‘अक्षय्य-तृतीये’चं महत्त्व…. “सोनं खरेदीसाठी नव्हे; तर, मातीतून ‘सोनं’ पिकवण्यासाठी !!!”

‘अक्षय्य-तृतीये’सारख्या मुहूर्तांच्या दिवशी चढ्या भावाने सोनारांकडून (हल्ली त्यांना लब्धप्रतिष्ठीत भाषेत ‘ज्वेलर्स’ म्हटलं जातं…. भले मग, ते सर्वसाधारण श्रमिक-कामगारांसारखेच रस्त्यावर उतरून ‘संपा’सारखी आंदोलने भले का करेनात…. अर्थात, ‘कंत्राटी-कामगार’ पद्धतीसारखी ‘गुलामगिरी’ व ‘नव-अस्पृश्यता’ मौजूद असताना व अत्यंत तुटपुंजे पगारमान असतानाही, हल्लीचे ‘गळपटलेले’ वीर्यहिन व थंडगार कामगार, संपाचा साधा विचारही करण्यास धजावत नाहीत, ही बाब अलाहिदा !) सोनं खरेदी करुन ‘लुटून’ घेण्याची, मराठी-परंपरा खूप जुनी आहे. कधि कोणी या सोनारांना, अशा मुहूर्तांवर आपल्याकडून बाजारातल्या त्या दिवशीच्या चढ्या भावाने, आपल्याकडचं मोडीचं किंवा नाणी-वळींच्या रुपातलं गुंतवणुकीचं सोनं विकत घेताना पाह्यलयं ???

मूळ मुद्दा, अब्जावधी सूक्ष्म जीवजिवाणूंनी व किडामुंगी-गाडुळांनी समृद्ध असलेल्या सेंद्रिय मृत्तिकेतून ‘सोनं’ पिकवण्याचा आहे. ‘अक्षय्य-तृतीया’ येतेच ती, पावसाचा ‘सांगावा’ घेऊन! पुढे लवकरच “नभं उतरु आलं की…”, अंगप्रत्यंगातून धरणी फुलायची असते. म्हणूनच, या काळात शेतकऱ्यांची लगबग चालू होते.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत (नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करण्याउद्देशानं, दगड व धसकटे उपटून फेकून देत, सोनखत-शेणखत-पालापाचोळ्याचं खतमिश्रित मातीच्या थरांना वरखाली करण्याचं काम) अक्षय्य-तृतीयेच्या दिवशी, अगणित सजीवांची वसाहत असलेल्या मृत्तिकेबद्दल कृतज्ञता भाव बाळगत बळीराजा करतो. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर मात्र ती नाही. पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपही जातं आणि ते शेतीउत्पादनाच्या दृष्टीनं श्रेयस्करही असतं. ग्रीष्मऋतुतील रणरणत्या ऊन्हात तापलेल्या जमिनीशी रुंजी घालणार्‍या पावसाच्या पहिल्यावहिल्या सरींमुळे निर्माण झालेल्या ‘वाफश्या’द्वारे (भूगर्भात तयार झालेली उष्ण वाफ) बियाण्यांमधील सुप्तावस्थेतील जीव तटातट जागे होतात व हिरवेकंच भरघोस धुमारे फोडून खुशाल मोकळे होतात.

महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने, सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही.
कारण तोवर,

“नांगराचं फाळ जमिनीच्या पोटात

शिरताना तिला म्हणालं….

माझं झिजणं व्यर्थ मी जाणलं,

पण, येताना तुझ्यासाठी गर्भारपण आणलं !!!”

…..असा, शेतमळ्यांमधून भावविभोर ‘नवसृजन-साक्षात्कार’ झालेला असतो.

या हिरवा शालू नेसलेल्या भूमातेकडे पहाताना, ज्याच्या मनी “पादस्पर्शम् क्षमस्व मे”, हा पवित्र भाव निर्माण होत नाही; तो, “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस”, या महन्मंगल मायमराठी-संस्कृतीतला ‘मराठी माणूस’च नव्हे !

ही अनुपम ऋषि-कृषी परंपरा, हे आमच्या जगण्याचं ‘निधान’ असायला हवं. पण, पाश्चात्य विकासाच्या संकल्पना आणि संस्कृतीच्या आहारी जाऊन, आधुनिक ‘रासायनिक व यांत्रिक’ शेतीचा अट्टाहास धरत, आपण सर्वनाशाकडे वेगाने चाललोयतं.

इथून पुढे येणार्‍या प्रत्येक ‘अक्षय्य-तृतीये’नं…… या विनाशकारी मार्गापासून आपल्याला दूर न्यावं आणि मानवी-अस्तित्वाची ‘शाश्वती’ देणाऱ्या ‘नैसर्गिक-शेती’कडे वळवावं, हीच ईशचरणी प्रार्थना !!!

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)