आजच्या काळात ‘कार्यकर्ता’ शब्द उच्चारताच, जी आपल्या डोळ्यापुढे एक कलंकित ‘प्रतिमा’ उभी राहते, त्या प्रतिमेला पूर्णतः छेद देणारे जाज्वल्य कार्यकर्ते मला माझ्या तीन तपांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत लाभले, हे माझं फार मोठं भाग्य होय! नाही म्हणायला, आपले स्वार्थी व बदमाषीचे ‘अॅजेंडे’ घेऊन फिरणारे अत्यंत हिणकस कार्यकर्तेही याच कालखंडात दुर्दैवाने नशिबी आलेच…. त्यातले तर काही, चोवीस तास आमच्याबरोबर वावरणारे होते. पण, त्यांचं ‘खरं स्वरुप’ निर्विवाद उघडं पडल्यावर, “जो चुकला, त्याला ठोकला”, या शिवछत्रपतींच्या कठोर राजनीतिनुसार त्यांच्या ‘जातधर्मा’चा कवडीचाही कधि साधा विचार न करता, अशांना आम्ही लत्ताप्रहार करुन संघटनेतून वेळ न दवडता, हाकलूनसुद्धा दिलं…. उद्याही वेळ आली तर अशा हलकटांना हाकलून देऊ; पण, कुठल्याही परिस्थितीत संघटनेच्या नीतितत्त्वांची आणि लौकिकाची ध्वजपताका जराही ढळू दिली जाणार नाही, याची आमच्या तळागाळातल्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांना पूर्ण जाणिव आणि तशी पक्की खात्री आहे!
“जे माझे हाडाचे कार्यकर्ते होते व आहेत, ज्यांच्या माझ्यावरच्या निष्ठा त्यांच्या उभ्या आयुष्यात कधि क्षणभरही ढळल्या नाहीत वा त्या निष्ठांच्या आड त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाला कधि अंशानं पण आडवं येऊ दिलं नाही”, असे ‘सुरेश खरे’सारखे कार्यकर्ते तहहयात माझ्यासोबत ‘टिकले’ असेच नव्हे; तर, कठीण प्रसंगातूनही कठोर परीक्षा देत ‘टिच्चून’ राह्यले…. पण, पण ते नियतीपुढे मात्र ‘टिकू’ शकले नाहीत!
प्रथम चंद्या आचरेकर गेला, मग विशा ओवळेकर गेला. आमच्या संघटनेनं नियतीला केलेलं तेही ‘बळी-दान’, नियतीला कमी पडलं म्हणून की काय, पाठोपाठ शांताराम म्हात्रे आणि हेमंत पाटीलही असाच भरल्या ताटावरुन व भरल्या संसारातून उठून निघून गेला. यातल्या कोणीही “भाई, निरोपाची वेळ आलीय”, असं म्हणत जाताना साधी कल्पनाही मनाला कधि जाणवून दिली नाही हो.
आमचा ‘सुरेश खरे’ मात्र, रोज थोडा थोडा मृत्युच्या जबड्यात जाताना आम्ही पहात होतो…. पण, आम्ही काय किंवा एवढं प्रगत झालेलं आधुनिक विज्ञान काय, फारसं काही करु शकण्याच्या क्षमतेत आता या त्याच्या दुर्धर स्थितीत राहीलेलं नव्हतं! अनियंत्रित ‘मधुमेहा’नं ग्रस्त झालेल्या सुरेशच्या देहातली मूत्रपिंडं गेल्यावर्षीच साफ निकामी झालेली होती. कसंबसं, ‘डायलिसीस’च्या उसन्या बळावर त्याचं दिवस ढकलणं चाललं होतं. पण, आश्चर्याची बाब ही की, या साऱ्या वैद्यकिय समरप्रसंगात आम्ही त्याला दुर्मुखलेला म्हणून कधि पाह्यलाच नाही… सतत हसतच असायचा हा उमदा गडी…. जवळ येऊन ठेपलेल्या मरणालाही भीक न घालता हसय हसत बिनधास्त सामोरा जाणारा!
“बाबासाहेंबांच्याच जन्मदिनी जन्माला आला आणि त्यांच्याच महापरिनिर्वाणाच्या पूर्वसंध्येला, हा माझा सर्वात निष्ठावान ‘आंबेडकरी’ तरुण कार्यकर्ता व मित्र, जगातून निघून गेला”… हा केवढा मोठा ‘योगायोग’. नुकताच, माझ्यावर ‘अॅट्राॅसिटी’ कायद्याअंतर्गत तद्दन खोटा खटला दाखल करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला (तसा तो महाराष्ट्रात व देशात अनेक ठिकाणी अनेकांच्या बाबतीत व्हायला लागलायं, हे आंबेडकरी चळवळीचं मोठं दुर्दैवं व अपयश आहेच!)… ‘धर्मराज्य पक्षा’च्या घोषणांचं हितकारक ‘मर्म’च ध्यानात न आल्यानं, काही हकनाक दुखावल्या गेलेल्या मराठी आंबेडकरी तरुणांकडे मला ‘दिलगिरी व माफी’ व्यक्त करावी लागली व ती मी आनंदाने व्यक्त केली (कारण, प्रामुख्याने ज्या तळागाळातील मराठी तरुणाईसाठी मी लढतोयं, ती माझीच ‘मराठी पोरं’ नकळत का होईना, आमच्याकडून दुखावली गेली असतील तर, त्यांचं सांत्वन व्हायला नको?). मात्र, अनेक मागासवर्गीय मराठी तरुणांना, आजही मी माझ्या रक्ताचं पाणी करुन, जीवावर उदार होऊन केवळ, त्यांच्याच भल्यासाठी दिवसरात्र राबतोय, हे पुरेसं ध्यानातच येत नसताना… हा असा ‘योगायोग’ घडावा, यामागे नियतीच्या मनात नेमकं काय असावं?
मी नेहमी म्हणतो, “या जगातले तद्दन सगळी दुर्जन मंडळी, आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेत असतात. बहुधा, सर्व जगाला उपद्रव देण्याचं, छळण्याचं त्यांचं ‘पवित्र व ऐतिहासिक’ कार्य (?) त्यांना परिपूर्ण करुनच या जगातून नाहीसं व्हायचं असावं. ते प्रदीर्घकाळ जगतात…. पण, सत्प्रवृत्त मंडळी मात्र नेमकं उलटं वागतात व फार कमी जगतात!” संसारातली स्त्री जशी स्वतःच्या तब्येतीची फिकीर न करता, कुटुंबाची ऊस्तवार करत रहाते… तसेच, हे सज्जन-सत्प्रवृत्त कार्यकर्ते, स्वतःकडे बिलकूल लक्ष ‘न’ देता संघटनेची व नेत्याची काळजी वहात रहातात. मूत्रपिंड निकामी झाल्याचं लक्षात आल्यानंतर, सुरेशला जेव्हा पहिल्यांदा इस्पितळात दाखल करण्यात आलं; तेव्हा, मी त्याला एका लग्नसोहळ्याच्या गडबडीतून पटकन निघून, तातडीनं असलं त्याला भेटायला तिथे गेलो…. तर हा पठ्ठ्या, “भाई, तुम्ही कशाला एवढा त्रास घेऊन धावपळ करत आलात”, असं एवढचं मला म्हणून थांबला नाही; तर, सभोवतालच्या सगळ्यांवरच “भाईंना कळवून त्यांना का त्रास दिलात, म्हणून त्याही स्थितीत डाफरायला लागला”…. हेच ते प्रेम, हीच ती निष्ठा, हीच ती कळकळ !!!
“राजकारण, हा आता अतिशय वाईट पद्धतीनं बदमाषांचाच अड्डा बनल्यानंतर, खालच्या दिशेला (अधोगतिला) नजर वळवून बसलेल्या मराठी तरुणाईला, वर नजर उंचावून पहाण्याची सवय जडावी”…. म्हणून, समाजकारणात व राजकारणात आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’च्या माध्यमातून अढळ असे काही ‘दीपस्तंभ व मापदंड’ रोवायला घेतलेतं!
अज्ञान, अनीति, आळस, फुकटेगिरी आणि भ्रष्ट व्यवहाराच्या गर्तेत भरकटलेल्या मराठी तरुणाईला सन्मार्गावर ‘मार्गस्थ’ करण्याची मोठी जबाबदारी नियतीनं आमच्या खांद्यावरच टाकलेली असताना….. सुरेश, तुझी अनुपस्थिती आम्हाला खूपच जाणवेल. आता, कुठल्याही समरप्रसंगात सावलीसारखी साथ देणारा, हितशत्रूंच्या व विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारा हा अत्यंत ‘डेरर’ असा माझा आंबेडकरी ‘साथी’ आता आजुबाजुला नसेल… तेव्हा, अख्खी ‘रक्तपिपासू-शोषक’ व्यवस्था अंगावर घेतलेला मी, पूर्वीसारखाच तेवढा बिनधास्त फिरु शकेन ???
…… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)