{मुरलेले राजकारणी कसे असतात, हे काही कुणाला सांगायला नको. म्हणूनच, “पाॅलिटिक्स् इज द् लास्ट रेझाॅर्ट ऑफ् स्काॅऊंड्रल्स्”, असं म्हटलं जातं. ज्याच्या पायावर डोकं ठेवावसं वाटावा, असा मला आयुष्यात भेटलेला एकमेव राजकारणी म्हणजे, आमचे कै. गोपाळ दुख॔डेसर! जेव्हा हे गृहस्थ प्रथम मला सावंतवाडीत भेटले; तेव्हाच जाणवलं की, तहहयात दगदग सोसून, वयाच्या मानानं हा अवलिया पार थकून गेलायं…. एवढा की, आहे त्यापेक्षा वयानं पंधरावीस वर्षांनी मोठा वाटावा. अशा देवमाणसाला आजुबाजुचा समाज एवढा वापरुन घेतो की, ती व्यक्ति यथावकाश पार पिचून जाते. सरांचं नेमकं तेचं झालं. अनेकोनेक आंदोलनकर्त्यांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक संघटनांनी दुखंडेसरांना जनतेच्या हितासाठी अविश्रांत राब राब राबवून घेतलं…. मग, कोकणातली ‘नाऱ्यादादा’च्या गुंडगिरीला निधड्या छातीनं तोंड देत केलेली जैतापूर अणुप्रकल्पविरोधी आंदोलनं असोत वा धोपावे-तवसाळ औष्णिक ऊर्जाप्रकल्पाविरोधातली असोत वा दुखंडेसर आयुष्यभर लढलेली असंख्य आंदोलनं असोत!}
आपला समाज आता कल्पनेपलिकडे विकृत झालायं. तो अशा सत्प्रवृत्त व सच्छिल व्यक्तिमत्वाच्या उमेदवारांना निवडून नाही देत…. तर फक्त, त्यांचा गरज भासेल तेव्हा शब्दशः ‘वेश्ये’सारखा वापर करुन घेतो आणि धनदांडग्या गुंडापुंडांना निवडणुकीत नुसतीच मतं नव्हेत; तर, आपला आत्माही विकून खुशाल मोकळा होतो. तीन वेळा निवडणुकीतल्या दारुण पराभवाचं अपयश पचवताना… सर्वसामान्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या सद्गृहस्थाला त्या प्रत्येक पराभवाच्या वेळी नेमकं काय वाटलं असेल? कुठल्या भावनांचा कल्लोळ त्यांच्या अंतःकरणात उठला असेल?? त्यांच्या सहवासात असताना माझी कधि या विषयावर बोलायची छाती झाली नाही; पण, जेव्हा केव्हा तेचं प्राक्तन आमच्या वाट्याला आलं, तेव्हा धुमकेतूसारखे सर उगवायचे आणि पाठीवर प्रेमानं हात ठेवून एवढचं म्हणायचे, “राजे, चालायचचं….. आपण आपलं काम नाही थांबवायचं. आपण काम करतोयं म्हणून तरी काही ठीक चाललयं, नाहीतर मग विचारायलाच नको!”
आज ‘सर’ आपल्यात नाहीत…. लोकांसाठी अविश्रांत झटलेला एक निर्मोही व जाज्वल्य नेता काळाच्या पडद्याआड अखेर ‘विश्राम’ घेता झाला. ही त्यांची ‘एक्झिट’ एकूण त्यांचं प्रकृतिमान पहाता धक्कादायक नसली; तरी हादरवून टाकणारी यासाठी आहे की, आता निरपेक्ष, अनुभवसंपन्न व सखोल राजकीय चर्चा करायची तर, करायची कुणाशी…. हा माझ्यापुढचा आ वासून उभा राहीलेला प्रश्न आहे. सरांशी चर्चा करताना (अगदी सध्याच्या माझगाव डाॅकमधील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या युनियन प्रवेशाच्या संदर्भात देखील) यच्चयावत सगळ्याच प्रस्थापित राजकारण्यांची बदमाषी व स्खलनशीलता उलगडत जायची व परिस्थितीचं यथास्थित आकलन होणं सोपं व्हायचं. सर्वसाधारणपणे पंधरावीस दिवसात एकदा तरी सरांचा कुठून कुठून फोन यायचा आणि मग तासभर भरभरुन राजकीय घटनाक्रमावर सर बोलत रहायचे. त्यातून, अनेक महत्त्वाचे धागदोरे जुळायचे, आंदोलनांचे वा लेखांचे मुद्दे पक्के व्हायचे (मराठा-महामोर्चावरील ‘कृष्णार्पणमस्तु’ हा विशेषांक, केवळ आणि केवळ सरांनी धरलेल्या आग्रहामुळेच माझ्या हातून उतरला)……
…….तसाच, गेल्या रविवारी (११ जून-२०१७) संध्याकाळी उशिरा, मला मी माझ्या शेतावर असताना गावी सरांचा फोन आला. दोन दिवसांनी सरांच्या दुःखद निधनाची बातमी आली तेव्हा, मागे वळून सहज मी सरांच्या आलेल्या फोनची काॅल-रेकाॅर्डवरची वेळ तपासली; ती सं. ६.५४ अशी होती…. ६,५,४…… अशी संध्याकाळच्या उतरत जाणाऱ्या ऊन्हासारखी उतरंडीला लागलेली! तळागाळातल्या माणसांच्या कल्याणासाठी आणि निसर्ग-पर्यावरण संरक्षणासाठी झटणारा एक ‘मंगल दीप’ हळूहळू निमण्याचे संकेत तर, त्या ‘उतरत्या’ वेळेत नव्हते ना???}
त्यावेळी, गोपाळ दुखंडेसरांचा माझा घडलेला संवाद मी खाली उद्धृत करतोयं………
गोपाळ दुखंडेसर : राजे, बातमी कळली असेलच ना?
मी (राजन राजे): नाही हो सर, मी इथे मुरबाडला माझ्या गावी शेतावर आहे…. वीजेचा खांब पाऊसवाऱ्यानं कोसळून पडलायं, वीजेचा पत्ता नाही आणि दिवसभरात कामाच्या व्यापात वेळच मिळाला पाही टीव्ही पहायला…. बोला ना सर, काही विशेष?
सर : अहो, शेतकऱ्यांचा संप मिटला… सरकार झुकलं.
मी : पण, सर….
सर : असू द्या हो राजे…. कोण शेतकरी नेते काय लायकीचे आहेत, हे काय आपल्याला माहीत नाही काय? पण, ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की, नोटाबंदीसारखा मरणाचा त्रास भोगूनही शांत राहीलेला सामान्य माणूस, या मोदींच्या राजकारणाविरुद्ध जागा व्हायला लागलायं. आता तुम्हीही उठा…. चार दिशांना तोंड असणारे, शेतकरी नेते कसे एकत्र आले, शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे. तसचं आता तुम्ही साऱ्या महाराष्ट्रातल्या कंत्राटी-कामगारांना एकत्र करुन उठाव करायला लावा. तरच, ही तुम्ही म्हणता ती कंत्राटी-कामगार पद्धतीची गुलामगिरी नष्ट होईल.
मी : सर, शेतकरी आणि कामगार-कंत्राटी दोघांची परिस्थिती केवढी भिन्न आहे… शेतकऱ्यांनी संप केला तर कोणी त्यांचा सातबारा काढून घेत नाही… शेतकरी स्वतः उपाशी मरणार नाही, संप केला म्हणून. इथे कंत्राटी-कामगारांनी नुसतं संपाचं नांव काढलं तरी त्यांची नोकरी गेलीच समजा. मग, कसला तो लढतो? शिवाय, शेतकऱ्यांसारखी ना त्याची मरायची तयारी, ना मतं द्यायची तयारी… मग, सर होणार कसं?
सर : राजे, ते काही बोलू नका…. सध्या जनता दीर्घकाळानंतर संतप्त झाल्याचं दिसतयं…. तवा गरम झालाय, या बदमाषांच्या व्यवस्थेला जोरदार चटके देण्याची हीच वेळ आहे. उठा आणि कार्यकर्त्यांना जागं करा… हलवा त्यांना गदगदून.
मी : सर, शेतकरी आंदोलक एक कोटी सातबाराधारक मराठी भूमिपूत्र आहेत…. नाही म्हटलं तरी, त्यांच्यात एक समान धागा आहे. एकमेकाबद्दल कुठेतरी आस्था आहे. इथे बारा प्रांतातले कामगार येतात, त्यांना इथल्या कशाशी देणंघेणं नसतं…. कोण मरतोय आणि कोणाच्या पुढ्यातलं ताट आपण ओढून घेतोयं, याचा तिळमात्र विचार त्यांच्या मनाला स्पर्श करत नाही. प्रत्येक कामगार, हा वेगवेगळ्या उपग्रहावर रहात असल्यासारखा शहरात वावरतो…. संधि मिळेल तोवर व संधि मिळेल तशी कुठल्याही पगाराची नोकरी करतो. त्याचं चित्त त्याच्या उत्तरभारतातल्या गावाकडे लागलेलं असतं. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, न वाजली तर मोडून खाल्ली… ही त्याची नोकरीप्रति हिणकस धारणा असते. त्याचा गंभीर परिणाम संपूर्ण कामगार चळवळीवर होत रहातो, सर. तुम्ही म्हणता, ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं नाही; पण, व्यवहारतः अशक्य आहे. शिवाय, या व्यवस्थेच्या ‘पोपटाचा प्राण’च या कंत्राटी-पद्धतीतल्या लुटमारीत दडलेला आहे आणि त्याकामी सगळेच प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते एकत्र आहेत. उद्योगपतींची कर्जमाफी असो नाहीतर, शेतकऱ्यांची…. कोणी खोलवर विचार केला तर, हे ध्यानात येईल की, कामगार-कर्मचाऱ्यांच्या, विशेषतः कंत्राटी-कामगारांच्या, टोकाच्या शोषणातूनच ही असली कर्जमाफी परवडू शकते. हल्ली शेतात पैसा पिकत नाही, पिकतो तो कारखान्यात!
सर : बघा, तुमच्याकडे मी आशेनं हा विचार मांडला… दुसरं कोण आहे? शेवटी तुम्ही ठरवा… पण, मला ना हल्ली थकल्यासारखं फार होतं…. नाहीतर मी तुम्हाला ठाण्याला येऊनच भेटणार होतो. मागे, गोरेगावात नितीशकुमार आले होते, तेव्हाही नितीशकुमारांच्या सभेनंतर तुम्हाला आवर्जून भेटलो तसा…. तुम्ही काही त्या कपिल पाटलांसारखा तुमचा पक्ष बिहारी नितीशकुमारांच्या पक्षात विलीन करणार नाही, हे पक्कं ठाऊक आहे मला. तुमचे मराठी माणसाचे विचार, निसर्ग-पर्यावरण संरक्षणाचे विचार आज कुणाला टोकाचे वाटले तरी, उद्या त्याच्याशिवाय पर्याय नाही, हे तितकचं खरं… बघूया, बरं वाटलं तर, येतो लवकरच ठाण्यात. तुम्ही कंत्राटी प्रथेविरोधात शेतकरी आंदोलनासारखं काही जमतयं का, ते तोवर पाहून ठेवा. पण, फार वेळ जाऊ देऊ नका…
मी : सर, मुळात मला या एकूण शेतकरी आंदोलनाविषयी आणि त्यांच्या रासायनिक-यांत्रिक घातकी स्वरुपाच्या शेतकी धोरणाविषयीही तुमच्याशी पुन्हा एकवार बोलायचयं.
सर : अहो राजे, ती रासायनिक शेती आहेच मोठी घातकी…. पण, करता काय? आलिया भोगासी…. आता आम्ही म्हणतो, जेवढं जमतयं, तेवढं तरी बरं काही करुया… तुम्ही लिहा की, त्यावर एकदम परखड… जसं मराठा-महामोर्चाच्या वेळेस लिहलतं! स्वामिनाथनपासून, शरद जोशी ते त्यांच्या चेल्याचिलटांपर्यंत, त्यांची कातडी सोलवटून काढणारं लिहा दणकून…. सत्याची मांडणी निर्भीडपणे करा, तुमच्या शैलीत…. फुकट नाही जायची ती मेहनत, राजे. तुम्हाला वाटतं असेलं, एवढे मराठा-महामोर्चाच्या विशेषांकाच्या लाखो प्रति वाटूनही लोकं धर्मराज्य पक्षाला मतं देत द्यायला तयार नाहीत. पण, मी तुम्हाला सांगतो…. इथे कोकणात, अगदी सावंतवाडीपर्यंत, दबक्या आवाजात का असेना; पण, तुम्ही केलेल्या महामोर्चाच्या परखड चिकित्सेची चर्चा आहेच चालू. जयप्रकाश नारायण आम्हाला नेहमी सांगायचे, “तरुणांनो, मतं मिळत नसली तरी, निराश न होता काम करत रहा….. एक दिवस असा येईल की, मतदान करताना जनतेच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त तुम्हीच असाल”…. मी राजे, तुम्हाला तेच सांगतोयं. हं, खूप वेळ झाला, फोन धरलेला हात जरा थरथरतोयं…. ठेवतो फोन.
…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)