मित्रांनो, सिंहाचं अन् आईचं काळीज याचा अनोखा संगम असलेली – अमृतातेही पैजा जिंकणा-या मराठी मायबोलीनं प्रसवलेली, ‘मराठी-संस्कृति’ हा माणुसकीचा ‘उद्गार’, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आणि दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे!
“संतांची छाया, सानेगुरूजीं-भीमरावांची माया आणि शूरवीर शिवछत्रपतीराया देणा-या तेजस्वी मराठी संस्कृतिची कास धरून मी व्यसनं, दुराचार, भ्रष्टाचार, अभ्यासाचा आळस व अन्यायी वृत्ती यापासून कटाक्षाने दूर राहून आणि स्वतःला परिश्रमपूर्वक सज्जन-सद्वर्तनी तसेच व्यायाम व योगाभ्यासाव्दारे शारीरिक-मानसिक दृष्टया सक्षम घडवून, या महन्मंगल संस्कृतिचा पाईक बनणं,” हे माझं आद्य कर्तव्य आहे!!
म्हणून या महाराष्ट्रात आणि भारत देशात सज्जन शक्तिचा उदय घडवून लाचारी, गुलामी, हिंसक, शोषक आणि दुष्टभ्रष्ट वृत्तीचा अंधःकार दूर करण्यासाठी मी प्रतिज्ञा करतो की, “पाश्चात्य संस्कृतिचा घातक प्रभाव शक्य तेवढा टाळून मी स्वतः सद्वर्तनी, अभ्यासू व कष्टाळू होण्यासाठी या क्षणापासूनच प्रारंभ करेन”!!!
–राजन राजे