शिवछत्रपती महाराज की जय……..

सरकारी शिवजयंतिच्या पूर्वसंध्येला…. शिवछत्रपतींच्या राजनीतिची कालसुसंगततेची मांडणी !!!

ज्ञात मानवी इतिहासाचा धांडोळा घेतला तर, हे सहजी ध्यानात येईल की, माणसामाणसांमध्ये आजवर हजारोंनी युद्धे आणि जातधर्मीय दंगे झालेले आहेत…. याचाच अर्थ, मानवीसमूह एकतर युद्ध किंवा दंगे करण्यात रंगलेले असतात किंवा त्याच्या पुढील तयारीत तरी रमलेले असतात….

याचं प्रमुख कारण म्हणजे, “राजकारणी आणि त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा”! जे फाजील महत्त्वाकांक्षी असतात, ते जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी मनोवृत्तीने ‘हिंसक’ असतात…. ज्याची, प्रथम परिणती ‘शोषणा’त व अंतिम परिणती ‘युद्धा’त किंवा ‘दंग्या’त होते.

‘मानवी-क्रौर्य’, हे युद्धाहूनही जातधर्मीय दंग्यांमध्ये अमानुषतेचा कळस गाठतं! यासाठी, माणसांना न्याय्य हक्क मिळवून देण्यात येऊन ‘शांत’ करणं… हेच, राजकारणाचं एकमात्र ‘इप्सित’ असायला हवं.

“माणसाला एकवेळ पोटाला भाकरी मिळली नाही तरी चालेल; पण, ‘न्यायसत्वर मिळालाच पाहिजे”…..

“नैसर्गिक-तत्त्वावर आधारलेला, जातधर्म-निरपेक्ष निर्भेळ न्यायवेळीच मिळतो”, हे पाहून विविध जातधर्म संप्रदायांतील माणसं शांतहोऊन गुण्यागोविंदाने रहातात, हा माझा स्वतःचा तीनचार दशकांचा छोट्या स्तरावरील कार्यानुभवआहे! ‘शोषण’ थांबलं आणि ‘न्याय’ मिळायला लागला की, माणसं ‘शांत’ होतात…. माणसं ‘शांत’ झाली….  तर, त्याचा पहिला अटळ परिणाम हा होईल की, “तथाकथित सत्संगी गुरु, साधु-संत-सद्गुरु, मुल्ला-मौल्लवी, विविध धर्मगुरु” यांची तूफान चालणारी धार्मिक ‘दुकानं’ बंद होतील”; कारण, प्रामुख्याने तिथे मानसिकदृष्ट्या ‘अशांत’ व ‘अस्वस्थ’ असलेली लोकच जातात!

ही अशांत-अस्वस्थ लोकं, रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून ‘टिकींग-टाईमबाँब’ सारखी असतात. त्यामुळेच, ती येनकेनप्रकारेण ग्लानीसदृश ‘शांत’ अवस्थेत जाणं, ही राजकारणी, उद्योगपती-व्यापारी, सरकारी अधिकारी यांनी बनलेल्या व्यवस्थेची फार मोठी गरज असते. एकदा का, ही मंडळी आपल्या अशांति व अस्वस्थतेवरील ‘हुकमी उतारा’ म्हणून एखाद्या धर्मसंप्रदायांच्या ‘नादी’ लागली की, त्यांना ‘शांतते’चा एक ‘अहसास’ किंवा ‘आभास’ व्हायला लागतो. पण, मुळातूनच तो ‘आभास’ असल्याने, टिकाऊ स्वरुपाचा वा खरा नसतो आणि त्यामुळेच, त्या आध्यात्मिक-दारुचा ‘उतारा’ सतत घेत रहाणं, ही या भोळसट मंडळींची एक मानसिक गरज बनते! आपापल्या धर्मसंप्रदायातले धर्मगुरु पाजत असलेल्या, या आध्यात्मिक दारु वा अफूच्या मात्रेमुळे, वरकरणी ही मंडळी शांत होत जातात; याचं प्रमुख कारण म्हणजे, त्यांची अन्याय-शोषण सहन करण्याची आंतरिक ताकद, नित्यनेमाने धर्मप्रवचने ऐकत राहिल्याने वाढीला लागते. पाजी-पापी व्यवस्थेनं बाहेर चालवलेलं शोषण, चालवलेला अन्याय-अत्याचार…. मात्र, फसफसतच राहीलेला असतो आणि तो थांबविण्याची वा कमी करण्याची व्यवस्थेला आता गरज उरलेली नसते. याचं प्रमुख कारण म्हणजे, या भोळ्याभाबड्या मंडळींच्या मेंदूचा ताबा, एव्हाना या ‘स्मार्ट व हुश्शार’ धर्मगुरुंच्या हातात गेलेला असतो. या पामरांची वाढलेली ‘सहनशक्ति’च, या अशा अन्यायी व्यवस्थेविरुद्ध ‘बंड’ करण्याची, त्यांची प्रेरणा कायमची ‘खच्ची’ करुन टाकते… व्यवस्थेला नेमकं तेच हवं असतं! म्हणूनच ही व्यवस्था, उघड वा छुप्या रितीने, अशा पायलीच्या पन्नास धर्मसंप्रदायांना प्रचंड रसद पुरवत रहाते; कारण, या ‘धार्मिक-संस्थां’ची एकदा का श्रीमंत-अतिश्रीमंत खाजगी ‘संस्थानं’ बनली की, ती सदरहू व्यवस्थेचाच यथावकाश एक अविभाज्य ‘हिस्सा’ बनून जातात. जागोजागी, राजकारणीवर्ग, उद्योगपती-व्यापारीवर्ग, नोकरशहा, समाजातला इतर अभिजनवर्ग (कलावंत, खेळाडू, साहित्यिक वगैरे) हे त्या धर्मसंप्रदायांचे उघड उघड ‘पाईक’ बनून वावरायला लागतात. वरकरणी, हजारो-लाखोंचे आपले कळप हाती घेऊन, काही समाजोपयोगी कामं या संस्थांकडून होत रहातात (उदा. वृक्षारोपण-वनीकरण, स्वच्छतामोहिम, मुलांसाठी संस्कारकेंद्र चालविणे वगैरे)… पण, लायन्स क्लब, जायन्ट्स् क्लब वगैरे संस्था जशा वरकरणी समाजोपयोगी कामं करताना दिसतात; मात्र त्यांचा आंतरिक हेतू , बहुशः सभासदांचे आपापले व्यवसाय, हितसंबंध वाढविणे वा ‘काँटॅक्टस्’ वाढवणे, हाच जसा असतो…. तसाच, या आध्यात्मिक-संस्थांचा (खरं म्हणजे, ‘संस्थानं’) मूलतः उद्देश समाजाला ‘थंड’ आणि ‘षंढ’ बनवून, शोषक-अन्यायी-भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कुठल्याही स्वरुपाची सार्वत्रिक बंडाळी होऊ ‘न’ देणं, हाच एकमेव असतो!

शिवछत्रपतींनी तहहयात, या अशा तत्कालिन जुलमी व्यवस्थेविरुद्ध प्राण पणाला लावून ‘एल्गार’ पुकारला. सर्वसामान्य जनतेला नाडणाऱ्या, छळणार्‍या सरदार-बरकदारांचे व त्यांना मतलबी ‘आध्यात्मिक’ साथ देणाऱ्या ढोंगी धार्मिक-ठेकेअसेदारांचे संपन्न वाडे, गढ्या गाढवाचे नांगर लावून जमीनदोस्त केल्या व प्रजेला हजार वर्षानंतर प्रथमच मोकळा श्वास घेण्याची ‘व्यवस्था’ निर्माण केली! कोण कुठल्या जातधर्माचा याचा काडीमात्र विचार ‘न’ करता, कुणाच्याही कसल्याही लागेबांध्यांचा कवडीचाही विचार ‘न’ करता अपराध्यांना कडक शासन केलं.

आजच्या घडीला, “दंगेखोर कुठल्याही ‘जातधर्मा’चा असो…. त्याबाबत, यःकिंचितही भेदभाव ‘न’ करता, शिवछत्रपतींच्याच राजनीतिनुसार अत्यंत कठोर व्यवहार केला गेला…. तरच त्याला, ‘धर्मराज्य’ म्हणायचं… निःशस्त्र-निष्पाप नागरिकावर उगारला जाणारा दंगेखोराचा ‘हात’ खाली येण्याअगोदरच, त्याच्या छातीचा वेध, पोलिसांच्या वा सैनिकांच्या बंदुकीतल्या गोळीनं क्षणार्धात घेतला, तरच त्याला म्हणायचं… ‘धर्मराज्य’!!”

“‘धर्मराज्य पक्षा’साठी पोलिसी किंवा लष्करी गोळीबारात मरणार्‍या जातीय ‘दंगेखोरां’ची संख्या, ही म्हणूनच बस्स् एक फक्त, ‘गणिती-संख्या’ असेल!!!”

‘शिवछत्रपती’, हा माझा एकमात्र ‘आदर्श’ असण्याचं प्रमुख कारण हेच की, या ‘रयतेच्या राजा’नं काटेकोरपणे प्रजाजनांना जातधर्म-निरपेक्षवृत्तीने सदैव ‘न्याय’ मिळवून दिला…. ‘शिवछत्रपती’ म्हणजे निव्वळ “तलवारबाजी नव्हे; तर उच्चकोटीच्या जीनवमूल्यांसाठी लावलेली प्राणाची ‘बाजी’ होय”!

शिवछत्रपती, हे कधिही युद्धखोर वृत्तीने चुकूनही वावरलेले तुम्हाला इतिहासात दिसणार नाहीत…. तहहयात, नाईलाजापोटीच व ‘शेवटचा उपाय’ म्हणूनच त्यांनी ‘शस्त्र’ हाती घेतलेलं तुम्हाला दिसेल. उलटपक्षी, आपल्या आयुष्यातला उमेदीचा व अतिशय मोलाचा वेळ, त्यांनी “राज्यकारभाराची घडी, ‘न्याय्य’ पद्धतीनं लावण्यात व्यतित केला”.

म्हणूनच, “हातात तळपती तलवार घेतलेला अश्वारुढ ‘शिवछत्रपती’ कमी दाखवला जावा आणि नांगरधारी शेतकऱ्याच्या पाठीवर आधाराचा हात व शाबासकीची थाप देणारा ‘शिवाजी’, जास्त दाखवला जावा”!

शिवछत्रपतींच्या काळात, जातधर्मीय अभिनिवेश संपूर्णया गळून पडल्याचं दिसणं व प्रजानन एकोप्यानं आणि गुण्यागोविंदानं नांदताना दिसणं, हे फारच लोकविलक्षण व अलौकिक कार्य होतं…. म्हणूनच, ‘शिवछत्रपती’ हे राष्ट्रीयस्तरावरील नव्हे; तर, आंतराष्ट्रीयस्तरावरील ‘महान व्यक्तित्व’ होय !!!

देशात-महाराष्ट्रात ‘औरंग्यां’चा हैदोस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सुरुच आहे; पण, ‘जावळीच्या मोर्‍यां’चीही काही कमतरता नाही. या महाराष्ट्राच्या मातीला, या मातीतच जन्मलेल्या व उठताबसता शिवछत्रपतींचे नांव घेऊन राजकारणाचा ‘धंदा’ करणाऱ्या उंदीर-घुशींनी पार पोखरुन टाकलायं… महाराष्ट्र मराठी-मुठीतून झपाट्यानं निसटायला लागलायं… आता, महाराष्ट्र वाचवायचा असेल, मराठी-मुठीत घट्ट धरुन ठेवायचा असेल; तर, त्या शिवरायांच्या ज्वलंत राजनीतिनुसारच पुढची राजकीय पाऊलवाट चालावी लागेल… त्यासाठी, फार मोठी मानसिक तयारी करुन राजकीय संघर्ष करण्यासाठी सिद्ध व्हावं लागेल….

कंत्राटी-कामगार व कंत्राटी-शेती पद्धत लादून, तळागाळात गुलामीनव-स्पृश्यतानिर्माण करणाऱ्या, या व्यवस्थेविरुद्ध कृद्ध होऊन नीतिने, सचोटीने जातधर्मीय अभिनिवेश दूर फेकून एकवटावं लागेलं… फार मोठा राजकीय संघर्ष करावा लागेल!

त्या कारणे, आम्ही शिवछत्रपतींच्याच राजनीतिनुसार चालणार्‍या धर्मराज्य पक्षाचा झेंडा फडकवत सज्ज झालोत…. तुमचं काय ???

धन्यवाद…..

जय महाराष्ट्र ।  जय हिंद ।।

……राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)