“सेवा-उत्पादन क्षेत्रात बोट धरायला दिल्यावर, ‘भांडवली-व्यवस्था’, लष्करात शिरुन हात धरायला धजावली!”

१४ जून-२०२२ मध्ये सुरु करण्यात आलेली ‘अग्निपथावरील अग्निवीर योजना’ ही, प्रत्यक्षात सेवा व औद्योगिक क्षेत्राला ग्रासणार्‍या ‘कंत्राटी-कामगार पद्धतीचाच विस्तार असलेली (Extention)…लष्करी-गुलामगिरी व लष्करी-नवअस्पृश्यताच निर्विवादरित्या होती…!!!
—————————-
…त्याविरोधात, “हा कंत्राटी-कामगार पद्धतीचाच एकप्रकारे, अत्यंत घृणास्पद ‘भाजप-संघीय’ आविष्कार आहे आणि संस्कृतमधील मोठमोठे बोजड शब्द वापरुन (उदा. अमृतकाळ, नमामि गंगे, आयुष्मान भारत, शास्त्र चूळामणी, अष्टादश वगैरे वगैरे)…त्या ‘गुलामगिरी आणि नवअस्पृश्यते’ला, संस्कृतभाषेच्या गोंडस आवरणाखाली झाकण्याचा भाजप-संघीय धोरणकर्त्यांचा अश्लाघ्य प्रयत्न आहे”, अशी जागृतता निर्माण करण्यात ‘धर्मराज्य पक्षा’नेच सर्वप्रथम पुढाकार घेतला होता.
आमच्यासारख्यांच्या अथक प्रयत्नांती, ही दाहक-संतापजनक वस्तुस्थिती, सर्वांच्याच ध्यानी आली व डाव्या राजकीय मंडळींसह काँग्रेसचे अध्वर्यू राहुल गांधी, यांनी त्यावर देशभरात जोरदार आवाज उठवला…त्याची परिणती म्हणून, लष्करातदेखील ‘पंक्तिभेद’ निर्माण करण्याचा, हा भाजप-संघीयांचा डाव, त्यांच्या चांगलाच अंगलट आला. शिवाय, उपलब्ध माहितीनुसार, जसजशी पहिल्या पलटणीतल्या अग्निवीरांची, ‘मुदतबंद’ व त्यांना लष्करी सन्मान व सेवासुरक्षा नाकारणारी…औटघटकेच्या लष्करीसेवा समाप्तीची वेळ उंबरठ्यावर येऊन ठेपली; तसतसा, या ‘अग्निपथावरील अग्निवीरां’मधला असंतोष, एवढा टीपेला पोहोचला होता की, त्यातून ही शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेली तरुणाई, कुठे रक्तरंजित ‘विद्रोह’ तर करणार नाही ना…या भितीने दिल्लीश्वरांना ग्रासले आणि दिल्लीत, दिवाळीच्या थंडीविनाच, ते गारठले.
जातीजमातींमध्ये असेच ‘पंक्तिभेद’ करत, मूठभर वर्णवर्चस्ववाद्यांनी शेकडो-हजारो वर्षे अनिर्बंध सत्ता गाजवण्याचा…भाजप-संघियांचा पिढ्यापिढ्यांचा अनुभव, देशभरातून आमच्यासारख्यांनी आवाज उठवल्याने कामी आला नाही. लष्करासारख्या संवेदनशील क्षेत्रात, चुकूनही असले आततायी प्रयोग, कुठल्या राष्ट्राने फारसे कधि केलेले नाहीत आणि ज्या पाश्चात्य देशांनी, ते चुकूनमाकून कधि केलेत (ते ही, नियमित लष्करी जवानांप्रमाणे उत्तम वेतनमान-सोयीसुविधा देऊनच); ते देशांतर्गत उसळलेल्या तीव्र विरोधामुळे, काही काळातच मोडीत काढलेत.
…लक्षात घ्या, आपल्याकडचा ‘अग्निपथावरील अग्निवीरा’सारखा, धोकादायक ‘पंक्तिभेद’ निर्माण करणारा लष्करी-प्रयोग, या भाजपाई सरकारने पूर्णपणे निकालात काढलेला नाही. फक्त, दोन वर्ष मुदतवाढीच्या पहिल्या घोषणेनंतर लागलीच दुसर्‍या दिवशी, सर्वच्या सर्व अग्निवीरांना (शारीरिक क्षमतेत व लष्करी शिक्षणात कमी पडणारे काही अपवाद वगळता) नियमित लष्करी सेवेत घेण्याची, लगोलग दुसरी घोषणा करण्यात आली…त्यातूनच, त्या योजनेविरोधातली लष्करी-खदखद, आपल्याला सहजी समजून येते.
हा ‘अग्निपथातल्या अग्निवीरां’च्या गुलामगिरीचा अघोरी प्रयोग, मुळातूनच कायमचा निकालात काढला गेला पाहीजे, ही ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाम मागणी आहे.

…कामगारांकडून, कुठल्याही प्रकारचा शस्त्रसज्ज उठाव होणं, संभवतः अशक्य आहे; हे आपली भांडवली-व्यवस्था चांगलंच जाणून आहे. एवढंच नव्हे, तर फ्रान्स, इटलीसारख्या देशांप्रमाणे…आपल्या हक्कांबाबत कमालीचा जागरुक असणारा कामगार, आपल्या हक्कांवर यःकिंचितही गदा येताच, प्रसंगी हिंसक बनून रस्त्यावर उतरतो; तशीही भिती, इथल्या व्यवस्थेला अजिबात उरलेली नाही;
कारण, १) जाहिरातबाजीद्वारे भौतिक-गरजा वाढवत कामगार-कर्मचाऱ्यांना कर्जाच्या कर्जाच्या सापळ्यात अडकवणं २) क्रिकेटसारखे वर्षाचे बारा महिने चालणारे ‘खेळमहोत्सव’, !¡सणवार-पूजा वगैरे सार्वजनिक-उत्सव, सिनेमा-मोबाईल वगैरे माध्यमातून चालणारी अतिरेकी करमणूकप्रधानता; तसेच नाचगाणी-पार्टीसंस्कृतीचं आयोजन (ज्याला, हल्ली अन्यायी-शोषक व्यवस्थापने, मुद्दाम प्रोत्साहन देत रहातात) व कामगाराला ‘दैवाधीन’ बनवणारी ‘धर्मसंप्रदायी नशा’ ३) आणि, अर्थातच दारुची नशा, जुगार वगैरे कामगारांमधील व्यसनाधीनता …याद्वारे, सगळ्या कामगार-कर्मचारीवर्गाला पूर्ण नपुंसक व पराकोटीचे स्वार्थपरायण बनवून, त्यांची लढण्याची प्रेरणाच नष्ट केलीय व एकप्रकारे भांडवली-व्यवस्थेने त्यांना ‘पशुयोनी’त ढकलून दिलंय ना!

‘संपत्तीचा निर्माता’ असलेल्या सृजनशील कामगारवर्गाने फ्रान्स, इटली इ. देशातल्या कामगारांसारखे हिंसक होऊन रस्तोरस्ती उतरत, सार्वजनिक-मालमत्तेचं नुकसान करणं अयोग्यच; पण, किमान कामगारशक्तिची निर्धारपूर्वक मोट बांधत, त्याच्या संघर्षमय सांघिक-प्रयोजनाद्वारे अन्यायी-अत्याचारी-शोषक भांडवलदारांना, प्रसंगोपात्त कामगारवर्गाने गुडघे टेकायला लावायलाच हवेत… पण, दुर्दैवाने विसावं शतक संपता संपता, आपल्याच स्खलनशीलतेनं समस्त कामगार-कर्मचारीवर्ग, त्याकामी आवश्यक असलेला ‘कामगारधर्म’ आपल्या रक्तात भिनवून घेणं नाकारत आलाय… त्यामुळे, ही रक्तपिपासू-निर्दय-शोषक ‘भांडवली-व्यवस्था’ (Vampire-StateSystem), त्याला बेधडक गृहीत धरुन बेफाम वेगात पुढे चाललीय.
…जशी, थोडीबहुत सुधारणा ‘अग्निपथातल्या अग्निवीरां’च्या गुलामगिरीत, होताना आपल्याला नुकतीच दिसली; तसं काही औद्योगिकविश्वात घडणं शक्य कोटीतलं आहे का?
उलट, त्याऐवजी, बेफिकीर-निद्रिस्त-व्यसनी कामगार-कर्मचाऱ्यांमुळे दिवसेंदिवस कंत्राटी-कामगार पद्धतीतली ‘गुलामी व नव-अस्पृश्यता, अधिकाधिक नृशंस व शोषक होत चाललीय… “४ नव्या काळ्या कामगार-संहितां”च्या माध्यमातून ती रोज नवी उंची गाठू लागलीय; सांगा, ही कुणाकुणाची पापं आणि ती पापं मोजायची कुणी, शिक्षा द्यायची कुणी व कुणाकुणाला…???
…तेव्हा, किमानपक्षी, अंधाराने घेरुन टाकलेल्या कामगारविश्वाच्या अंतरी, दुष्काळासोबत आलेल्या या वर्ष-२०२६च्या दिपोत्सवात, अंधार चिरणारा एखादा ‘जागृतीचा दिवा’ लावण्याचा हा प्रयत्न आहे, एवढंच…’अत्त दीप भव’, या गौतम बुद्धांच्या शिकवणुकीला स्मरुन…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)