३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता

काश्मीरचं ३७० कलम काढलं म्हणून (३७० जागांचा बीजेपीचा अवास्तव दावादेखील, त्यातूनच आलेला) भारतभरात प्रचाराची एकच राळ उडवून देणारे ‘बीजेपी’चे नेते आणि बीजेपीच्या ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’चे व अंबानी-अदानीसारख्या मोदी-मित्रांचे ‘खोके’ पोहोचलेले ‘बीजेपी’चे नवनवे मित्र-नेते; भारतीय जनतेची या ३७० कलम प्रकरणी, कशी तद्दन दिशाभूल करतायत, ते जरा थोडक्यात पाहूया….


* मुळात, काश्मीरच्या ३७० कलमामुळे भारत एकसंध असण्यात मोठी अडचण होती व तो भारतीय-सार्वभौमत्वाला मोठा धोका होता, हे जे भाजप-संघाकडून आणि त्यांच्या, ‘सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलणाऱ्या’ मित्रपरिवार-नेत्यांकडून भासवलं जातंय… ते किती धादांत असत्य आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून सूर्यप्रकाशासारखं केव्हाचंच स्पष्ट झालंय!

सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरचं ३७० कलम, हे भारताच्या सार्वभौमत्वाचा बिलकूल भंग करणारं वगैरे नसून; ते केवळ, ‘ॲसिमेट्रीक-फेडरॅलिझम’चं (Asymmetrical Federalism) म्हणजेच, सममिती नसलेल्या किंवा ‘असममित-संघराज्यप्रणाली’ असल्याचं द्योतक आहे, असं नमूद केलंय…म्हणजे, इथेच सगळा, यांच्या बोगस-बनावट ‘राष्ट्रवादा’चा फुगा, सर्वोच्च न्यायालयाची टाचणी लागल्याने फुस्स् होऊन जातो!

…विशेष बाब म्हणजे, ३ ऑगस्ट-२०१५ रोजी मोदी-सरकारनेच, नागालॅंडच्या ‘नॅशनल सोशालिस्टीक काॅन्सिल ऑफ इंडिया’शी (National Socialist Council of Nagaland…NSCN) गुप्तपणे करार (Framework Agreement) करुन ‘सार्वभौमत्वात दोघांचीही भागिदारी’ (“Shared Sovereignty”) हे तत्त्व स्विकारलंय, ज्यानुसार नागालॅंडला भारतीय-संघराज्यात खास असा ‘विशेष-दर्जा’ (जो काश्मीरलाही ऐतिहासिक दृष्टीकोनातून ३७० कलमाद्वारे लाभला होता) मोदी-शहा सरकारकडून दिला गेलाय…हे कितीजणांना माहित्येय?

परिस्थितीवशात आसाम, नागालॅंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालया, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, उत्तराखंड आणि तेलंगणा…या सर्वच राज्यांना, भारतीय-संघराज्य संरचनेत, विशिष्ट प्रमाणात ‘विशेष राज्याचा दर्जा’ देण्यात आलेला आहे.

* काश्मीरचं ३७० कलम काढल्याची, एकमेव जमेची बाजू (बाकी, १० वर्षात सगळा नन्नाचाच पाढा) जोरकसपणे भारतभर लोकसभा-निवडणुकीत प्रचारासाठी लावून धरणारी ‘बीजेपी’… काश्मीर खोर्‍यातील तीनही लोकसभा-निवडणुकीच्या मैदानातून (ज्या लोकसभेच्या जागा, ३७० कलम असतानाही, त्यांनी २०१९साली लढवल्या होत्या व सर्वच ठिकाणी दणदणीत पराभूत झाले होते) पार्श्वभागाला पाय लावून पळ का काढत आहे?

कुठे गेला यांचा तो भंपक राष्ट्रवाद आणि ३७० कलम हटवल्यानंतर कथितरित्या काश्मिरी-जनतेचा संपादन केलेला विश्वास??

…याविषयी, हे सगळेच; शिवाय, यांचा ‘कुप्रसिद्ध’ अमित मालवीय फेम आयटी-सेल व मेंदूविक्या ‘गोदी-मिडीया’, तोंडात मूग गिळून गप्प का??

** ३७० कलम हटवण्यापश्चात, काश्मीरमधून दहशतवाद (तिथे, सर्रास भाजप-नेत्यांच्या आजही हत्या होतायत व कालचं पूँछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला होऊन हवाईदलाचा एक जवान शहीद; तर, चार गंभीर जखमी झालेत) आणि घराणेशाहीतला तथाकथित भ्रष्टाचार संपणार होता…ते सारं संपलं का? काश्मीरच्या ‘दल-लेक’मध्ये, मोदींच्या म्हणण्यानुसार, खरंच भाजपचं ‘कमळ’ फुललं का??

** काश्मीरचं ३७० कलम हटवण्यामागचा मुख्य हेतू, तेथे अंबानी-अदानीसारख्या मोदींच्या ‘गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गा’ला… जमिनी-शेतजमिनी, फ्लॅट्स, रेसाॅर्ट्स-हाॅटेल्स-दुकानांसारखी स्थावर-मालमत्ता खरेदी करणं शक्य व्हावं व जसं, महाराष्ट्राचं ‘मराठीपण’, गुजराथी-भांडवल’शहां’च्या भयंकर दबावाखाली पूर्णतया धोक्यात आणलं गेलंय; तद्वतच, तेथे गुजराथी-भाषिक धनदांडग्यांचं वर्चस्व निर्माण व्हावं, म्हणून काश्मीरची ‘काश्मिरियत’ संपवणं…हाच, नव्हे काय?

** एका बाजुला ‘गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गा’ची पैशाचिक-पाशवी ताकद आणि दुसर्‍या बाजुला उत्तर भारतीयांचं राक्षसी संख्याबळ… यांच्या कात्रीत सापडून मराठी-माणसांच्या हातातून, त्यांच्याच हक्काच्या महाराष्ट्राची लालकाळी माती, ओंजळीतल्या पाण्यासारखी निसटून जात असताना आणि मराठी-मुलूखातला मराठी-माणूस, देशोधडीला लागत असताना; ‘गुजराथी व उत्तर भारतीय’, अशा कात्रीच्या दोन पात्यांतून महाराष्ट्रातला ‘मराठी-माणूस’ आणि ‘मराठी-भाषा’ सुखरुप बाहेर पडावी, असं वाटत नाही कुणाला?

…म्हणूनच, “संयुक्त-महाराष्ट्रानंतर ‘स्वायत्त-महाराष्ट्र’… राष्ट्रांतर्गत राष्ट्र, स्वायत्त-महाराष्ट्र”, अशी बुलंद घोषणा देत, महाराष्ट्रात ३७० कलम लागू करण्याची मागणी करायची की, काश्मीरचं ३७० कलम हटवल्याचा अज्ञानमूलक विकृत आनंद साजरा करायचा?

           || जय महाराष्ट्र, जय हिंद ||

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)