(अनेक वाचकांनी व कार्यकर्त्यांनी, दिवाळीच्या सणादरम्यान, ही लेखमालिका जरा रोखून धरण्याची विनंती केली होती; दिवाळसणाचा ‘हँगओव्हर’ सरताच, उर्वरित लेखमालिका वाचकांसमोर सादर….)
“राजकीय हत्या आणि पैसा”, या जुगलबंदीतून ‘सत्ता एके सत्ता’…असा ‘राजकीय सट्टा’ लावणाऱ्या ‘सत्ताबाजां’नी आरंभलेला “विकास नावाचा विनाश”! _(धर्मराज्य-लेख मालिकेतील लेख क्र.२)
—————————–
…ज्या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी तपोवनातील हजारो महाकाय वृक्ष धाराशायी होताहेत; त्या कुंभमेळ्याची परंपराच मुळात मोगल सम्राट अकबराने सुरु केली होती! अकबराने सर्वप्रथम डुबकी घेत स्नान केलं होतं; म्हणूनच, त्या स्नान-परंपरेला ‘शाहीस्नान’ म्हटलं जातं! जसं शहरांची नावं बदलून शहरं बदलत नाहीत; तसंच, ‘शाहीस्नान’ परंपरेचं नाव, ‘अमृतस्नान’ करुन ऐतिहासिक वस्तुस्थिती बदलत नाहीच.
“दंडकारण्यातील वनवास काळात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीतील पंचवटी भागात ‘तपोवन’ आहे”, हे या परमपवित्र पुराणवृक्षांच्या ‘हत्यार्या’…’जय श्रीराम’वाल्या ‘वाल्याकोळ्यां’ना माहीत नाही? तपोवन परिसरातच औषधी वनस्पतींसह वड, कडूलिंब, चिंच आणि जांभूळ यांसारखी एतद्देशीय, “शेकडो वर्ष जुन्या घनदाट सावलीच्या व जैव-परिसंस्थेसाठी अत्यंत संवेदनशील अशा वृक्षप्रजाती आहेत”, हे त्या ढोंगी-बनावट रामभक्तांना ज्ञात नसावं?? पण, एकदा का, भोंदू हिंदुत्वाचा चष्मा चढवून ‘सत्ता एके सत्ता’…असा ‘राजकीय सट्टा’ लावला की, “विनाशसुद्धा विकास” भासायला लागतो आणि मग, तोच बनावट हिंदुत्वाचा ‘बुरखा’ पांघरुन (बुरख्याची तीव्र ‘ॲलर्जी’ असतानाही)…तो ‘विनाश’, विकासाच्या नावाखाली भोळसट-अज्ञानी जनतेच्या पदराला बांधावा लागतो!
“राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी” असं राज्यघटनाविरोधी व लोकशाही-व्यवस्थेला घातक वक्तव्य करणार्या एकनाथराव शिंदेंना कुणी तरी, कडक शब्दात सुनवायला हवं की, राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी असती; तर, एक साधा ‘रिक्षावाला’…आधी ‘मुख्यमंत्री’ आणि मग नंतर पायउतार होऊन ‘उपमुख्यमंत्री’; त्याच्या दहा जन्मात तरी कधि झाला असता काय…???
धर्मसत्तेत, ईश्वरीय सत्ता अथवा ईश्वरीय आदेशाचा बागुलबुवा अथवा बुजगावणं उभं करतच मूठभर धर्ममार्तंड, बेलगाम हुकूमत गाजवत रहातात…त्यात, हाताच्या बोटावर मोजता यावेत, एवढ्या छोट्या टक्केवारीचे ‘वर्णवर्चस्ववादी’ अभिजन, बहुजनांवर मनमानी व अनिर्बंध सत्ता गाजवतात; ज्यात रिक्षावाला, हातगाडीवाला, पानपट्टीवाला किंवा निढळाचा घाम गाळणाऱ्या इतर कुठल्याही समाजातल्या निम्नस्तरीय श्रमिकवर्गाला, प्रवेश मिळण्याची सुतराम शक्यता नसते…तो सगळा “वंशावळीचा एकतर्फी व एकेरी प्रवास आणि सत्तेचा निर्दय खेळ” असतो; ‘अस्पृश्यते’सारखं अंधारयुगाचं पिल्लू, त्याच कृष्णविवरातून जन्माला येतं… आणि, तरीही तो अपरिवर्तनीय समाजनियम डावलून, कुणी आपल्या तपःश्चर्यापूर्वक केलेल्या ‘ज्ञानार्जना’द्वारे ‘शक्तिशाली’ बनून प्रवेश करण्याचा प्रयास केल्यास किंवा धाडस दाखवल्यास, त्याला अत्यंत कठोर शासन दिलं गेल्याचा जळजळीत रामायणकालीन इतिहास आहे…तो असा की, “एकनाथराव, ज्या भाजप-संघीयांच्या नादाने, बेगडी-ढोंगी हिंदुत्वाचे चोवीस तास गोडवे गात फिरत असतात; त्यांच्या त्या हिंदुत्वाचा ‘पाया’ असलेला उग्र व शीघ्रकोपी ‘श्रीराम’…एकनाथरावांसारखाच ‘कृषिवल’ म्हणून, शूद्र गणल्या गेलेल्या ‘शंबूका’चा वध करताना रामायणाच्या उत्तरकांडात दिसतो!” ब्रह्म व ब्रह्मांडाचा वेध घेणाऱ्या मूळ हिंदुत्वाच्या नजरेतून आम्हाला, रामायणात (बालकांड ते युद्धकांड) ‘राम’ हे आत्यंतिक प्रेमळ व कनवाळू व्यक्तित्व…भिल्ल प्रवर्गातील शबरीची उष्टी बोरे आनंदाने खाताना दिसतं आणि गुहक चंडालाला, आपला भाऊ मानून मिठी मारताना दिसतं! अशा ‘समतावादी’ रामाचे चरित्र, आपल्या वर्णवर्चस्ववादी वंशावळीवर आधारलेल्या नृशंस-शोषक धर्मसत्तेच्या निहीत स्वार्थापोटी, प्रक्षिप्त व विक्षिप्त स्वरुपात ‘उत्तरकांडा’त, याच ब्रह्मवृंदाने घुसडलेले दिसते…हे ही कुणीतरी, एकनाथरावांना सांगण्याची नितांत गरज आहे. आमचा राम, हा लक्ष्मण-हनुमानासह सीतेसोबतच कायम दिसतो…भुवया रागाने ताणून, उठसूठ कोदंडावर (रामाचं धनुष्य) ‘रामबाण’ चढवताना, एकाकी कधिही दिसत नाही.
‘मंडल-आयोग’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नव्वदीच्या काळातील ती उफराटी व्यवस्था…बहुजनांची दिशाभूल करण्याहेतूने त्यांच्या हाती ‘कमंडल’ देत ‘भाजप-संघीयां’करवी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच केली गेली होती. आणि, ती व्यवस्था, त्यांचं वंशपरंपरागत असलेलं नेभळटपण-भित्रेपण (जे आपल्याला शतकभरापेक्षाही अधिककाळच्या इतिहासात, इंग्रजांच्या भयापोटी स्वातंत्र्य-चळवळीतून दूर पलायन करताना ढळढळीत दिसलं) बेमालूम झाकण्यासाठी उभी केलेली होती.
पूर्वी त्यांनी रामाला बदनाम केलं आणि आता, हिंदुधर्म आणि हिंदुत्वाला बदनाम करतायत!
हिंदू धर्मग्रंथांपैकी ‘मनुस्मृती’ आणि इतर काही जुन्या स्मृतिग्रंथांमध्ये, “जर एखाद्या शूद्राने वेद ऐकले तर, त्याच्या कानात वितळलेले शिसे ओतावे” अशा प्रकारच्या तत्कालीन दंडात्मक, अत्यंत कठोर शिक्षेचा उल्लेख (कायद्याच्या स्वरुपात) आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी देखील, इतरे ब्रह्मवृंदाने ठाम नकार दिल्यानंतर, वाराणसीच्या गागाभट्टांनी ‘भोसले कुळा’ची, केवळ वंशावळ तपासूनच नव्हे; तर, मोठी दक्षिणा (बिदागी) उपटूनच त्यांना क्षत्रिय दर्जा दिला होता… ही अशी, धर्मसत्तेची अन्यायी मस्ती व माजोरेपण विसरुन चालेल?
एकनाथ शिंदे, ज्या मराठा-समाजातून येतात आणि ते जे ‘शिंदे’ आडनाव मिरवतात…त्याच समाजाच्या आणि त्याच आडनावाच्या जनकोजी शिंदे / दत्ताजी शिंदे यांना रोहिला सरदार नजीबखानाबाबत, सावध करताना मल्हारराव होळकरांनी, दिलेला एक ऐतिहासिक सल्ला असा की, “तुम्ही नजीबखानाचे पारिपत्य केले, तर पेशवे तुम्हाला त्यांची धोतरे धुण्याच्या कामाला लावतील!” त्याचा मतितार्थ हा होता की, “मराठ्यांच्या उत्तर भारतातील मोहिमांमध्ये जर तुम्ही, नजीबखानासारख्या शत्रूचा संपूर्ण बंदोबस्त केलात; तर, पेशव्यांची ताकद वाढेल आणि ते तुम्हाला (शिंद्यांना) केवळ आपल्या ताबेदारीत किंवा अगदी साध्या सेवेच्या (धोतरे धुण्यासारख्या) कनिष्ठ कामाला जुंपून ठेवतील; त्यामुळे, स्वतःची ताकद व स्वातंत्र्य जपा!”
…सध्या एकनाथरावांची महाराष्ट्रात, अजून काय वेगळी अवस्था आहे? पेशवेकालीन ‘बारभाई’च्या कारस्थानाप्रमाणे, ‘चारभाई’च्या (दोन ‘दिल्लीश्वर’ आणि दोन ‘भांडवलेश्वर’, असे चार गुज्जूभाई) कारस्थानाचे ‘बळी’ ठरुन; त्यांच्याच इशाऱ्यावर, हे ‘सातारकर’ कळसूत्री बाहुलं नाचताना आपल्याला दिसतंय!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

