एका बातमीनुसार, भारताच्या अर्थमंत्र्यांकडे एवढाही पैसा नाही की, त्या लोकसभा-निवडणूक लढवू शकतील आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा-निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय.
यासंदर्भात, काही प्रश्न संभवतात, त्यांची चर्चा व्हायला हवी…. .
१) निर्मला सीतारमण यांच्या पूर्वसुरींनी (म्हणजेच, दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी) बेकायदेशीरपणे, गैरसंविधानिक पद्धतीने जो ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ घोटाळा केलाय; त्या घोटाळ्यातील पैसा, आजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या निवडणूक-खर्चासाठी पोहोचण्याचा मार्ग रोखणारा किंवा रोखणारे ‘शुक्राचार्यांचे झारीतील डोळे’ कुणाचे आणि ते फोडून आपला कार्यभाग साधण्याकामी, आमच्या अर्थमंत्री बाईसाहेब, तेवढ्या ‘सक्षम’ नाहीत का? …की, तो मोठा पैसा, विरोधी-पक्षांचे आमदार-खासदार फोडून त्यांची राज्य-सरकारे पाडण्याकामीच संपून गेलाय??
२) आमच्या ‘महिला’ अर्थमंत्री बाईसाहेबच जर, एवढ्या ‘दीनदुबळ्या’ असतील; तर, पं. नरेंद्र मोदी कुठल्या ‘नारीशक्ति’च्या सक्षमीकरणाविषयी सदैव बाता मारत असतात? …की, यांच्या बेगडी व पुरुषसत्ताक-पुरुषप्रधान ‘संघीय-मानसिकते’त, महिलांना कायमच ‘दुय्यम-स्थान’ रहाणार आहे (आठवा, तुलसीदासांचं रामचरित मानस-सुंदरकांड चौपाई, “ढोल गंवार सूद्र पसू नारी। सकल ताड़ना के अधिकारी”॥)??
३) केंद्रीय गृहमंत्र्यांच्या एका बेजबाबदार व जाणिवपूर्वक दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यानुसार, “इलेक्टोरल-बाॅण्ड घोटाळ्यातील पैसा, भाजपा-खासदारांच्या संख्येने विभागून ‘सरासरी’ काढली जायला हवी; म्हणजे, भाजपाला कितपत पैसा जास्त मिळाला, ते कळू शकेल”…याचा अर्थ, उद्या देशातल्या बँका बुडवून परदेशात पळून गेलेल्या ‘सगळ्या मोदीं’नी किंवा किंगफिशरवाल्या विजय मल्ल्याने देशाच्या बुडवलेल्या पैशाला सुद्धा, त्यांच्याकडील कामगार-कर्मचार्यांच्या संख्येने भागून व तशी सरासरी काढूनच, प्रत्येकाच्या गुन्ह्याचं गांभीर्य ठरवायचं का? अशा बेफजूल सरासरी आपण काढायला लागलो; तर, “एखाद्या तलावाची सरासरी खोली पाचच फूट आहे, बिनधास्त उतरा”, असं ‘अमित शहा’ किंवा ‘हरीश साळवे’ टाईप डँबिस-बुद्धीने, सांगणाऱ्यावर विसंबून तलावात बिनधास्त उतरणार्या व सातआठ फूट खोलीच्या ठिकाणी बुडून मरणाऱ्या… एखाद्या बावळटासारखी अवस्था, ‘अमित शहा-कथना’वर विसंबणार्या भारतीय जनतेची व्हायची!
…शिवाय, EVM-चलाखीसोबतच, “या इलेक्टोरल-बाॅण्ड घोटाळ्याच्या ‘दोन नंबरी’ पैशातूनच मोदी-शहा, २०१९ ची लोकसभा-निवडणूक आधी जिंकलेत आणि नंतरच, त्या बेकायदेशीर व्यवहारातूनच खासदारांची संख्या वाढलीय”, या मूळ मुद्द्यालाच अमित शहा बगल देण्याची मखलाशी करतायत!
४) शक्ति, दोन प्रकारच्या असतात…एक ‘दैवीशक्ति’ व दुसरी ‘आसुरीशक्ति’! काँग्रेस नेते व पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार राहुल गांधी, ‘आसुरी-शक्ति’विषयी बोलत असताना जाणिवपूर्वक ‘ध’ चा ‘मा’ करण्याची… पंतप्रधानपदाला अत्यंत अशोभनीय अशी, हिणकस दर्जाची ‘कोटी किंवा चलाखी’ करुन, राहुल गांधींवर नाहक हल्लाबोल करणारे व ‘नारीशक्ति’विषयक, भंपकबाज भाषणं करणारे आपले भपकेबाज पंतप्रधान, आता आपल्याच मंत्रिमंडळातील अर्थमंत्र्यांच्या कथित दुबळेपणाविषयी काय बोलणार आहेत? …की, महिला-पहेलवानांवरील, बिल्कीस बानोवरील किंवा मणिपूर-महिलांवरील भीषण अत्याचारांबाबत जसे, मिठाची गुळणी घेऊन सोयिस्कररित्या चूप बसले होते; तसेच ते याहीवेळी चूप बसणार आहेत काय??
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)