणार्‍या व ‘भांडवली-व्यवस्थे’चा हात धरुन ‘धर्माचा धंदा’ चालवणाऱ्या महाराष्ट्रभरातल्या आधुनिक बोगस संतांची नक्कीच नव्हे!

…लक्षात ठेवा, त्यासाठीच संत तुकारामांनी म्हणूनच सांगून ठेवलंय,

“ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करोनी म्हणती साधू ||१||
अंगा लावूनिया राख | डोळे झांकुनी करिती पाप ||२||
दावुनि वैराग्याची कळा | भोगी विषयांचा सोहळा ||३||
तुका म्हणे सांगो किती | जळो तयांसी संगती ||४||”

तर, संत एकनाथ, यासंदर्भात सांगून गेलेत….

“कलिमाजी दैवते उघड दिसती फार |
नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ||१||
लटिका देव, लटिका भक्त लटिके सर्व वाव |
सात धान्याचे धपाटे, मागती काय त्यांचा बडिवार ||२||
तेल, रांधा मागती मलिदा वरती काजळ कुंकू |
फजितखोर ऐसे देव तयाचे तोंडावर थुंकू ||३||”

…आणि, आमचे ‘देवेंद्रनाथ आणि एकनाथ’ निघालेत, अशा लोकांवर ३५ हजार कोटींची उधळण करायला.

देवेंद्रनाथांचं एकवेळ ठीक, ते तर त्या ‘नागपुरी’ पठडीतलेच जन्मजात ‘पैलवान’च…पण, ‘सुरत ते गोवा, व्हाया गुवाहाटी’ असा लांबवरचा प्रवास पार पाडून, नागपूर दफ्तरी दाखल झालेले एकनाथराव शिंदे, हे ‘कानामागून आले आणि तिखट झाले’…या उक्तिनुसार, भाजपच्या अन् संघाच्या तालमीत, तेल लावून कसून सराव केलेल्या पैलवानासारखे, देवेंद्रनाथांनाही वरचढ ठरतील, असे एकदम पट्टीचे तरबेज झालेत. त्यामुळे, सध्या अतिशय महागड्या होत चाललेल्या लुटारु ‘खाजगी’ आरोग्य व शिक्षण सेवा, कंत्राटी-कामगारांची तुटपुंज्या पगारातील ‘गुलामगिरी’, काँक्रीट-बांधकामांतील बक्कळ पैशासाठी शहरं-उपनगरांतून बोकाळलेली गुन्हेगारी-खुनाखुनी किंवा काँक्रीट बांधकामासाठी-खाणकामासाठी लाखो झाडांच्या चाललेल्या निर्घृण कत्तलीसारख्या…मोठ्या प्रश्नांना ते अजिबात हात घालताना दिसत नाहीत. तसेच, हे सगळं काँक्रीट बांधकाम व खाणकामांचं आक्रित घडत असताना, त्यातून होणाऱ्या कार्बन-ऊत्सर्जनामुळे ‘जागतिक-तापमानवाढ’ होऊन, पुढील पिढ्यांचं अस्तित्व झपाट्याने धोक्यात येत असण्याच्या गंभीर प्रश्नाबाबत, ते एकतर अज्ञ आहेत किंवा पूर्णतया बेफिकीर आहेत…ते फक्त, ‘हिरवा व तिरंगा’ द्वेषी, ‘नागपुरी पॅटर्न’प्रमाणे ‘प्रतिकात्मक’ (Tokenism OR Symbolic…Based On Fake-Narratives) व भावनिक द्वेष-विद्वेषाचं राजकारण करण्यास कमालीचे सरावलेत!
…’ट्रिपल-इंजिन’ मंत्रिमंडळात, अशी एकेक ‘राजकीय पात्रे’ भरलेली आहेत की, त्यांना दुष्काळामुळे कोरडी पडत जाणारी ‘नदी पात्रे’ नाही दिसत…तुटपुंज्या पगारात जेमतेम तगणार्‍या व कधिही नोकरी गमवावी लागणार्‍या कामगारांच्या आणि पीक सुगीवर आलं असताना पावसाअभावी पीक हातचं जाणाऱ्या शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू नाही दिसत… त्यांच्या नजरेला अचूक दिसते ती, फक्त विविध कंत्राटांतून मिळू शकणारी मलई; मग, जीव कुणाचा का जात राही ना!

त्यामुळेच, हे सगळेच सराईत व धंदेवाईक राजकारणी… कंत्राटी-कामगार पद्धत, कंपनी-दहशतवाद (Corporate-Terrorism), अग्निपथातली लष्करी-गुलामगिरी, बेरोजगारी-अर्धरोजगारी, भडकती महागाई, पुढच्या पिढ्यांचा घास घेणारा निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस वगैरे बाबत इतके मूग गिळून गप्प आहेत की, कधि वाटतं, “नागपुरी रेशीमबागेने शिकवलेली, ‘हिरव्या’ रंगाशी दुश्मनी, त्यांच्या रक्तात एवढी खोलवर उतरलीय की, देशभरातली सगळी ‘हिरवाई’च, हे त्या खुन्नसपोटी नष्ट करायला निघालेत!”

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)