“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.२)
——————————
“निवडणुकीपुरत्या ‘लाडक्या बहिणी’ असणाऱ्यांपैकी..अशा न थांबणाऱ्या खूनसत्रातून अजून किती बहिणी ‘विधवा’ होऊ द्यायच्या…???”
…मुंबई-नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात आजवर वन-डे क्रिकेटसारखी राजकीय खुनांनी, किती शतकं झळकवलीयत ते, पोलिस-दफ्तरीची नोंदच सांगेल. लक्षणीय बाब म्हणजे, पोलिसांनी जिथून “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे आपलं ब्रीदवाक्य घेतलंय, त्या श्रीमद्भागवतावर किंवा त्या ब्रीदवाक्याशी साधर्म्य सांगणारं “परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्” हे श्रीकृष्णाचं मौलिक-अमोघ उच्चारण असणाऱ्या ‘श्रीमद्भगवद्गीते’वर हात ठेऊन सांगावं की, “त्यातले, किती खुनी गुन्हेगार, आतापर्यंत फासावर गेलेत किंवा आजन्म तुरुंगात सडलेत…असे शेकडो खून पडल्यानंतरही?”
…हेच ते, बड्या राजकीय धेंडांचे (Master Minds), आपापले राजकीय वा आर्थिक लागेबांधे सुरक्षित राखण्याकामीचं व आपली राजकीय-गुन्हेगारी दहशत कायम राखण्याकामीचं, पडद्यामागचं षडयंत्री ‘व्यवस्थापन’… ज्यातून, अशा खुनांची मालिका अखंडीत चालू रहात आलीय.
व्यक्तिगत आलतूफालतू कामं झटपट करणाऱ्या आणि ‘बिनमहत्त्वा’चे झगमगते सार्वजनिक खेळमहोत्सव, सत्यनारायण-गणेशोत्सव-दहीहंड्या-गरबे-दिवाळीमहोत्सव-भंडारे (ज्यातून, अनेक राजकीय-कार्यकर्त्यांचा प्रपंच व राजकारण चालत आलंय) वगैरे करणाऱ्या राजकारण्यांच्या ‘पलटणी’ तयार करण्याचा ‘पॅटर्न’, खऱ्याअर्थाने ठाण्यातच प्रथम रंगला आणि मग, तो पुढे अवघा महाराष्ट्र नासवत, महाराष्ट्रभरात पुढे सरकला!
शहरातल्या मूळ ‘मायमराठी’ स्थानिकांच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी किती आस्था आजवर दाखवली गेली? या शहरातली वाहतूक-व्यवस्था, कायदासुव्यस्था, सार्वजनिक आरोग्यसेवा, शिक्षणसेवा इ. केव्हाचीच कोलमडलेली आहे…आणि, खासगीकरणातून महागडी होत गेलेली इस्पितळे व महागड्या इंग्रजी शाळांमुळे…सर्वसामान्य मराठी-माणसांची शहरात प्रचंड लूट व कोंडी सुरु आहे. मराठी-शाळांच्या ‘ठरवून केल्या गेलेल्या’ दीर्घकाळच्या दुरवस्थेमुळे पालकांच्या खिशाला सहजी परवडणारं व अंति हितकारक असणारं असं, मातृभाषेतून आपल्या मुलांना शिक्षण देणं, दुरापास्त बनलं. बरं, निव्वळ कसत्या जमिनी विकून, आलेल्या औटघटकेच्या श्रीमंतीने, एखादा स्थानिक समाज पुढारतो, पुढे जातो…असा कुणाचा गैरसमज आहे की, काय? जगात अनेक ठिकाणी शहरं विकसित होताना, ती मूळ स्थानिकांच्या ‘कायमस्वरुपी’ सर्वंकष-विकासासाठी, विकास पावणाऱ्या शहरांच्या एकूण आर्थिक-उलाढालीतून ‘विशिष्ट टक्केवारी’चं (अगदी एखाद टक्का ती असली, तरी खूप झाली) अत्यंत पारदर्शक, कार्यक्षम व भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने ‘व्यवस्थापन’ करती झालीत…त्यातूनच, स्थानिकांच्या भविष्यातल्या पिढ्यापिढ्यांचा खरा सांस्कृतिक-आर्थिक व शैक्षणिक विकास होऊ शकतो. ठाणे शहराचे प्रामुख्याने मूळ मालक असलेल्या आगरी-कोळी भूमिपुत्रांचा असा विकास करण्याचा प्रयत्न तर, सोडाच; त्याचा साधा विचार तरी, कधि झाल्याचा कुठला दाखला आहे आपल्याकडे? मात्र, दुसरीकडे आमच्या स्थानिक आणि ‘ठाण्याबाहेरुन’ आलेल्या नेतेमंडळींचा अचंबित करणारा ‘आर्थिक-विकास’ होत गेला; आणि, पाहता पाहता ते शेकडो-हजारो कोटीत खेळायला लागले… ज्या मोठ्या पैशावर खरा हक्क, सर्वसामान्य स्थानिकांचा असायला हवा होता.
…लक्षात घ्या, हा अधम स्वार्थयुक्त ‘कार्यभाग’ साधण्यासाठीच… राजकारण्यांच्या अशा झटपट व अचाट राजकीय-आर्थिक विकासाला नडणार्यांच्या, व्यवस्थित ‘ठरवून’ लालरक्ताच्या ‘होळ्या’ प्रसंगोपात्त पेटवल्या जात आल्यात, पेटवल्या जात रहातील!
...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) _(क्रमशः)

