नुकताच, पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे माहिती-अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वसूली करणाऱ्या IRB कंपनीची जी ‘पोलखोल’ केलेली आहे….. त्याचा अंदाज यापूर्वीच ‘न’ येण्याएवढी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही. हा टोल नांवाचा ‘जिझिया कर’ वसूल करणारी IRB कंपनी ही, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हाताशी धरुन पडद्याआड ‘काळेधंदे’ करणारी ‘कॉर्पोरेट-ठग’ आहे….. हे ही महाराष्ट्रातली जनता जाणून आहे. पण, अशाच कंपन्यांच्या भ्रष्ट-कारभाराच्या मोठय़ा उलाढालींतूनच, या राजकीय पक्षांच्या निवडणूकखर्चाची ‘खिचडी’ यथास्थित शिजत असल्याने, त्यापुढे सत्प्रवृत्त मंडळींची मात्रा चालत नाहीय ही, दुर्दैवी स्थिती आहे.
या पावसाळय़ात, अपुऱ्या पावसानेही पत्त्याच्या बंगल्यासारख्या एकापाठोपाठ एक दरडी, या मुंबई–पुणे महामार्गावर का कोसळल्या…… व भविष्यात हाच ‘सिलसिला’ का कायम राहणार आहे; हे आम्ही कधि समजून घेणार ? IRB या आपल्या बगलबच्च्या कंत्राटदाराला, मुंबई-पुणे महामार्गाचं कंत्राट बहाल करून त्यातलं ‘बोक्यासारखं लोणी ओरपणाऱ्या’ आणि “गडकरी नव्हे; मी रोडकरी” अशी शेखी मिरवणाऱ्या नितीन गडकरींची आणि त्यांची जाहीरपणे राजकीय सभांमधून भलामण करुन मतं मागणाऱ्या भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांची उरलीसुरली इभ्रत….. त्या, मुंबई-पुणे महामार्गावरील कोसळणारी प्रत्येक ‘दरड’ आजवर मातीला मिळवत आलीयं आणि आता तर त्यात, “टोलची पोलखोल” झाल्यानं, फारच मोठी भर पडलीयं! भूगर्भीय –संरचनेनुसार, या अत्यंत संवेदनशील असणाऱ्या, पुणे–मुंबई महामार्ग बांधणीत केवळ, राजकीय व आर्थिक लाभ उठविण्यासाठी अक्षम्य व गुन्हेगारी स्वरुपाची केलेली घाईच, दुर्दैवी प्रवाशांना जणू खंडाळा–लोणावळा दरम्यानच्या, मृत्यूच्या खाईत लोटणारी ठरलीयं ! बांधकामतज्ज्ञांचे व पर्यावरणतज्ज्ञांचे सबुरीचे सल्ले डावलून, बेधडक मोठमोठी स्फोटके व अनावश्यक अवजड यंत्रसामुग्री वापरुन, मूळच्या बऱयापैकी मजबूत असलेल्या ऍमिग्लोडोलाईड बेसॉल्ट खडकाने बनलेल्या….. (खंडाळय़ाच्या पूर्वीच्या बोरघाटातल्या बोगद्यात, जो ब्रिटीशांनी अत्यंत काळजीपूर्वक खोदला, त्यात फक्त पाच मीटर जाडीचा असलेला, या खडकांचा थर, एवढय़ा वर्षांनंतरही थेंबभर पाणी खाली झिरपू देत नाही, तो या ‘ऍमिग्लोडोलाईड बेसॉल्ट’ प्रकारच्या अभेद्य खडकामुळेच), या संपूर्ण डोंगराळ भागाला, कायमचं खिळखिळं करण्यात आलेलं आहे ! भ्रष्टाचाराला ऊत येऊ देणाऱ्या व निसर्गाला वाकुल्या दाखवू पहाणाऱ्या …….या बेमुर्वतखोर व बेबंद बीजेपी–शिवसेनेच्या नेत्यांना, आता पुण्या–मुंबईची, सदैव ‘मरणाची घाई’ असणारी उच्चमध्यमवर्गीय जनता, कोणती शिक्षा ठोठावणार आहे ……की, यापुढेही या निसर्गावर अत्याचार करणाऱ्या, तथाकथित भ्रष्टाचारी ‘विकास–पुरुषां’वर (खरंतरं, ‘विकार–पुरुष’ !) मतांचा असाच वर्षाव (कोसळणाऱ्या दरडींसारखाच !) करत राहाणार आहे ???
याअगोदरच, समाजहितैषी माहिती-अधिकार कार्यकर्ते स्व. सतिश शेट्टींच्या खुनाचा वहीम असलेल्या IRB कंपनीवर (जी कंपनी ‘नागपूर-बारामती’च्या घातकी व भ्रष्ट ‘कनेक्शन’वर फोफावलेली आहे !), दरडीखाली हकनाक प्राण गमवायला लागलेल्या प्रवाशांच्या खुनाचा गुन्हा आणि १९८८ सालच्या भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली भ्रष्टाचाराबाबतचा गुन्हा, युती-सरकार कधि दाखल करणार आणि त्यात नितीन गडकरींना या दोन्ही खटल्यात ‘सहआरोपी’ कधि करणार ???
।। जय महाराष्ट्र । जय हिंद ।।
…राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष…. भारतातील पहिलावहिला नोंदणीकृत निसर्ग आणि पर्यावरणस्नेही पक्ष !!!)