गुन्हेगारी, हा ठाण्यातील राजकारणाचा अत्यावश्यक व अविभाज्य भाग बनण्याच्या, घृणास्पद घटनाक्रमालाही पाचसहा दशके उलटून गेलीत…”नाटेकर ते पूर्णेकर व्हाया, जमील शेख”, असा तो रक्तरंजित-निर्घृण प्रवास आहे!
आपल्या मराठी लोकांची पण कमाल आहे; आपण देवाला पण ‘राजा’ म्हणतो (उदा. लालबागचा किंवा गणेशगल्लीचा ‘राजा’) आणि उठसूठ राडा करणाऱ्या नामचीन गुंडांना पण म्हणतो ‘राजा’!
…केवळ अनियंत्रित ‘भाईगिरी’मुळेच नव्हे; तर, अनेक अनर्थांमुळे “Thane is a Dying City”…काँक्रिटच्या उंचच उंच गगनचुंबी ठोकळ्यांमध्ये आणि रस्त्यावरच्या वहातूक-कोंडीमध्ये, श्वास गुदरमरलेलं असं; जर, भारतातलं कुठलं एकमेव शहर असेल; तर, ते आहे ‘ठाणे’ शहर… एक सुन्न झालेलं, जीव मुठीत धरुन जगणारं शहर, म्हणजे ठाणे-शहर; ज्याच्या, रंध्रारंध्रांतून घाण, पू, सडलेलं रक्त बाहेर पडत असतं.
…तरीही, ठाण्यातले बडे बडे गुंडपुंड राजकारणी व महापालिकेतले अधिकारी, रोज उठून ६०-६५ मजली नव्या बांधकामांच्या योजना आखतातच आहेत आणि त्यातून अतिप्रचंड पैसा ओरपतातच आहेत. त्यात, आता मोठी भर पडलीय ती, SRA आणि क्लस्टर-विकासाची. जोडीला ३०-३५ वर्षातच जीर्ण होत चाललेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा आयता ‘लोण्याचा गोळा’, गुंडपुंड राजकारण्यांना सतत खुणावत असतोच.
‘काँक्रिटच्या विकासा’च्या नावाखाली हिरव्याकंच ठाण्याची, सगळी हिरवाई नष्ट झाली…’तलावांचं शहर’, असं अभिमानाने मिरवणाऱ्या ठाणे-शहरातले बहुतेक तलाव नाहिसे झाले वा आक्रसले, विहीरी बुजल्या, खाड्या कायमस्वरुपी प्रदूषित झाल्या…रस्ते-वहातुकीची दुर्दशा, अस्वच्छतेचं आगर, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य व टँकर-लाॅबीकडून सततचा लुटीचा जाच…एक ना अनेक, ‘अनर्थ’ घडत गेले आणि आजचा ‘विकास’, हा भविष्यातला ‘विनाश’ आहे…याचं साद्यंत उदाहरण म्हणून, ‘ठाणे-शहर’ सामोरं येऊ लागलं.
५०-६० वर्षांपूर्वी “सारस्वतांचं असलेलं हे ‘सुसंस्कृत’ शहर…पहाता पहाता ‘विकासा’च्या नावाखाली भाई, मर्मवीर, धर्मवीर, कर्मवीर, दादा, अण्णा, साहेब वगैरे वगैरे गुंड टोळ्या पोसून दादागिरी करणाऱ्या असंख्य स्थानिक-राजकारण्यांच्या कृपाशिर्वादाने रासवटांचं शहर बनलं” (मध्यंतरी, ठाण्यातील नामचीन गुन्हेगारांसोबत, तत्कालीन मुख्यमंत्री-पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांचे लागलेले मोठमोठे बॅनर्स, ‘धर्मराज्य पक्षा’ने आवाज उठवल्यानंतरच पटापट उतरवण्यात आले होते)…आणि, शहरात हातपाय पसरुन बसलेल्या गुन्हेगारांमुळे शहराच्या मूळ निवासींना…’दहशतीचा कहर’ बनत चाललेलं हे ‘ठाणे-शहर’, निमूटपणे पहाण्याखेरीज काही करता येणं, अशक्यप्राय बनत गेलं; कारण, त्यांच्या कराच्या पैशातून त्यांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेली ‘खाकीवर्दी’रुपी कवचकुंडलं, बड्या राजकारण्यांच्या आणि धनदांडग्यांच्या दारी, केव्हाचीच ‘गहाण’ पडली होती…विजू नाटेकर, जमील खान, प्रदीप पूर्णेकर, विक्रांत कर्णिकांसारखे सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले प्राण गहाण टाकत असतानाचे, हे विषण्ण करणारं चित्र आहे!
ठाणे शहराबाहेरुन आलेल्या नवश्रीमंत उच्चशिक्षित नोकरदारवर्गाकडून किंवा व्यावसायिकांकडून बांधकाम-उद्योगातल्या बक्कळ नफ्याचा, आपल्या हातचा मोठा ‘सक्शन पंप’ कार्यप्रवण ठेऊन त्यांचा पैसा खेचणं, खेचत रहाणं…यावर, ठाणे-शहराचं अवघं राजकीय अर्थकारण आधारलेलं आहे. त्यातच, शहरातल्या बिल्डर-राजकारण्यांचं प्रचंड फावलं; ते ठाण्यासारख्या एकाच शहरात गेली काही दशके, अख्खा भारत (विशेषतः गुजराथ, यूपी आणि बिहार) फार वेगाने ओतला जात राहिल्याने! त्यामुळे, कुठल्याही ठाण्यातील नूतन पंचतारांकित बागेत, गगनचुंबी इमारतीत (टाॅवर्स), मोठमोठे चकचकीत माॅलटाॅल्समध्ये गेलं तर, अभावानेच तिथे ‘मराठी शब्द’ कानावर पडतील आणि जे कुणी ‘मायमराठी’ दिसतील, ते एकतर सरकारी-अधिकारी असतील किंवा स्थानिक राजकारणी (मतितार्थ, ‘सूज्ञास सांगणे न लगे’)! साधी मराठमोळी माणसं दृष्टीस पडतील, ती १०’ × १०’ च्या शहराच्या परीघाबाहेरील विविध नगरांच्या कोंडवाड्यांमध्ये.
परिणामतः, शहरात कुणाचा पायपोस कुणाच्यात राहिलेला नाही…एकाच शहरात, वेगवेगळ्या उपग्रहावर रहात असल्यासारखी विभिन्न भाषिक-सांस्कृतिक माणसं, एकमेकाशी ‘मला काय त्याचं’, या संवेदनशून्य भावनेनं फटकून रहातात; त्याचा, या बिल्डर-राजकारण्यांना चांगलाच फायदा होत आलाय…कारण, एखाद्या शहरी दैनंदिन समस्येविरुद्ध (मग, ती गुन्हेगारीची असो वा नागरीसुविधांबाबतची असो) स्थानिक जनतेकडून, एकत्रित मोठा व दीर्घकालीन उठाव होणं व संबंधित राजकारण्यांविरुद्ध निवडणुकीत प्रतिकूल मतदान होणं, जवळपास अशक्यप्राय बनलं.
नाशिक, वर्धा, डोंबिवली, साताऱ्यापासून महाराष्ट्राच्याच नव्हे; तर, संपूर्ण भारताच्या कानाकोपर्यातून आलेल्या खुनशी वृत्तीच्या राजकारण्यांनी शहराचा पूर्ण ताबा घेतला…’बांधकाम-उद्योग’ आणि त्यातून साधकबाधक मार्गाने होणारी कल्पनातीत मोठी कमाई, सगळ्याच राजकारण्यांची व महापालिका अधिकाऱ्यांची, एक हुकमी ‘लाईफलाईन’ बनून गेली…आणि, त्यातूनच, स्खलनशील वृत्तीच्या ठाणे-पोलिसदलावरील, या अभद्र सोनेरी-टोळीची (गोल्डन-सिंडीकेट) अवांछनीय हुकूमत बेफाम वाढत गेली.
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

