“ठाणे मध्यवर्ती कारागृहाचं प्रस्तावित स्थलांतर; भिवंडीतील पिसे, अमणे येथे ५० एकर जागेवर ५ हजार क्षमतेचे नवे कारागृह उभारणार….” एक बातमी

“देवेंद्रनाथ आणि एकनाथ”, या मंत्रीद्वयाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, कुठला ‘भस्म्यारोग’ लागलाय की जेणेकरुन, हे सगळंच ‘स्वाहा’ करायला निघालेत…???”
—————————————————————
गेल्या दशकाभराहून अधिकच्या काळातील भ्रष्ट-बेकानूनी कारभाराची चौकशी होऊन NDA सरकारमधल्या अनेकांना खात्रीने तुरुंगवास भोगावा लागेल; त्यांची संख्या फार मोठी असेल… त्यासाठी, खास मोठ्या तुरुंगाची गरज होतीच; ती या निमित्ताने पूर्ण होणे ठीक.
पण, इतर सामान्य गुन्हेगारांसाठी ठाण्याचा ऐतिहासिक तुरुंग शिल्लक राहिलाच पाहीजे आणि तो रहावा म्हणून, ठाणेकरांनी या भस्मासुरांना सत्तेवरुन पाय उतार केलं नाही; तर, ही मंडळी ठाणेकरांच्या छाताडावर थयथया नाचल्याशिवाय रहाणार नाहीत. दुर्दैवाने आता शहरात मूळ मायमराठी ठाणेकर इतके संख्येने घटलेत आणि परप्रांतीय इतके वाढलेत की, आता कुणाचा पायपोस कुणात राहिलेला नाही. या शहराचं काय होतंय, याच्याशीही फारसं कोणाला देणंघेणं नाही; फक्त, आपल्यापुरती कुठली समस्या उभी राहिली की, सोसायट्यांमधली एकजात सगळी मंडळी रस्त्यावर उतरण्याचा ‘नया जमाना’ शहरं-उपनगरांतून आलाय. तेवढ्यापुरतंच, त्यांचं ‘सामाजिक भान व आंदोलकत्व’ मर्यादित असतं; बाकी इतरेजनांचं काय होतं, कुणाचा जीव जातो…याच्याशी, या नवश्रीमंत मध्यमवर्गाला काहीही सोयरसुतक उरलेलं नाही.
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी, याप्रकरणी नेहमीप्रमाणेच आवाज उठवल्याचं समजतं; पण, जसं दिवाळीतल्या फटाक्यांच्या दणदणाटाने करमणुकीपलिकडे काही होत नाही…तसंच, “नवे बांधा, पण जुने ठेवा”, या त्यांच्या नुसता फुसका बार टाकण्याने, काहीही पुढे घडणे नाही! त्यासाठी, उरल्यासुरल्या जागृत ‘ठाणेकर-संवेदना’ एकत्रित गोळा व्हायला हव्यात आणि त्याच्या दणदणीत विस्फोटाने, या राजकारणी बिल्डर-लाॅबीचे ‘काँक्रीट-बांधकामां’चे व त्यातले अब्जावधी रुपये कमावण्याचे मनसुबे ढासळवले गेले पाहिजेत.
‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन आम्ही सातत्याने “राजकारणी एकवेळ चोर-दरोडेखोर असला तरी चालेल (बहुतांश तसे असतातच); पण तो ‘बिल्डर’ असता कामा नये”, हे कंठशोष करुन सांगत असतो…त्याचीच, ही सगळी कटू फळं आहेत आणि ठाण्यापुरतं बोलायचं तर, इथली ९०%हून अधिक राजकारणी मंडळी एकतर स्वतः ‘बिल्डर’ आहेत, बिल्डर्सचे उघड वा छुपे भागीदार आहेत किंवा किमानपक्षी ‘टक्केवारीचे लाभार्थी’ आहेत.

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

__________________________________________

Source: Loksatta
https://share.google/sKdGIOFmd4zshLDFS

__________________________________________