कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा!
…औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित अपघातांची मालिका यासाठी थांबायला तयार नाही कारण, मरणारे सगळेच ‘कंत्राटी-कामगार’ असतात, ज्यांना नसतं कुठलं कायदेशीर संरक्षण, ना कुठल्या युनियनचं भक्कम पाठबळ आणि आपल्या देशातलं कामगारखातं, म्हणजे सगळा आनंदीआनंदच असतो.
त्यामुळेच, कंत्राटी-कामगाराचं (खरं म्हणजे, ‘गुलामां’चं) अपघाती मरण, ही भांडवलदारवर्गासाठी अगदी स्वस्तात व कुठलीही बोंबाबोंब न होता… कुठली कायदेशीर सजा तर सोडाच; साधा त्रासही न होता, चटावरच्या श्राद्धासारखी (तशीही, आज पितृअमावास्याच आहे म्हणा) अतिशय स्वस्तात उरकण्याची बाब होय! पोलिसांसह संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचे हात ओले केले की, झालं.
…म्हणूनच, कारखान्यांमधील औद्योगिक अपघातांची, आताशी मालकांना किंवा व्यवस्थापकीयवर्गाला फारशी भयभिती उरलेली नाही… कारण, पुन्हा ते आणि तेच की, “मरणारे कंत्राटी-कामगार म्हणजेच, आधुनिक भांडवली-व्यवस्थेतले ‘गुलाम’ असतात”.
भांडवलदारवर्गाचं देणघेणं फक्त, कंपनीच्या नफ्याशी आणि आपलं वैयक्तिक ‘करियर’ टिकवण्याशी-वाढवण्याशी असतं. भांडवलदारवर्गाला माणुसकीचा लवलेश असण्याचा तसा प्रश्नच फारसा नसतो…त्यांच्यासाठी, जी कच्च्या मालाची किंमत किंवा यंत्रसामुग्रीची जेवढी ‘पत’, तेवढीच कामगाराची किंमत किंवा पत…जशी, कच्चा माल किंवा यंत्रसामुग्रीची फक्त, ‘किंमतीची बोली’ लावण्यापुरतीच पत्रास ठेवायची असते; तशीच किंवा त्याहीपेक्षा कमी फिकीर कामगार, या मानवी-घटकाची करायची असते, एवढंच.
कामगार, हा एक जिवंत हाडामांसाचा, राष्ट्रीय-संपत्तीचा ‘निर्माता’ असलेला अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे वगैरे, त्यांच्या गावीही नसतं. त्याची टोकाची पिळवणूक करुन बोनस-पगारावरचा, त्याच्या औद्योगिक-सुरक्षिततेवरचा किंवा वैयक्तिक सुरक्षिततेवरचा; तसेच, कंपनीत अपघातात दगावल्यास कंपनीतर्फे द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईवरचा आणि त्याचा व त्याच्या कुटुंबियांच्या अपघाती-आरोग्य विम्यावरचा खर्च इ. इ. त्याच्यावरचा जेवढा जेवढा म्हणून खर्च कमी करता येईल…तेवढा तो कमीतकमी राखून, नफ्याचे आकडे व व्यवस्थापकीयवर्गाचे पगारभत्त्याचे आकडे भरमसाठ फुगवता कसे येतील, याकडेच केवळ भांडवलदारवर्गाचं संपूर्ण लक्ष केंद्रित झालेलं असतं…मग ही अपघातांची मालिका थांबूच कशी शकेल, कोण थांबवणार???
धक्कादायकरित्या, आता हेच अत्यंत उद्वेगजनक व संतापजनक लोण, लष्करातील नवतरुण ‘अग्निवीरा”पर्यंत पोहोचलंय (‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन ‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ आहे, ही आम्ही सतत गर्जून मांडणी करत होतोच, त्याचा या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने प्रत्यय यावा)…पण, आपल्या देशात ही भयानक बातमी अंबानी-अदानीच्या ‘गोदी-मिडीया’तून संपूर्ण दाबली गेल्यामुळे, भारतीय जनतेपर्यंत ती पोहोचूच शकलेली नाही आणि एका अग्निवीराचं हौतात्म्य कवडीमोल भावात किंवा बाराच्या भावात निकाली काढलं गेलं… आणि तिकडे ‘धार्मिक अथवा उत्सवी अफू’सेवनाची चटक लागलेली भारतीय जनता आपल्या सवयीनुसार कुठल्या न् कुठल्या औटघटकेच्या करमणुकीच्या नादात नेहमीप्रमाणेच आहे… या खेपेस तर, भारत-पाकिस्तान क्रिकेट-सामन्याचा ‘शिमगा’ होता, मग काय विचारता?
…तर, घडलं असं की, गेल्या बुधवारी एका भारतीय सैनिकाला जम्मू-काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर हौतात्म्य प्राप्त झालं… त्याचं नाव अम्रितपालसिंग व नंबर A2200058N, युनिट क्र.10JAKरायफल्स, रँक-अग्निवीर, वय वर्ष १९ फक्त आणि पुढे जो काही धक्कादायक घटनाक्रम घडला, तो धुरंधर व जातिवंत पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयींच्या जळजळीत शब्दांत ऐका आणि कथित ‘भाजपाई-राष्ट्रवादा’ची रांगोळी, येऊ घातलेल्या दिवाळीत कुठल्या रंगात, त्या सैनिकाच्या गावपरिसरात काढली जाईल, त्याची फक्त, मनोमन कल्पना करा…!!!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)