तुम्ही ‘पांढरपेशे’ आहात की ‘श्रमजिवी’ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी’ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्रा’ला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ ते २ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय. चंगळवाद-चैनीत अडकलेला, म्हणून स्वार्थी व संवेदनाशून्य झालेला, असा विखुरलेला मध्यमवर्ग पाहून, आता आपल्या दमन व शोषण यंत्रणेला कुठुनही विरोध होऊ शकत नसण्याची खात्री होताच, ‘इंद्राय स्वाहा….तक्षकाय स्वाहा’ या न्यायाने त्यांनी सर्वांनाच कंत्राटदारीच्या वरवंटयाखाली बिनधास्त चिरडायला घेतलयं.
१९७९ सालापासून चीननं LPG (Liberalisation, Privatisation & Globalisation) खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीरणा (‘खाउजा’) सारखं ‘स्फोटक‘ धोरण राबवताना, त्याचसोबत ‘एक जोडपं, एक मूल’ ही ‘लोकसंख्या नियंत्रक’ कठोर निती राबविली. त्याची आता जवळ-जवळ 30 वर्षांनंतर फलनिष्पती व्हायला लागलीय. चीनमध्ये कामगार-कर्मचाऱ्यांची चणचण भासू लागल्यानं, जागोजागी कामगार-भरतीची ‘होर्डिंग्ज्’ लागायला हळूहळू सुरूवात झालीय. कामगारांना कामावर घेऊन येणाऱ्या त्यांच्या नातेवाईक-मित्रमंडळींना-दलालांना ‘विशेष रिक्रूटमेंट बोनस’ दिला जातोय असेच नव्हे, तर एका रात्रीत कामगारांचे पगार दुपटी-तिपटीने वाढल्याचे, तेथील ‘अलेक्झाड्रा हार्ने’ सारख्या ख्यातनाम शोधपत्रकार कळवितात. आमच्याकडे लोकशाहीच्या नावाखाली मतांसाठी लांगुलचालन करण्याच्या दळभद्री धोरणांमुळे दररोज फुगणाऱ्या लोकसंख्येनं, या ‘कंत्राटी पध्दतीला’ उत्तम ‘फळणारी जमीन’ (Breeding Ground) पुरवलीयं!
तिकडे पाश्चात्य देशांमध्ये ‘कंत्राटी-पध्दती’ आहे, पण त्याला सामाजिक सुरक्षिततेचे (Social Security) अभेद्य ‘संरक्षक-कवच’ आहे. तिथे सर्वत्र भरपूर रोजगार उपलब्ध आहेत, लोकसंख्या विरळ आहे आणि प्रसंगी केवळ सेवाकाळाच्या शाश्वतेबाबतीतच असुरक्षित असलेल्या कंत्राटी कामगारांना, कायम कामगारांच्या बरोबरीचं नव्हे, तर अधिक वेतन व अधिक चांगल्या दर्जाच्या सेवाशर्ति सर्रास दिल्या जातात!
आपल्याकडे मात्र संदर्भ द्यायचा चीन-अमेरिकेचा आणि राबवायची, ती या भारतवर्षाला चिरपरिचित असलेली घृणास्पद व नीच-स्वार्थी बहुजनांची बेछूट लूटीची व्यवस्था व त्यांच्याशी गुराढोरांसारखा अमानवी खुलेआम व्यवहार! पूर्वी तो ‘जातिव्यवस्थेच्या‘ नावाने सवर्णानी दलितांवर लादला होता, फरक इतकाच आता तो ‘औद्योगिक-नवनितीच्या‘ नावाने चालू आहे! आणि मित्रांनो, यात सामील कोण आहेत? जरा नीट तपासून पहा. या बहुजनांची पराकोटीची पिळवणूक करण्याच्या सरंजामशाही व्यवस्थेत हृदयशून्य देशी-विदेशी उद्योजक, आत्यंतिक स्वार्थी – संवेदनाशून्य विविध कंपनी व्यवस्थापक, बदमाष कामगार पुढारी व संधिसाधू राजकारणी, यांचे ‘गुन्हेगारी-संगनमत’ आहे! आणि आमचे बहुसंख्य दलित व बहुजन समाजाचे नेते आपले राजकीय व आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी, या ‘औद्योगिक-अस्पृश्यते‘कडे निर्लज्ज डोळेझाक करतायतं!
यात प्रथम, देंशातर्गत व जागतिक घडामोडींकडे ही कंत्राटदारीच्या पिळवणूकीची सोयीची कल्पना प्रसवणारे, गिधाडासारखी (हल्ली गिधाडं दुर्मिळ झालीयतं, म्हणून ‘बोक्या’सारखी म्हणूया) निर्दय व स्वार्थीनजर लावून बसलेले, सर्व कंपन्यांतील प्रामुख्यानं HR व इतर संबधित व्यवस्थापकीय वर्ग व तथाकथित लेबर (खरंतर अँटी-लेबर) कन्सल्टंट्स् आहेत. ज्या क्षुद्र-स्वार्थी विचारसरणीच्या उद्योजक व कंपनी अधिकाऱ्यांची तथाकथित ‘विश्वकल्याणाची’ संकल्पना स्वतःच्या कुटुंबापासून सुरू होते व सुरू होते, तिथेच संपते, अशा या अधिकारी व्यक्ती स्वतःचे पगार, बोनस-नफे किंवा फिती वाढविण्यासाठी, अत्यंत निर्लज्जपणे व निरर्गलपणे असल्या ‘कंत्राटी’ उचापत्या करायला धजावतात, ते सरकारी अधिकारी व राजकारणी यांच्या उघड समाजघातकी संगनमतानं!
हे बहुसंख्य कामगार खात्यातील नोकरशहा – सरकारी अधिकारी कोण आहेत? बाबासाहेबांच्या ‘पुण्याईनं’ मिळालेल्या आरक्षणाचा (गैर) फायदा उठवून मोक्याच्या जागा बळकावून बसलेले हे ‘बोके’ होत! आणि स्वतःच्या जीभेला लागलेल्या ‘वरच्या कमाईच्या’ रक्तामुळे बाबासाहेबांच्या पोरांचे बिनदिक्कत शोषण करण्याची ‘पुंडाई’ करतायतं! थोडक्यात आता हे ‘दलित अधिकारी’ पूर्वीच्या काळातील ‘सवर्ण’ बनलेत. तेव्हा ‘शोषकांना’ जात नसते, असते फक्त लालचावलेली – सर्व ‘स्वाssहाss करणारी जीभ‘ ही वळवळणारी ‘लाचखोर जीभ’ छाटून टाकली नाही, तर या ‘गांडू’ तरूणाईला आता भविष्य नाही, हे त्रिवार सत्य आहे! तुम्ही म्हणतायं त्याप्रमाणे हे आमच्या पिढीचं ‘पाप’ जरूर आहे तरूणांनो, आणि हे पापक्षालन अंशतः तरी व्हावं, म्हणून तर आम्ही मरणाचा संघर्ष करतोय, पण आपापसात फालतू हाणामाऱ्या व संघर्ष करणारी तरूणाई, या दांडग्या अधिकाऱ्यांपुढे – बदमाष छोटया मोठया राजकारण्यांपुढे लोटांगण का घालते? का ती त्यांना बिनधास्त अडवून जाब विचारीत नाही? त्यासाठी आढयाकडे किंवा आभाळाकडे कोणीतरी ‘मायका लाल’ नेता बनून आमच्या संरक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी येईल, अशी आळसावलेली नजर लावून का बसलेयत? देSS धमालSSS करताना, मोबाईलवरून लाडिक ‘SMS’ पाठवताना, पार्टी-पिकनिक् करताना, सिनेमातल्या गाण्यांवर अंगमोडेस्तोवर नाचताना….. अमुक असं करा हे सांगायला, कुणी नेता लागतो का? तेव्हा स्वतःच स्वतःच्या हिताचे राखणदार व्हा… स्वतःचेच नेते बना… स्वतःलाच सक्षम करा! निदानपक्षी समाजविघातक कंत्राटी पध्दतीला जे जे म्हणून कोणी छोटे मोठे राजकीय नेते उघड वा छुपा आश्रय देत आहेत, स्वतः ‘मजूर कंत्राटं‘ घेत आहेत किंवा नातेवाईक मित्रांना ‘मजूर कंत्राटं‘ मिळवून देत आहेत किंवा खराखुरा व जाहीरपणे ‘कंत्राटी-पध्दतीला‘ विरोध करीत नाहीत, अशा नेत्यांच्या, कुठल्याही मोहाला व दडपणाला बळी न पडता, तुम्ही तरूणांनी त्यांच्या आसपासपण फिरकू नये, मग त्यांना मतदान करणं तर फारच दूरची गोष्ट आहे. भले प्रसंगी तुमची मतं फुकट गेली तरी चालतील, पण ‘कंत्राटदारीचे‘ विखारी फुत्कार टाकणाऱ्यांना ती कधीही व कुठल्याही परिस्थितीत मिळता कामा नयेत! एवढं साधलतं, तरी कंत्राटदारी निर्मूलनाच्या दिशेनं तुम्ही एक निर्णायक खंबीर पाऊल उचललतं, असं नक्कीच घडून येईल!
याबाबतीत इतर लोक, विशेषतः मध्यमवर्ग, उघडपणे का बोलत नाही, त्याचं मासलेवाईक उदाहरण म्हणजे, आमच्या ठाणे जिल्हयातील एका आग्री समाजातल्या शंभरीच्या घरात पोहोचलेल्या अनुभवी वृध्द महिलेनं दिलेलं उत्तर आहे, ती म्हणते…. ‘पांढरपेशा, तो षंढ म्हशा नी अक्करमाशा! त्याच्या दिलातल्या दयेनं गुंडाललाय गाशा!’ पुढे ती म्हणते… ‘अरे, माझ्या म्हातारीच्या डोळयादेखत तू आमच्या आग्रीकोळी पोरांसाठी झुंजतोयस ना, पन् आमच्या जातीतसुध्दा जमिनी फुंकुन ‘फिरायला कार नी विसाव्याला बार‘ धरनारे, राजकारनाचा नागवा धंदा करून, दादागिरीनं कंत्राटं मिलवून नी बिल्डिंगा बांधून बक्कल पैसा कमवून लय पांढरपेशे बनलेत नी आपल्या सवताच्या रक्तालाच इसरलेत!’ मित्रांनो, जवळजवळ सगळेच पक्ष मोजक्या विशिष्ट घराण्यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झाल्या आहेत आणि एखाद्या उद्योजकासारख्या ‘दयाशून्यतेनं-हृदयशून्यतेनं’ त्यांचा हा Politico-Corporate कारभार चालतोय. असा कारभार करताना यांना समाजात विविध ठिकाणी समाजात भितीयुक्त (आदरयुक्त नव्हे!) दरारा निर्माण करणारे ‘स्थानिक सरदार’ (खरं म्हणजे पांढरपेशा बुरख्याआड लपलेले गुंडपुंड) लागतात. त्यांना पोसण्यासाठीच जणू ही ‘कंत्राटदारी पध्दती’ त्यांनी जन्माला घातलीय. थोडं आजुबाजुला पाहिलं तर तुम्हाला या धंदेवाल्या राजकारण्यांचेच नातलग, मित्रमंडळी, हितचिंतक किंवा ते स्वतः शिक्षणसम्राट (‘कॅपिटेशन् फी’ची खंडणी गोळा करणारे) म्हणून वावरताना दिसतील, खाजगी-सरकारी-महापालिकाच्या-ग्रामपंचायतींच्या जमिनींचे दलाली व्यवहार करताना दिसतील, कंत्राटं ‘मॅनेज्’ करताना दिसतील आणि पगारी गुंडांच्या (खऱ्याखुऱ्या जातिवंत कार्यकर्त्यांच्या नव्हे!) किंवा त्यांनी छोटयामोठया कंत्राटांचे ‘शिळेपाके भाकरतुकडे’ टाकून गुलाम केलेले-मेंदू गहाण ठेवलेले, मस्तवाल तरूण त्यांच्या अवतीभवती फिरताना दिसतील!
मित्रांनो, मराठयांच्या विविध सणांची (होळी, दिवाळी, दसरा, गणपती, दहीहंडी इ. इ.) फाजिल उत्सवप्रियता ही आपल्या किंकर्तव्यमूढतेचं – दिङमूढतेचं अकारण ‘कारण’ बनलीय. जागोजागी उत्सव करणं, महापूजा करणं हीच हल्ली समाजसेवा करण्याची दळभद्री ‘फॅशन’ झालीय! मूळ पाण्यापोटाचे – जीवनमानाचे प्रश्न त्यामुळे अधांतरीच लोंबकळत रहातायतं आणि आम्ही मात्र ‘झोपाळयावाचून झुलत’ राहतोयं, ते या ‘उत्सवछाप/पूजाछाप नेत्यांच्या‘ नादानं! म्हणूनच त्याला आवर घालण्याचं आम्ही जागोजागी आवाहन करतोय. पण आमची शक्ति कमी पडतेयं – खूपच कमी, म्हणून या उत्सवप्रियतेच्या ‘ग्लानी‘तूनच कुठेतरी जनजागरणाचा ‘वन्ही‘ चेतविण्याचा आमचा प्रयास आहे!
अन्यथा ही धगधगती समस्या, ‘Public Memory is Short!’ या न्यायानं, ‘ज्वाला‘ बनण्याऐवजी निर्माल्यांची ‘माला‘ बनण्याची शक्यता अधिक आहे! तेव्हा या कंत्राटीविरोधी जनजागरणाच्या उपक्रमाला आपला आशिर्वाद हवा, धन्यवाद!
…राजन राजे
(अध्यक्ष – सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लॉईज् युनियन) (अध्यक्ष-आयशर डेम् एम्प्लॉईज् युनियन) ( अध्यक्ष – घारडा केमिकल्स् एम्प्लॉईज् युनियन) (सल्लागार – विविध कंपन्यांतील कामगार संघटना)