२६ एप्रिल, २०११ – ‘चेर्नोबिल आण्विक अपघाताला, २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने…. “अणूविद्युत… निसर्गाशी द्यूत! अणूविद्युत… मृत्यूदूत!!”…

‘‘You can never Master Nature…. Nature rules us, the undiluted truth we understand, if ever, we peep into the TOMB of the dead moments of Chernobyl-Fukushima & into the WOMB of the unborn future moments of Jaitapur !!!’’…

आम्ही अंधारात राहायला तयार आहोतपण तो आम्हाला जाळणारा किरणोत्सर्जनाचा अणूप्रकाश नको !!!’’….

ज्या जपानचं अभिमानानं आमचे शासक व अणूशास्त्रज्ञ जैतापूर अणूप्रकल्पाच्या भन्नाट समर्थनासाठी उदाहरण पेश करत होते, त्याच जपानच्या राजधानी टोकियोसहित सर्व शहरांच्या रस्त्यांवर फुकुशिमाच्या आण्विक अपघातापश्चात दिसणारा हजारोंच्या निदर्शकांचा हा संतप्त आक्रोश आहे! ज्याचं दुसरं उदाहरण दिलं जातं त्या फ्रान्स देशातली   परिस्थिती याहून वेगळी नाही.

बरं, हा सारा विरोध फुकुशिमाच्या आण्विक अपघाताच्याच पार्श्वभूमिवर उभा राहिलायं असं नव्हे, तर जपानमध्ये १९९९ व २००४ साली झालेल्या अपघातांमध्ये शेकडोंना किरणोत्साराची गंभीर बाधा झाली होती. तिथपासूनच सुरु झालेल्या अणूऊर्जेच्या विरोधाची धार, फुकुशिमाच्या आण्विक अपघातामुळे टिपेला पोहोचलीयं इतकचं! भूकंप-त्सुनामीच्या नैसर्गिक आपत्तिनंतर फुकुशिमा-दायची सारख्या निम्नश्रेणीतल्या अणूभट्ट्यांमधील अणूउत्सर्जन रोखताना (अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड इ. अनेक पाश्चात्य देशांचं सहकार्य असतानाही) शिस्तबध्द व अतिप्रगत जपानची झालेली असहाय्यस्थिती, रोज विविध टी.व्ही.चॅनेल्सवरून पाहताना जैतापूरसारख्या जगातल्या संभाव्य सर्वोच्च क्षमतेच्या अणूभट्ट्यांशी संबंधित कुठलाही अपघात घडल्यास आपल्या देशातल्या आरपार भ्रष्ट व अकार्यक्षम व्यवस्थेची काय दशा होईल, याची कल्पनादेखील अंगावर काटा उभा करते! मानवाने विकसित केलेल्या अनेकविधं तंत्रज्ञानांपैकी ‘अणूतंत्रज्ञान’ हे, हजारो-लाखो वर्षे प्रदीर्घकाळ टिकणारी अतिभीषण संहारकता असणारे, एकमेव तंत्रज्ञान आहे… जेवढी अणूप्रकल्पाची क्षमता मोठी, तेवढा धोका देखील मोठा. जैतापूरमध्ये तर सहा अणू-रिअॅक्टर्स ओळीनं मांडून ठेवलेले असणार (प्रत्येकी १६५०मे.वॅ. क्षमता) म्हणजे एखाद्या रिअॅक्टरमधून कुठल्याही कारणाने अपघाती किरणोत्सर्जन सुरू झालं, तर इतर रिअॅक्टर्सना त्याची झळ पोहोचू नये, यासाठी तिथपर्यंत जाणं देखील खूप कठीण होणार-

जैतापूर-माडबन हा भौगोलिकपट्टा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो (seismic zone-, indicating high damage prone, from where neotectonic-faults traverse viz. west-coast fault, chiplun fault &  warana fault- ref. G.S.I. publications, Seismic Tectonic Atlas Of India & it’s environs- २०००) व तेथे गेल्या वीस वर्षात सातत्याने ४ ते ६.३ क्षमतेचे मोठे भूकंप व स्वाभाविकच मोठी जिवितहानी झालेली आहे, हे आपल्याला ज्ञात आहेच (वेंगुर्लेकर समितीनं सुस्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे कुठलाही ‘अणूप्रकल्प’ हा भूकंपप्रवणता क्षेत्र- १ किंवा क्षेत्र- २ मध्येच येऊ शकतो, ही बाब अत्यंत महत्वाची आहे!).

फुकुशिमाच्या पार्श्वभूमिवर केवळ भूकंप-त्सुनामीचाच संभाव्य धोका, हे एकमेव जैतापूरसारख्या अणूप्रकल्पाच्या कडव्या विरोधाचे कारण नव्हे, या विरोधाबाबतची शास्त्राrय भूमिका समजावून घेताना, खालीलपैकी अनेक त्याहीपेक्षा गंभीर व प्रबळ कारणांचा मागोवा घ्यायला हवा …

 • राजकारण्यांची विश्वासार्हता पार रसातळाला केव्हाचं गेलीयं, पण राज्यकर्ते आणि धनदांडग्यांच्या चरणी बुध्दी गहाण ठेऊन आपल्या आत्म्याचा बाजार मांडणाऱ्या…. ‘ज्ञान पसरविण्याच्या बहाण्याखाली अज्ञान पसरविणाऱ्या’ काही शास्त्रज्ञांसारख्या बुध्दिमंत बाळांवर आंधळा विश्वास टाकण्याचे दिवस देखील फार पूर्वीच संपलेले आहेत़ आता ‘सरस्वती’ केवळ ‘लक्ष्मी’ची दासीचं झालीयं एवढचं नव्हे, तर थेट ‘गुलाम’ झालीयं हे फार मोठं आपलं दुर्दैव आहे (Indian Scientists are most likely to cheat… ‘R Grant Steen’, the Us-based consultant- Hindustan Times dt. २६-११-१०)… सांगा,
 • सजीवसृष्टी संरक्षक ओझोनच्या थराला छिद्रे कोणामुळे पडली?
 • हवा, जमीन, पाणी, नदी-नाले कोणामुळे प्रदूषित झाले?
 • जागतिक-तापमान वाढ ही कोणाची ‘देणगी’ आहे? त्यामुळे नजिकच्या भविष्यात महासागरांच्या पाण्याच्या पातळीत होऊ घातलेल्या वाढीमुळे माजू शकणाऱ्या हाहाःकाराला जबाबदार कोण? येत्या ५० वर्षात (category-५) वादळी वाऱ्यांचा वेग वर्षानुवर्षे थोडा-थोडा वाढत (Research Team-Australian National University in Melbourne) एवढा प्रलयंकारी होऊ शकतो की, त्यांच्या वाटेतील ९०… हूनही अधिक बांधकामे (उदा. इमारती वगैरे) उध्वस्त करण्याची राक्षसी क्षमता त्यांच्यात असू शकेल ( Mark Donelan-an oceanographer at the University of Miami in Florida, T.O.I. dt. २७/०३/२०११) या अशा संभाव्य विध्वंसाचं प्राक्तनं कोणामुळे ओढवलयं? (…..एप्रिल-२०११च्या शेवटच्या आठवडयात अमेरिकेच्या दक्षिणभागाला बसलेल्या भीषण चक्रिवादळाच्या तडाख्यातील वाऱ्यांचा वेग, गेल्या शतकातील सर्वोच्च असल्याचं अमेरिकी वेधशाळेचं म्हणणं आहे, हे येथे आवर्जून ध्यानात घेतलं पाहिजे!)
 • अवघ्या चराचरसृष्टीच्या अस्तित्वाचा गाभा असलेल्या (ज्याला आपण ८४ लक्ष योनी म्हणतो)

जैविक-बहुविधतेचे मारेकरी कोण?

कोकणात एक म्हणं आहे, “एक कोंबडं झाकलं ठेवण्यासाठी, दुसरं कोंबडं उघडं करावं लागतं!’’…. तद्वतचं सगळे जैतापूरप्रकल्प समर्थक अणूशास्त्रज्ञ एका सूरात दगडीकोळशाच्या इंधनावर चालणाऱ्या औष्णिकभट्ट्या, त्यातून बाहेर पडणाऱ्या CO/CO२, नायट्रोजन ऑक्साईड्स् व राखेमुळे पर्यावरणाला कशा घातक आहेत, हे फिल्मीस्टाईलने रंगवून सांगताहेत…. असं पर्यावरणीय नुकसान होण्यापूर्वी त्याबाबतची गंभीर सूचना आमजनतेला आमच्या धोरणकर्त्यांनी व शास्त्रज्ञांनी फार पूर्वीच द्यायला हवी होती, ती त्यांनी वेळीच का दिली नाही? असे औष्णिकऊर्जाप्रकल्प उभारताना जसे कोळशाच्या भट्टीचे फक्त गोडवेच गायले गेले, त्याचप्रमाणे सध्या अणूभट्ट्यांचे गोडवे गाण्याचे कार्यक्रम विविध स्तरांवर अथक चालू आहेत… पण ‘अंदरकी बात’ फार वेगळी व भयानक आहे!!!

नजिकच्या भविष्यात ‘मिथेन क्लॅथ्रेट’ (Methane Clathrate) हे बर्फासारखे दिसणारं दगडी खनिज किंवा पाण्यातला ‘हायड्रोजन’ सोप्या व कमी खर्चिक पध्दतीनं (उदा. मोलिबडेनम धातूच्या कॅटॅलिस्टचा वापर करून वगैरे) ऊर्जानिर्मितीसाठी वापरात आले किंवा अन्य नवं शास्त्रीय संशोधन (e.g. Galactic Source of Energy etc.) समोर आलं, तर तेव्हाचे ‘संबंधित शास्त्रज्ञ’ अणूऊर्जा किती खर्चिक-धोकादायक व पर्यावरणाला घातक आहे व नवं तंत्रज्ञान कसं अधिक सुयोग्य आहे, याची शास्त्रीय प्रवचनं एखाद्या कसलेल्या ‘सेल्समन्’सारखी जागोजागी देत फिरतील. तेव्हा, आपला-आपल्या भावी पिढ्यांचा आणि पृथ्वीवरील अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा, ऊर्जा वापरासंबंधितील निर्णय, केवळ राजकीय मंडळींवर वा शास्त्रज्ञांवर सोपवून मोकळं होऊ नका!

 • अणूऊर्जा समर्थकांकडून केले जाणारे दावे निखालस खोटे असून अणूऊर्जा (अ) स्वच्छ नाही, (ब) सुरक्षित तर नाहीच वा (क) स्वस्तही नाही!

 () अणूऊर्जा स्वच्छ नाही : ‘औष्णिक ऊर्जाकेंद्रांतून मोठयाप्रमाणावर कार्बनउत्सर्जन होत असल्यानं जागतिक तापमानवाढीच्या दुष्टचक्राला चालना मिळते’….असे सध्या एकासूरात सर्व जैतापूरप्रकल्प समर्थक अणूशास्त्रज्ञांचं राग आळवणं सुस्त्र् आहे! एका अभ्यासगटाच्या म्हणण्यानुसार ‘जगातील सगळे औष्णिक ऊर्जाप्रकल्प बंद कत्र्न तेवढयाच क्षमतेचे अणूऊर्जाप्रकल्प उभारले, तरी जागतिक कार्बनउत्सर्जनाचे सध्याचे प्रमाण घटण्यात अतिशय नगण्य अशी मदत होईल’…याचाच अर्थ कार्बन उत्सर्जनाचे खरे दुखणे वेगळेचं आहे!

प्रत्यक्ष अणूभट्टीतील अणूभंजन (Atomic Fission) प्रक्रियेत कार्बनउत्सर्जन ‘शून्य’ असलं तरी, अणूऊर्जेसाठी आवश्यक युरेनियमचं उत्खनन, त्याचे संपृक्तिकरण (Enrichment), अणूभट्टीच्या स्थळापर्यंतची सुरक्षित वाहतूक, अतिभव्य व अतिमजबूत अणूप्रकल्प उभारणी, अणूकचऱ्याची साठवण व विल्हेवाट, अणूभट्ट्या सुरक्षितरित्या मोडीत काढणे… या सर्व प्रक्रियेत होणारे तुलनात्मक ‘कार्बन-उत्सर्जन’ मोजले, तर ते औष्णिक-प्रकल्पांच्या आसपासचेच ठरावे. याव्यतिरिक्त युरेनियम संपृक्तिकरणाच्या प्रक्रियेत क्लोरोफ्ल्युरोकार्बन (C.F.C.) हा ‘पर्यावरणसंरक्षक ओझोनच्या थराला भगदाड पाडणारा’ अत्यंत घातक ‘ग्रीन हाऊस’ वायू (ज्याची सूर्याची उष्णता शोषण्याची क्षमता CO2 च्या तुलनेत १० ते २० हजारपट असते) मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो. शिवाय अणूऊर्जाकेंद्रे जेवढया मात्रेची विद्युतऊर्जा तयार करतात, त्याच्या तिप्पट प्रमाणात उष्णता निर्माण करतात. निसर्गतः ‘अणूकेंद्रकां’च्या ‘बाटली’मधे कोंडला गेलेला हा अचाट ऊर्जेचा ‘ब्रम्हराक्षस’, अणूभंजनाच्या प्रक्रियेव्दारे ‘बाटली’बाहेर काढल्यानंतर जी अतिप्रचंड उष्णता समुद्रीपाण्यात व वातावरणात सोडली जाते, त्यामुळे वैश्विक तापमानवाढीवर काहीच परिणाम होत नसेल?

यापेक्षाही धक्कादायक बाब ही की, अणूविद्युतप्रकल्प तुलनेनं अतिप्रचंड प्रमाणात समुद्रीजल अणूभट्टयांच्या शीतिकरणासाठी वापरतात तेव्हा त्या पाण्यातील, तसेच हे उच्च तपमानाचं रसायनमिश्रित पाणी पुन्हा समुद्रात सोडल्यानंतर आजुबाजुच्या समुद्रीभागातील पाण्यामधील समुद्रीशैवाल (Phyto-Plankton) फार मोठयाप्रमाणावर व झपाटयानं नष्ट होतं. सजीवसृष्टीचा तोल सांभाळण्याबरोबरचं वातावरणाला कर्बवायू (CO2) शोषून उलटपक्षी वातावरणात प्राणवायू (O2) सोडण्याचं अतिमहत्वाचं काम ‘समुद्रीशैवाल’ एवढया मोठयाप्रमाणावर करत असतं की, जरी समजा भविष्यात जगभरातील जमिनीवरील सर्व वृक्ष-वनस्पतिसृष्टि नष्ट झाली तरीही, मानवासहित सगळया सजीवसृष्टिला किमान जगण्यापुरता अत्यावश्यक प्राणवायू हे ‘समुद्रीशैवाल’ पुरवीत राहीलचं! औष्णिक ऊर्जाप्रकल्प वा खनिजतेलावर चालणारी वहाने किंवा उद्योगधंदे यामुळे हवेत होणारे कार्बनउत्सर्जन जेवढं घातक, तेवढचं हवेतील कार्बन मोठयाप्रमाणावर शोषून घेणाऱ्या ‘समुद्रीशैवाला’ला नाहीसं करणं…. हे दोन्ही सारखचं घातक! दरदिवशी ५२०० कोटी लिटर पाणी समुद्रातून जैतापूरसारख्या अणूप्रकल्पात खेचून घेतले जाणार असल्यामुळे, एका शास्त्रीय अंदाजानुसार एकपेशीय समुद्रीशैवालांचे ७ ते१० लाख अब्ज पेशीसमूह दररोज नष्ट होतील, एव्हढचं नव्हे तर… त्याच्या दिडपट-दुप्पट संख्येनं ‘समुद्रीशैवाल’ पेशीसमूह समुद्राच्या आजुबाजुच्या भागातून नष्ट होतीलं!…. या व अशाच कारणांमुळे विषुववृत्ताच्या वर कर्कवृत्तापलिकडे व खाली मकरवृत्तापलिकडे एकवटलेल्या विकसितराष्ट्रांमुळे, गेल्या ६० वर्षात जगभराच्या समुद्रातील सुमारे ४०% समुद्रीशैवाल नष्ट झाल्याचा ‘नासा’चा दावा आहे!

() अणूऊर्जा सुरक्षित नाही : i) अणूविद्युत प्रकल्प सामान्यस्थितीत चालू असताना नेहमीच त्यातून निम्न-तीव्रतेचा किरणोत्सार (Low Intensity Ionising Radiation) सतत बाहेर पडत असतो (By Venting or Planned Purges). वातावरणातील नैसर्गिक किरणोत्सर्गाच्या मात्रेशी तुलना करता, अणूप्रकल्पातून सातत्यानं बाहेर पडणारा हा किरणोत्सर्ग कमी असला तरी तो अगदी ‘नगण्य’ आहे, हे भासविण्यासाठी किरणोत्सर्गाच्या मात्रेची आकडेवारी देताना अणूभट्ट्यांपासूनच्या किरणोत्सर्ग-मात्रेला ‘देशातील’ सर्व लोकसंख्येनं ‘भागले’ जाते. पण प्रत्यक्षात अणूभट्ट्यांभोवतालच्या मोजक्या लोकसंख्येलाच हा उपद्रव पोहचत असल्याने, खरतरं तेवढ्याचं लोकसंख्येनं भागायला हवं. लाखो वर्षांच्या वाटचालीनंतर मानवजातीनं जे नैसर्गिक किरणोत्सर्गाशी संतुलन साधलयं, त्यात माणसांच्या लुडबुडीमुळे निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गाची मात्रा कितीही लहान असली, तरी ती नैसर्गिक किरणोत्साराच्या लाखोवर्षांच्या साधलेल्या संतुलनात पडलेली अधिकची भर असते. अर्थातच आपल्या हे सहजी ध्यानात येईल की, अधिकची मानवनिर्मित किरणोत्सर्गाची मात्रा कितीही नगण्य असली तरीही कधिही पूर्णतया सुरक्षित नसते व ती नैसर्गिक मात्रेतील अधिकची धोकादायक भर ठरते! (No Dose of radiation is ‘Safe’, ‘Permissible’ does not mean ‘Safe’ & every new radiation gets added up with natural back-ground Radiation i.e. Solar plus terrestrial & gives ‘Cumulative-Effect’!) अखंडितपणे उत्सर्जित होणारे-आयनीकरण करू शकणारे अल्फा, बिटा व गॅमा किरण हे दृश्य नाहीत, त्यांना वास नाही, ते भाजत नाहीत वा गुदमरवून टाकत नाहीत, त्यामुळे डोळे चुरचुरत नाहीत वा त्वचेला खाज येत नाही… त्यामुळे त्यांची बाधा होताना कळत नाही. तसेच विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांचा परिणाम तत्काळ किंवा नजिकच्या भविष्यात होत नाही. कधि-कधि तो परिणाम घातक जनुकिय बदलांच्या स्वरुपात (उदा. कॅन्सर, व्यंग, अपंगत्व, नपुंसकता, गर्भपात इ.) पुढील काही पिढ्यांमध्ये संक्रमित होऊन वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रकट होतो. (उदा. उंदरांवरील प्रयोगात अमेरिकेत १९५४ साली उंदरांच्या सातव्या-आठव्या पिढीत किरणोत्सारामुळे जन्मजात विकृती उद्भवल्याचे आढळले. मग २५,००० अब्ज पेशींनी बनलेला, उंदराहूनही खूपच गुंतागुंतीची रचना, दीर्घआयुमर्यादा व दीर्घपुनरुत्पादन काळ असलेल्या असलेल्या माणूस नांवाच्या प्राण्यात… अशा बिघाडासाठी किती आदर्श-स्थिती आहे, याची फक्त कल्पना करा.)

ii) अणूविद्युत प्रकल्पांमधून कोणत्याही कारणाने (उदा. मानवी चूक, तांत्रिक बिघाड वा अपघात, भूकंप-त्सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती किंवा युध्दजन्य घातपाती वा दहशतवादी कृत्य इ.) मोठ्या प्रमाणावर किरणोत्सार झाल्यास फार मोठा भू-प्रदेश बाधित होऊन ते मानवी वस्तीसाठी शेकडो वर्ष हानिकारक ठरतो. अशातऱ्हेनं अशा आण्विकअपघातात महाभयंकर संहाराच्या स्थळाचा परिघ आणि काळाच्या कक्षा ‘अमर्याद’ बनतात, त्या केवळ किरणोत्सारामुळेच (किरणोत्साराचा अर्धायुकाल – Half Life> युरेनियम २३५- ७० कोटी वर्षे, युरेनियम २३८- ४.५ अब्ज वर्षे, थोरियम २३१- १४ अब्ज वर्षे)! उदा. मानवी चूकीमुळे घडलेल्या चेर्नोबिलच्या अपघातात तत्काळ बळी काही लोकांचेच गेले असले, तरी वर्षभरातच हजारो लोक कॅन्सरसारख्या व्याधिंमुळे मृत्युमुखी पडले. दुर्घटनेच्या विसाव्या स्मृतिदिनी (वर्ष-२००६) युनोचे सरचिटणीस ‘कोफी अन्नान’ म्हणाले की, ‘आजही सुमारे ७० लाख माणसे किरणोत्साराने बाधित आहेत, त्यापैकी ३० लाख लहान मुले आहेत आणि अशी शक्यता आहे की, ही मुलं प्रौढावस्था गाठण्याआधीच मृत्युमुखी पडतील!’ चेर्नोबिल आण्विकअपघातामुळे सुमारे ५ ते १० कोटी ‘क्यूरी’ किरणोत्सारी द्रव्यांचे (स्कँन्डियम-४६, स्ट्राँशियम-९०, कोबाल्ट-६०, सिशियम-१३७ इ.) लोट वातावरणात सोडले गेल्याने बेलारुस, युक्रेन, रशिया, पश्चिम युरोपपर्यंत आकाशमार्गे वाऱ्यासोबत किरणोत्सर्ग पोहोचला. गवतावाटे चरणाऱ्या गाईंपर्यंत हा अणूसंसर्ग पोहोचल्याने  पोलंडपासून ब्रिटनपर्यंत नव्हे, तर ऑस्ट्रेलियामध्ये देखील करोडो लिटर दूध फेकून देण्यात आले… भारतात देखील किरणोत्सर्गबाधित लोणी त्याकाळात आयातीद्वारे पोहोचल्याची नोंद आहे व अर्थातच ते फेकून द्यावे लागले.

नैसर्गिक आपत्तिमुळे घडलेल्या फुकुशिमा-दायची आण्विकअपघाताचा विध्वंस व भविष्यातही लाखो-हजारो जगभरातल्या लोकांवरची विकृतिची व मृत्यूची टांगती तलवार, याबाबतची सविस्तर माहिती रोजच्यारोज रकाने भरभरून वृत्तपत्रांतून व देशी-विदेशी टी.व्ही. चॅनेल्सवरून पहायला आपल्याला मिळत असल्यानं, त्याबाबतीतलं भाष्य  टाळलेल बरं… हातच्या कंकणाला आरसा कशाला? जपानच्या पंतप्रधानांनी ही आण्विकआपत्ति, दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवलेलं जपानवरील सर्वात मोठ संकट आहे, असं जे म्हटलयं त्यातच सगळं आल़ं

iii) भारतातील युरेनियम खाणींमधील (जादूगोडा-झारखंड) खनिजात ‘युरेनियम ऑक्साईड’ चे प्रमाण केवळ ०.०६७… एवढे अत्यल्प असल्याने, एक किलोग्रॅम युरेनियम प्राप्त करताना १७५० किलोग्रॅम टाकाऊ माल तयार होतो. यामुळे हवा, पाणी प्रदूषित होण्याबरोबरच खनिजांची धूळ व बाहेर पडणारा रेडॉन वायू याची खाणकामगारांना बाधा होऊन फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते. पण पद्धतशीररित्या त्याची कुठलीही नोंद ठेवली जात नाही.

() अणूऊर्जा स्वस्त नाहीः अणूविद्युतऊर्जेचा दर मेगावॅटमध्ये काढताना आतापर्यंत अणूसंशोधनावर करण्यात आलेला हजारो कोटी रुपयांचा पाण्यासारखा खर्च (जेव्हा इतर अक्षयऊर्जा स्रोतांच्या संशोधन व विकासावर एकत्रितरित्या धड काही शे कोटींचाही खर्च केला गेलेला नाही), युरेनियम खाणींवरील (उत्खनन, वहातूक इ.) प्रचंड खर्च, युरेनियम समृध्दीकरणावरील मोठा खर्च, अणूकचरा साठवणीचा भन्नाट खर्च (यात विल्हेवाट लावण्याच्या खर्चाचा अंतर्भावच नाही, कारण ते तंत्रच अजून जगभरात पूर्ण विकसित झालेले नाही), अणूभट्टयांचे आयुष्य संपल्यावर त्या मोडीत काढण्याचा फार मोठा भांडवली खर्च, तुलनात्मकदृष्ट्या अत्यंत खर्चिक-सुरक्षा व्यवस्था, शत्रूच्या व दहशतवाद्यांच्या संभाव्य हवाई हल्ल्यापासून प्रकल्प संरक्षणासाठी क्षेपणास्त्र तैनातीचा खर्च, विविध सरकारी अनुदाने (उदा. NPCIL ला जडपाणी वास्तव किंमतीच्या सुमारे ५०% किंमत धरून सरकारतर्फे पुरविले जाते) इ. अनुषंगिक खर्चांच्या बाबांचा मुळीच विचार केलेला नसतो, हे कितपत योग्य आहे?

याव्यतिरिक्त आपत्कालीन वारंवार घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा तालमींचा खर्च, मासेमारी, फळबागा-शेती व माणसांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांची आर्थिक नुकसानभरपाई, (Social & Environmental costs) तुलनात्मक विस्थापनाचा प्रचंडखर्च, अणूऊर्जा ही केंद्रिभूतऊर्जा असल्यानं लांबपर्यंत करावयाच्या वीजवहनामुळे (Through National Grid) होणाऱ्या वीजगळतीने मोठ्या प्रमाणावर होणारे आर्थिक नुकसान, संभाव्य अपघातासाठी विमा उतरविण्याच्या खर्चाची फार मोठी तरतूद (प्रत्यक्षात अंगभूत महाप्रलयंकारी धोक्यामुळे अणूप्रकल्पांचा विमा उतरविण्यासाठी कोणतीही विमाकंपनी सहजी तयार होत नाही) या सर्व महाप्रचंड खर्चाच्या बाबीदेखील ‘दर मेगावॅट विद्युत दर’ काढताना सोयिस्कररित्या वगळल्या जातात. अर्थातच इतर करांच्या रुपाने वा महागाई-वाढीच्या रुपाने (महागाई- हा ही नागरिकांवरील एक प्रकारे कराचा भूर्दंडच आहे.) देशातल्या सगळ्या नागरिकांना हा अनावश्यक भूर्दंड सोसावा लागतो. अशातऱ्हेने अणूऊर्जा ही वस्तुत औष्णिकविद्युत वा जलविद्युत यापेक्षाही चौपट-पाचपट महाग असल्यानं, देशा-विदेशातील अणूविद्युत कंपन्यांना कायमस्वरुपी सरकारी आर्थिक पाठबळाचा पांगुळगाडा लागतो (NPCIL व AREVA या संबंधित दोन्ही कंपन्या सरकारी मालकीच्या आहेत, हा मुद्दा कृपया नीट ध्यानात घ्या!).

() सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरी लाटा वा बायोमास यापासून निर्माण होऊ शकणारी उदंड विद्युतऊर्जा ही पूर्णत विकेंद्रित स्वरुपाची (Gridless Power) म्हणजेच खऱ्या अर्थानं ‘लोकशाहीवादी’ असत़े  मात्र अणूऊर्जा ही कमालीची केंद्रित-स्वरुपाची असल्यानं, ज्या व्यवस्थेतून दमनशक्ति व पिळवणूकीच्या आधारावर राजकीय व आर्थिक सत्ता (Oligarchic-Structure) देशातल्या मोजक्या घराण्यांच्या हातात बेलगाम केंद्रित झालेली आहे, त्याला जैतापूरसारखे अणूप्रकल्प अत्यंत पूरक ठरतात. ‘अणू’वादी हे या अर्थानं ‘मनू’वादी म्हणायला हवेतं की, ‘कमीतकमी मात्रेत अफाट ऊर्जा’ आणि ‘कमीतकमी हाती अफाट आर्थिक व राजकीय सत्ता’ ही दोन्ही समीकरणं येथे हातात हात घालून चालतात! म्हणूनच लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून असे प्रकल्प हटवादीपणे सर्रास राबविण्याचा जोरदार प्रयत्न केला जातोयं. यात कुठेही सर्वसामान्यांच्या भल्याचा-कल्याणाचा विचार असता, तर तारापूरच्या अणूप्रकल्पाच्या आजूबाजूची खेडी उध्वस्त झाली नसती वा अणूप्रकल्पांमधून दीडदमडीचा पगार देऊन बेरोजगारांना अमानुषपणे बेकायदेशीररित्या कंत्राटी-पध्दतीने वर्षानुवर्षे राबवून घेतले गेले नसते! सर्वात आश्चर्याची व खेदाची बाब ही की, खतरनाक अणूविद्युत-प्रकल्प ‘आपल्या उशाशी’ घेणाऱ्या तारापूर परिसरातील तमाम खेड्यांमध्ये सर्रास विद्युतभारनियमन असत़े त्याव्यतिरिक्त पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्षांसारख्या VVIP च्या तारापूर-अणूप्रकल्प भेटीदरम्यान अन्यायाला वाचा फुटू नये म्हणून व इतरवेळीही या प्रकल्पपिडितांची अमानुष मुस्कटदाबी व कोंडी  नेहमी केली जाते.

() अणूप्रकल्पासाठी दररोज हजारो कोटी लिटर पाणी समुद्रातून प्रचंड वेगाने खेचून घेऊन प्रकल्पात तप्त झालेले जवळजवळ तेवढेच पाणी पुन्हा भरसमुद्रात किनारपट्टीजवळ सोडले जात असल्यानं (जैतापूर अणूप्रकल्पात दररोज ५२०० कोटी लिटर) त्याभागातील समुद्री पाण्याच तापमान ५-१०°C पर्यंत वाढतं. एवढा प्रचंड पाण्याचा साठा दररोज खेचून परत सोडला जात असल्यानं, तेथील समुद्रकिनारपट्टीच्या जमिनीची प्रचंड धूप होऊन ती खचली जाते. तसेच अणूभट्टीमधून सोडलेल्या गरम किरणोत्सर्गी व विविध रसायने मिसळलेल्या प्रदूषित पाण्यानं ‘बायॉलॉजिकल् ऑक्सिजन डिमांड’(B.O.D.#) वाढल्यामुळे व सक्शन पाईपाभोवतालच्या जाळयांमुळे माशांची अब्जावधि अंडीपुंजके व पिल्ले नष्ट होतात. त्याचबरोबर जलचरांच्या अन्न साखळीतला पहिला महत्वाचा दुवा असलेले समुद्री शैवाल, पाणवनस्पती, प्रवाळांच्या वसाहती व माशांची अंडी उबविण्याची आश्रयस्थाने मोठया प्रमाणावर उध्वस्त होतात. साहजिकच माशांसारख्या जलचरांवर जगणाऱ्या पक्षी व प्राण्यांची फरपट होते. तद्वतचं मासेमारीवरच अवघं जीवन अवलंबून असणाऱ्या कोळीबांधवांनाही ‘मत्स्य-दुष्काळा’ला तोंड द्यायला लागून त्यांचा पिढयापिढयांचा कायमस्वरूपी असलेला ‘जीवनाधार’ नष्टप्राय होतो! (तारापूर अणूप्रकल्पा लगतची समुद्रकिनारपट्टी पूर्णतया खचली असून तिथला पिढीजात मत्स्यव्यवसाय बुडाल्यात जमा आहे!)

() अणूविद्युत प्रकल्पातून सौम्य व मध्यम घातक किरणोत्सारी अणूकचऱ्या सोबतच अत्युच्च तीव्रतेचा, अतिघातक व अंति सर्वनाश करू शकणारा अणूकचरा (ज्यात जगातील सर्वात विषारी पदार्थ असलेल्या प्ल्यूटोनियम-२३९ चा समावेश असतो. प्ल्यूटोनियम २,५०,००० वर्षाहूनही अधिक काळ किरणोत्सर्गी राहतोच, शिवाय त्याच्या १ ग्रॅमचा १० लाखावा भाग जरी श्वास घेताना फुप्फुसात गेला तरी फुप्फुसाचा कर्करोग  होतो.) अद्यापही अत्यंत घातक किरणोत्सारी अणूकचऱ्याची कायमची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याचा मार्ग वा तंत्रज्ञान किंवा त्याची सुरक्षितरित्या लाखो वर्षे साठवणूकीची भूगर्भीय व्यवस्थाही (geological repository) जगात कुठेही शक्य झालेली नाही. ‘जगभरातले अणूशास्त्रज्ञ आपल्या खांद्यावरची ही फार मोठया जोखमीची जबाबदारी, चक्क पुढल्या पिढयांवर आजवर ढकलत आलेले आहेत!’

() जगात युरेनियमचा साधारणपणे ५० लाख टन इतकाच मर्यादित साठा असल्याचं ‘आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा समिती’च मत आहे. नवीन युरेनियम साठयांचा शोध लागणं वगैरे खूप आशादायी दृष्टीकोन बाळगूनसुद्धा, हे साठे ३० ते जास्तीत जास्त ४० वर्षात संपुष्टात येतील, असं तज्ञांच मत आहे. त्यातल्या त्यात भारतात युरेनियमचे साठे फार माफक व कमी दर्जेदार आहेत. त्यामुळे परकिय संवर्धित युरेनियम इंधनावर पूर्णत अवलंबून राहून (त्यासाठी अमेरिकेबरोबर नागरी-अणूसहकार्य करार १२३ करून राजकीय स्वायत्तता गहाण टाकण्यात आलेली आहे.) आपला अणूऊर्जा कार्यक्रम किती वर्षे पुढे रेटता येईल, हा मोठा यक्षप्रश्नच आहे.

याबाबत भारतीय अणूशास्त्रज्ञांचं असं प्रतिपादन आहे की, भारतात मोठया प्रमाणावर उपलब्ध असलेल्या (विशेषत केरळात) थोरियम-२३२ चा व्यापारी वापर करण्याचे तंत्रज्ञान अंतिम टप्प्यात आले असून, तसे झाल्यास येत्या किमान ३००० वर्षांची भारताची ऊर्जेची गरज भागविली जाऊ शकते व अणूकचऱ्याची निर्मितीही कमालीची घटू शकते. मात्र हा पूर्णतः भूलभूलैय्या आहे व त्याला अशासाठी भूलभूलैय्या म्हणायचा… कारण, अशातऱ्हेचा प्रयत्न फार पूर्वीपासूनच म्हणजे अगदी अणूऊर्जा कार्यक्रमाच्या प्रारंभापासूनच (१९५४) केला जात आहे, परंतु ही प्रक्रिया चार टप्प्यांची आणि प्रचंड गुंतागुंतीची असल्यानं अजुन काही दशके तरी ‘थोरियम’चा व्यापारी वापर अपेक्षित नाही. त्यामुळे मूलभूत बाब ही की, प्रथम आपल्या शास्त्रज्ञांनी हे ‘थोरियम’ व्यापारी वापराचे तंत्रज्ञान सिद्ध करून दाखवावे (कारण अणूशास्त्रज्ञांनी अणूउद्योगाच्या सुरूवातीला जागतिक स्तरावर वेगानं मारा करू शकणाऱ्या ‘फास्ट ब्रीडर’ तंत्रज्ञानाविषयी कमालीचा आशावाद निर्माण केला होता. ‘क्लोज्ड लूप’ प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून एकदा इंधन म्हणून वापरलं गेलेलं युरेनियम त्याच्यावर प्रक्रिया करून परत परत वापरत राहून युरेनियमच्या मर्यादित स्वरूपाच्या जटिल समस्येवर मात करायची, असा तो ‘फंडा’ होता. पण हे सगळे यथावकाश ‘हवेतलेच इमले’ ठरले!) आणि तशी सिद्धता भविष्यात परिपूर्णरित्या पार पडली तरीही इतर अनुषंगिक अडचणींवर व धोक्यांवर, विशेषत किरणोत्सारी अणूकचऱ्याच्या समस्येवर (कारण थोरियम-२३२ तंत्रज्ञानात निर्माण झालेला अणूकचरा आजच्या तुलनेनं कितीही कमी झाला तरी त्याची तीव्रता व दाहकता शेकडो पटींनी वाढलेली असेल, हा मुद्दा मुळीच दुर्लक्षून चालणार नाही, असं तज्ञांच मत आहे) अणूशास्त्रज्ञांना अजून उत्तरं शोधावीच लागतील…. त्यात कसलीही सूट दिली जाऊच शकत नाही!

() अणूऊर्जेला पर्याय नाही?…  आजचा वीजेचा तुटवडा व भविष्यातील वीजेची वाढीव गरज भागवायची असेल, तर अणूवीजेला पर्याय नाही… हे अत्यंत बेजबाबदार, धादांत खोटे व विनाशाकडे नेणारे प्रतिपादन आहे, हे खालील गोष्टींवरून सहज ध्यानात येईल.

 • पाश्चात्य देशांमधील अतिथंड हवामान व अतिरेकी चंगळवादी जीवनशैली, याचा विचार करता कुठल्याही प्रकारे सरासरी दरडोई वीजेच्या वापराबाबत त्यांची आपल्याशी तुलना करणे, हा शुद्ध भंपकपणा आहे.
 • ‘Poverty is a great pollutant!’…असं माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. वस्तुतः ‘Affluence is a, even much, greater pollutant!’ अखिल मानवजातीच्या अंतिम व अनंतकाळच्या हितासाठी… जगाची एकूण लोकसंख्या व लोकांची जीवनशैली व त्यासाठी लागणारा  एकूण ऊर्जेचा वापर, ‘जेवढं आपण निसर्गाकडून घेऊ, तेवढं निसर्गाला परत देऊ,’ याच तत्वावर  करावा लागेल… त्याबाबत कुठलाही आणि कोणालाही ‘चॉईस’ नाही… अन्यथा याच अनिर्बंध प्रकारे  जीवन जगण्यासाठी अखिल मानवजातीला आंतरराष्ट्रीय ‘ग्रीन पीस’ संघटनेच्या म्हणण्यानुसार किमान ६ पृथ्वीसारख्या ग्रहांची आवश्यकता भासेल.
 • सध्या जगाच्या ऊर्जानिर्मितीपैकी फक्त १… वाटा सौरऊर्जेचा आहे. पण जर पृथ्वीवरच्या फक्त १… भूभागातून जरी आपण सौरऊर्जा मिळवू शकलो, तरी त्यातून अख्ख्या जगाची सध्याची ऊर्जेची भूक पूर्णपणे भागू शकेल, इतकी त्यात क्षमता असल्याचं बोललं जातं. सातत्यानं नवीन संशोधन-नव तंत्रज्ञान, मोठया प्रमाणावर ‘विकेंद्रित’ वापर यामुळे आज महाग वाटणारी ही अक्षय-ऊर्जा, भविष्यात स्वस्त व मुबलक उपलब्ध होणं सहजशक्य आहे. पाश्चात्य देशात सौरप्रारणे सौम्य असल्यानं व बारमाही नसल्यानं, या अमूल्य-चिरस्थायी ऊर्जेकडे त्यांचं दुर्लक्ष झालं… पण आपल्या देशात वर्षभर सर्वत्र मोठया प्रमाणावर सौरऊर्जा उपलब्ध असल्यानं, खरतरं स्वातंत्र्यप्राप्तिनंतर त्याचीच कास धरायला हवी होती. पण तसा आग्रह धरणाऱ्या प्रा. दा.ध. कोसंबीं सारख्या अणूशास्त्रज्ञांचे अत्यंत पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले. (अणूऊर्जेच्या वापरासंबंधानं मुळात अणूशास्त्रज्ञांमध्येच दोन उभे तट पडलेले आहेत. ज्यांच्या पर्यावरणीय व सहसंवेदना जागृत आहेत, ते अणूऊर्जेवर किंवा अणूशक्तिकेंद्रांच्या भ्रष्ट, धोकादायक व गलथान कारभारावर आसूड ओढत आहेत. मात्र काहींना करियर उध्वस्त होण्याच्या भयास्तव प्रचंड मुस्कटदाबीचा सामना करावा लागतोय. ‘चेतन कोठारी’ या माहिती अधिकार कार्यकर्त्याने मिळविलेल्या धक्कादायक माहितीनुसार गेल्या १५ वर्षात मुंबईसह  देशभरातील अणूसंशोधन व अणूऊर्जा विभागातील २४ ते ५० वयोगटातील तब्बल १९७ अणूशास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शिवाय कर्करोग आणि हृदयविकाराचे १७३३ बळी झालेतं…. हे नेमकं कशाचं द्योतक आहे?)

‘कॅलटेक’ मधील ‘नॅथन लुईस’ या जगविख्यात ऊर्जा तज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे, सूर्यापासून दरवर्षी आपल्याला १२ लाख कोटी कि.वॅ. इतकी ऊर्जा प्राप्त होते, तर वर्ष-२०५० पर्यंत संपूर्ण जगाची ऊर्जेची गरज दरवर्षी २८०० कोटी कि.वॅ. इतकी असू शकेल. या हिशोबानं पृथ्वीवरील एकूण जमिनीच्या फक्त ०.१६% भागावर सौरऊर्जा निर्मिती कस्र् शकणारी ‘सोलर पॅनेल्स्’ उभी केली, तरी  अवघ्या मानवजातीच्या एकूण ऊर्जेची गरज सहजी भागू शकेल.

 • ‘पवनऊर्जा हा दुसरा एक ‘वाढता वाढिता वाढे, भेदिले शून्यमंडळा’ असा समर्थ ऊर्जापर्याय आहे आणि जगात तो सर्वत्र बऱ्यापैकी सारख्या प्रमाणात उपलब्ध आहे. पंचमहाभूतांपैकी या ‘पवन’ महाभूताची क्षमता एवढी अफाट आहे की, एका अभ्यासगटाच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेच्या वीजेच्या गरजेच्या तिप्पट वीजपुरवठा करण्यासाठी फक्त रॉकी पर्वत आणि मिसिसिपी नदी यामधील वाऱ्यांचा प्रवाह पुरेसा आहे. म्हणजे ‘अनंत हस्ते देता कमलावराने, घेशिल किती बहू दो कराने’ अशी अवस्था मानवजातीची होऊ शकते… प्रश्न फक्त ही दडलेली सुप्त क्षमता विद्युतऊर्जेत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तिचा आहे. बरं, यात गतिज ऊर्जेचे थेट पाण्याच्या वाफेसारख्या माध्यमाविना विद्युतऊर्जेत रूपांतरण होणार असल्यानं, तसेच ती मिळविण्यासाठी इतर कुठल्याही इंधनाची गरज भासत नसल्यानं त्यात फारशी गुंतागुंत किंवा कुठलाही अनुषंगिक धोका देखील नाही.
 • बायोमास किंवा बायोपऱयुएल हे टाकाऊ जैविक मालापासून निर्माण केले गेलेले द्रवस्र्प वा वायूस्र्प नैसर्गिक इंधन स्वतंत्रपणे किंवा इतर इंधनासोबत विशिष्ट प्रमाणात मिसळून वापरण्याचे प्रमाण जगभरात वाढत चाललेले आहे. भारतासारख्या मोठया क्षेत्रफळाच्या व विपुल सूर्यप्रकाश जवळ जवळ वर्षभर उपलब्ध असलेल्या आपल्या देशात ‘जैविक माल’ मोठया प्रमाणावर मिळत असला तरी या पर्यायाकडे कितपत वळायचे, त्याचे प्रमाण एकूण त्याचा पर्यावरणावर होणाऱ्या आघाताकडे पाहूनच सुनिश्चित करावे लागेल. जगभरात सध्या सागरी लाटांपासून अक्षय विद्युतऊर्जा मिळविण्याचे नवनवे प्रयोग व मूलभूत संशोधन होत आहे व त्याचं पर्यावरणाशी असलेलं सख्य पाहता, ते निश्चितच स्वागतार्ह आहे.

इथे एक गोष्ट विशेषत्वाने ध्यानात घेतली पाहिजे की, जागतिक तपमान वाढीचा परिणाम म्हणून यापूर्वीच नमूद केल्याप्रमाणे समुद्री वाऱ्यांचा वेग अदमासे प्रतिवर्षी ०.०५% वाढत चाललेला आहे (गेल्या २५-३० वर्षांत सर्वात वेगवान वाऱ्यांचा वेग अंदाजे १०% वाढलेला आहे) तसेच समुद्री लाटांची उंची ०.०२५ ते ०.०५०% प्रतिवर्षी या चक्रवाढ गतीनं वाढत आहे (उदा. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारपट्टीवरील सर्वात उंच १% लाटांची उंची पूर्वी ५ मीटर होती, ती आता एक मीटरने वाढून ६ मीटर झालेली आहे). मानवाच्या मर्कट चाळयांमुळे खवळलेल्या या पंचमहाभूतांचा नजिकच्या भविष्यात अखिल मानवजातीला असणारा विध्वंसक धोका सुस्पष्टपणे दिसत असला, तरी क्षणभर ‘संकटात संधि’ शोधण्याच्या उद्यमशील वफत्तीचा (हवंतर त्याला इष्टापत्ति म्हणूया!) अंगिकार केल्यास एवढचं म्हणता येईल की, पवनऊर्जा समुद्रीलाटा यापासून विद्युतऊर्जा मिळविण्यास सध्या आदर्श-स्थिती आहे.

माणसाला लाकडातील ‘अग्निचा शोध’ लागल्यावर इंधन वापराच्या या पहिल्या टप्प्यापासून ‘इंधनाची निर्मिती व वापरा’च्या इतिहासानं अनेक आश्चर्यकारक वळणं घेतलेली आहेत. मुळात कुठल्याही इंधनाचा मानवाच्या विविध गरजा पूर्ण करण्यास ऊर्जानिर्मितीसाठी वापर, म्हणजेच निसर्गातील जैविक बहुविधतेमुळे व चराचराच्या साहचर्यातून निर्माण झालेल्या मानवी आकलनशक्तिच्या पलिकडील गुंतागुंतीच्या पण अत्यंत शिस्तबध्द-नियमबध्द असलेल्या, निसर्गचक्राला उलटे फिरवणे होय (उदा. विश्वातल्या वस्तूंचा कल अव्यवस्थेत (Entropy) राहण्याकडे असतो, हा सर्वसाधारण पदार्थविज्ञानाचा नियम झुगास्र्न देत, वनस्पती निसर्गातल्या सूर्यप्रकाश, कार्बनडायॉक्साईड व पाणी इ. घटकांशी कमालीच्या गुंतागुंतीची पण अत्यंत शिस्तबध्द जैविक-रासायनिक प्रक्रिया कस्र्न लाकूड व अन्य जैविक माल बनवतात. पण आपण जेव्हा लाकूड जाळतो, तेव्हा आपण ही सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया मोडीत काढून त्या संपूर्ण जैविक प्रक्रियांची उलथापालथ करतो आणि प्रकाश व उष्णता या रूपाने ऊर्जा मिळवतो.) अशाच एका पुढच्या वळणावर माणसाला खनिज तेलाचा शोध लागला आणि त्याची चिरंतन-अस्तित्व असलेल्या निसर्गचक्रातली लूडबूड-ढवळाढवळ खूपच तीव्र झाली. तसेच त्याची व्याप्ति आणि तीव्रता दिवसेंदिवस भूमितीय श्रेणीनं वाढत गेली. त्यात दुसऱ्या महायुध्दादरम्यान अणूभंजनातून E=MC या आईनस्टाईनकफत शास्त्राrयतत्वानुसार अफाट ऊर्जा रहस्याची ‘अलिबाबाची गुहा’ सापडल्यानंतर अणूबॉम्ब ऐवजी ‘शांतता-समफध्दीसाठी अणू’ अशी फसवी घोषणा देत पाश्चात्य राष्ट्रांनी अणूऊर्जेची कास धरली. १९७३ च्या अभूतपूर्व कफत्रिम तेलटंचाईनं तेलाचे भाव चौपट वाढल्यानंतर जपानसारखा देश पूर्णपणे अणूऊर्जेला शरण गेला. मात्र तोपर्यंत अणूऊर्जेतले महासंहारक धोके, पर्यावरणावर होणारे कायमस्वस्र्पी गंभीर परिणाम व खर्चिक बाबी सामोऱ्या आल्यानं अमेरिकेसारख्या अतिप्रगत राष्ट्रनं १९७३-७५ च्या दरम्यान नवीन अणूभट्टया उभारणीचा नाद सोडून दिला, तो अगदी आजतागायत! ऑस्ट्रेलियासारख्या आधुनिक देशानं तर अशा विघातक अणूऊर्जेला कधि थाराच दिला नाही.  फ्रान्स देशाची परिस्थिती मात्र सर्वस्वी भिन्न म्हणजेच सूर्यप्रकाश व अपुरे क्षेत्रफळ तसेच खनिज तेल किंवा कोळसा याची देशांतर्गत वानवा, म्हणून जनमताच्या विर्ध्द जाऊन मोठया प्रमाणावर तेथील सरकारांनी अट्टाहासानं अणूऊर्जेची धोक्याची टांगती तलवार आपल्या देशाच्या डोक्यावर ठेवलीयं.

थ्री माईल आयलंड (१९७९) आणि चेर्नोबिल (१९८६) या एकापाठोपाठ मोठया व इतर असंख्य छोटयामोठया आण्विक अपघातांच्या धक्क्यांतून कसेबसे सावरलेले ‘अणूविश्व’ फुकुशिमाच्या (२०११) आण्विकअपघातानंतर मात्र पुरतं भुईसपाट झालेलं आहे. नुकताचं जर्मनी व इटलीनं अणूऊर्जेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर चीननं वर्ष-२०५० पर्यंत देशभरातील संपूर्ण विद्युतऊर्जेची गरज सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोमास इ. अक्षय स्त्रोतांद्वारे मिळविण्याचा निर्धार कस्र्न महत्त्वाकांक्षी अणू-कार्यक्रमाला तत्काळ स्थगिती दिलेली आहे.

अशातऱ्हेनं भूकंपप्रवण व भूकंपग्रस्त ‘जपानचं’ उदाहरण देऊन भारतात आण्विक कार्यक्रम रेटण्याचा अट्टाहास करणाऱ्यांना ‘जपाननं’ चांगलाच धडा शिकवलेला असूनही, ‘गिरे तो भी टांग उपर’ म्हणणाऱ्या आमच्या दळभद्री राज्यकर्त्यांना व संबंधित अणूशास्त्रज्ञांना कायमची जरब बसेल, असा लढा आपल्याला ‘जैतापूरच्या’ रणांगणावर द्यावा लागेल. जपानच्या ‘फुकुशिमा’चा अणूसंसर्ग जर सातासमुद्रापलिकडे पोहचू शकतो, तर जैतापूरसारख्या जगातल्या सर्वात मोठया अणूभट्टीतला अणूसंसर्ग कुठपर्यंत पोहोचेल, याचा साधा ठोकताळा बांधला तरी ही वस्तुस्थिती आपल्या ध्यानी येईल की, जैतापूर-माडबनवासीय केवळ त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढून रक्त सांडवत नाहीयेतं, तर ते आपल्या सर्वांसाठी व सर्वांच्यावतीने सुद्धा लढतायतं!

…. त्यांच्या लढयाच्या यज्ञकुंडात यथाशक्ति आपल्या समिधा अर्पण करणं, हे फक्त कोकणातल्या किंवा महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आद्यकर्तव्य आहे !!!

जय महाराष्ट्र ! जय हिंद !!

                                                                           राजन राजे


(संदर्भसहाय्य :  डॉ.सुलभा ब्रम्हे, डॉ.माधव गाडगीळ, प्रफुल्ल बिडवाई, अतुल कहाते, अॅड. गिरीश राऊत, डॉ. विवेक माँटेरो, अद्वैत पेडणेकर, अनिल गचके. ….. या सर्व ज्ञानी, समाजहितैषी पर्यावरणदक्ष मंडळींचे मनपूर्वक आभार!!!)