पुढच्या निवडणुकीत “नाॅकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लाॅकडाऊन”…..

नोटबंदी, आर्थिकमंदी आणि आता, अंतहिन संचारबंदी… कृतिशून्यतेतील नरेंद्र मोदीकृत धोरण-विकृती!

….निदान, पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान प्रामाणिकपणे म्हणतोय तरी की, “संभाव्य करोना व्हायरसची साथ आटोक्यात आणण्याकामी पाकिस्तान सरकार संसाधनांअभावी हतबल”! या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारचं सार्वजनिक आरोग्यसेवेचं प्रगतीपुस्तक काय म्हणतयं, जरा पाहूया. आम्ही राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या केवळ १.८% (याच, मोदी सरकारचं २०२५चं आरोग्यसेवेवरच्या खर्चाचं लक्ष्य २.५% एवढंच आहे) एवढाच सार्वजनिक आरोग्यसेवेवर खर्च करतो आहोत…. जेव्हा, प्रगतराष्ट्रे दुहेरी आकड्यात ‘जीडीपी’च्या १५-१८% एवढा मोठा खर्च करत असतात. अगदी, नेपाळ, श्रीलंका, भूतान, इंडोनेशिया, थायलंडसारखे गरीब देशदेखील सार्वजनिक आरोग्यसेवेवर भारतापेक्षा जास्त टक्केवारीने खर्च करतात. “तहान लागल्यावर विहीर खणावी”, तशीच आजची रु.१५,००० कोटींची सार्वजनिक आरोग्यसेवेवरील खर्चाची मोदींची घोषणा होय. खरंतरं, यापेक्षाही कैकपटीने जास्त खर्च नरेंद मोदींचा भारतीय जनता पक्ष निवडणुकांवर करत असतो.

जगभरात करोना विषाणुची दहशत पसरत असताना आम्हाला दिल्लीतील धार्मिक-दंगली, डोनाल्ड ट्रंप यांच्या ‘केम छो’ किंवा ‘नमस्ते’ ट्रंप भेटीत जास्त राजकीय रस होता….

कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात सापडला होता केरळमध्ये ३० जानेवारी २०२० रोजी… म्हणजे,

आपल्याला पूर्वतयारीसाठी तब्बल ५१ दिवस उपलब्ध होते!

आपण या ५१ दिवसात काय केले? तर, देशभर नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या गदारोळात ते लाखमोलाचे दिवस वाया घालवले.

१) ३० जानेवारीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला बजेट जाहीर झाले, ज्यात, सार्वजनिक आरोग्यासाठी धड २%ही तरतूद नव्हती.

२) पुढे CAA वरुन शाहीनाबागसह देशभर, भाजपा नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे करुन वातावरण पेटवले… दिल्लीत लाल रक्ताची होळी खेळली गेली… ज्यात, ४७ लोक मृत्युमुखी पडले.

३) ट्रम्पच्या स्वागतासाठी पाण्यासारखा पैसा अक्षरशः गटारातही ओतला गेला (गटारात अत्तरे फवारली), चीनच्या भिंतीची आठवण व्हावी, अशी “गरीबी छुपाओ” भिंत बांधली… चीनसारखी १० दिवसात इस्पितळे मात्र, आपण बांधली नाहीत.

४) कोरोनाचा धोका वाढत असतानाही आम्ही मध्यप्रदेश सरकार पाडण्यासाठी “रोम जळत असताना फिडेल वाजवणाऱ्या” बेदरकार सम्राट नीरोसारखे, एकेका काँग्रेस आमदारावर कोट्यावधींची उधळण करत घोडेबाजार करण्यात मश्गुल होतो.

पाश्चात्य देशातले तज्ज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते वैद्यकिय संशोधक, “लाॅकडाऊन, हा पर्याय नव्हे; तर, लवकरात लवकर करोना-संसर्गाचं निदान होणे, हे, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक अतिशय महत्त्वाचं आहे”, असं तडफडून सांगत असताना… आपल्याकडची सध्याची स्फोटक परिस्थिती ही आहे की, कोरोना संसर्गाचा आकडा शेकड्यानी दररोज वाढत चाललाय… ना कोरोना टेस्ट-किटचा पत्ता, ना मास्क उपलब्ध, ना सॅनेटायझर्स!

आता कोरोनाशी जी लढाई चालू आहे ती, कुठल्याही पुरेशा वैद्यकीय तयारीविनाच घंटानाद, थाळीनाद आणि टाळीनाद… या भुक्कड ‘नादब्रह्मा’वर आधारित दैवाधिन अशी चालू आहे. उद्या ती देशात गोमूत्र आणि गाईचं शेण यांच्या आधारावर नाही लढली गेली म्हणजे मिळवलं!

जर, देशातले तथाकथित मोठे नेते, सेलिब्रिटी अभिजन मूर्खासारखे (किंवा, नरेंद्र मोदींची मेहेरनजर आपल्याकडे वळावी म्हणून अप्पलपोट्या स्वार्थापोटी) ताटवाट्या, टाळ्या आणि थाळ्या वाजवीत असतील तर, या अजाण जनतेला कसा दोष द्यायचा? गेल्या रविवारी (२२ मार्च-२०२०) कर्फ्यूच्या दिवशी रस्त्यावर उतरुन घंटानाद, थाळीनाद करणाऱ्या जनसामान्यांना बहुतेक सर्व दूरदर्शन वाहिन्यांवरुन मूर्ख किंवा उन्मादी म्हणून हिणवलं जात होतं…. पण, लक्षात ठेवा की, याच मूर्ख आणि उन्मादी लोकांनी (मोदीभक्त) एकदा नव्हे, दोनदा नरेंद्र मोदींना निवडून दिलेलं आहे!!!

दुर्दैवाने जर, देशात कोरोनाचा प्रभाव हाताबाहेर जाण्याएवढा वाढला; तर, व्हेंटिलेटर्सचं काय तर, साध्यासुध्या आरोग्यसेवासुविधाही मिळणार नाहीत… त्यावेळी, हेच थाळी वाजविणारे शिव्यांची लाखोली वाहतील की, लाखो मरणाऱ्यांच्या ‘पालख्या’ वहातील???

….खेळ तर अजून सुरुसुद्धा झालेला नाही… नांदीच्या ट्रेलरचा पडदाही अजून दूर व्हायचा आहे… “पुरा पिक्चर तो, अभी बाकी है, भाई!”

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)