फडणवीस-वडेट्टीवार विवादानंतर….

देवेंद्रजी,
अहो, अजून किती आणि कुठली खालची पातळी गाठणार आहात तुम्ही? तुम्ही खरोखरीच ‘हिंदू’ आहात की, ‘हूण’ ??
“दहशतवाद्यांकडे धर्म तपासण्याएवढा वेळ होता का?” असे उद्गार जर विजय वडेट्टीवार काढत असतील…तर देवेंद्रजी, ते एकप्रकारे तुमच्या केंद्रिय गृहमंत्रालयाच्या सुरक्षेविषयी काहीसे गौरवोद्गारच काढतायत, याचंही आकलन होण्याएवढी धर्मविद्वेषाने तुमच्याकडे मती शिल्लक राहिलेली नाही, असं खेदाने म्हणावसं वाटतं. प्रत्यक्षात, देवेंद्रजी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दहशतवादी तशी तपासणी करत होते, असं खरं धरलं आणि समजा अगदी तसं असलं जरी; तर, त्याचा सरळ अर्थ असा होतो की, तुमचं अमित शहांचं गृहमंत्रालय अगदी सुस्त सुस्त व हजारो पर्यटकांच्या जिविताबद्दल पूर्णतया बेफिकीर असल्यामुळेच दहशतवाद्यांच्या हाती, धर्माच्या चांभार-चौकशा करायला भरपूर वेळ आरामात शिल्लक होता…तेव्हा, “या संतापजनक दुर्दैवी घटनेच्या विस्तवावर आपली भाजपाई मतांची पोळी भाजून घ्यावी”, इतक्या क्षुद्र व नीच विचाराने आपण सारेच भाजप-संघीय लोकं प्रेरित झालेले आहात.
जरा लक्षात घ्या की, ज्यांच्या घरात मृत्युचं तांडव झालं ती गुजराथी पर्यटक मंडळी आणि महाराष्ट्राच्या डोंबिवलीतली मंडळी…आजच्या घडीला काय म्हणतायत ते जरा, आपले ‘नागपुरी’ कान लावून नीट ऐकाच (आपल्या सोयीसाठी खास एका अभागी गुजराथी महिलेच्या आक्रंदनाचा व्हिडीओच सोबत पाठवीत आहे)!

उरीतल्या १९ लष्करी जवानांचे बळी, पुलवामातील ४७ CRPF जवानांचे बळी आणि आता, पहलगाममधील २७ पर्यटकांचे बळी…मतांची झोळी भरण्यासाठी, हा कुठला ‘नरमेध यज्ञ’ आपण सार्‍यांनी आरंभलायत, देवेंद्रजी, त्याच प्रथम उत्तर द्या आणि मगच जनतेचं लक्ष, आपल्या ‘नाकामी व नीचते’वरुन इतरत्र वळवण्यासाठी, वडेट्टीवारांसारखी गिर्‍हाईकं शोधा…!!!
काँग्रेसचे वडेट्टीवार देश एकसंध राखण्यासाठी आटापिटा करतायत आणि आपण…???

ज्या काश्मिरींनी स्वकष्टाने पाठीवरुन, घोड्यावरुन उपचारासाठी जखमींना अडचणीच्या मार्गावरुन लांब अंतरावर उचलून नेलं, ज्या सय्यद आदिल हुसेन शाह’ने ‘अतिथी देवो भव’ या उत्तुंग भारतीय-आध्यात्मिक परंपरेला स्मरुन आपलं बलिदान दिलं…त्यांच्याविषयी, आपण आपले किती शब्द खर्ची घातलेत हो, देवेंद्रजी? वडेट्टीवारांवर दुगाण्या झाडायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे; पण, सय्यदसाठी आपल्याकडे वेळ कुठून असणार, नाही का?

…जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा देवेंद्रजी, पर्यटकांच्या हत्येमुळे सगळा देश शोकसागरात बुडालेला असला; तरी, त्या दुर्दैवी जीवांमधील कुणीही ‘शहीद’ वा ‘हुतात्मा’ म्हणून गणला जाऊ शकत नाही…जर, या दुःखद घटनेत ‘शहीद-हुतात्मा’ होण्यास कोण पात्र असेल; तर, तो एकमेव सय्यद आदिल हुसेन शाहच, ज्याच्याकडे तुम्ही लोक जाणिवपूर्वक अक्षम्य स्वरुपाचं दुर्लक्ष करताय आणि महन्मंगल ‘हिंदुत्वा’ला काळीमा फासताय!
….कुठे तो हुतात्मा ‘सय्यद आदिल हुसेन शाह’ आणि कुठे ते सदैव ‘इलेक्शन-मोड’वर असणारे बेपर्वा ‘अमित शाह’…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)