“राजकीय हत्या आणि पैसा”, या जुगलबंदीतून ‘सत्ता एके सत्ता’…असा ‘राजकीय सट्टा’ लावणाऱ्या ‘सत्ताबाजां’नी आरंभलेला “विकास नावाचा विनाश”! _(धर्मराज्य-लेख मालिकेतील लेख क्र.३)

…आपल्या हयातीत, आपल्या डोळ्यादेखत; जर, हे भाजप-संघीय राजकीय धर्ममार्तंड…आत्यंतिक प्रेमळ व मूर्तिमंत वात्सल्य असणाऱ्या ‘समतावादी’ रामाला; सदैव युद्धसन्मुख, विद्वेषमती व क्रुद्ध ‘श्रीरामा’च्या एकाकी-एकसाची रुपात बदलू शकतात; तर, यांच्या पूर्वसुरींनी रामायणाच्या कथेत, आपल्या सोयीसाठी काय आणि किती बदल केले असतील, याची कल्पनाच करवत नाही. रामायणाचं उत्तरकांड, त्याचाच एक नमुना; ज्याच्या रचनेचा पोतच मुळात, मूळ रामायणाच्या संहितेशी बराच फटकून वागणारा.
…आणि म्हणूनच, अनेक प्रक्षिप्त-अशुद्ध ओव्या घुसडू पहाणार्‍या पाखंडी धर्ममार्तंडांपासून संत ज्ञानेश्वरांचा ‘ज्ञानेश्वरी’सारखा महान ग्रंथ-ठेवा सुरक्षित ठेवता यावा; यासाठी, संत एकनाथांनी पैठण येथे गोदावरी तिरी, संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर सुमारे ३०० वर्षांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करताना, ज्ञानेश्वरीच्या अखेरीस लिहून ठेवलं होतं की, “ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओंवी करील मऱ्हाठी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ॥”
संत तुकारामांच्या गाथेतही काही ‘प्रक्षिप्त’ अभंग, अशाच मर्कट वृत्तीच्या धर्ममार्तंडांकरवी जोडले गेल्याचं अभ्यासक मानतात…महाभारतही यांच्या तावडीतून सुटू शकलेलं नाही.

आपल्या स्खलनशीलतेला, अनायासे समाजाच्या माथी मारता यावं व तेवढ्याप्रमाणात उर्वरित समाज, आपल्या पूर्ण नियंत्रणात रहावा; याची या वर्णवर्चस्ववाद्यांनी घेतलेली ही दक्षता होती…हीच ती, धर्मसत्तेच्या नावावर चालणारी ‘अधर्मसत्ता’!
“राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी”, असं बरळणारे एकनाथराव, त्या ‘अधर्मसत्ते’चाच उदोउदो, अज्ञानापोटी किंवा आपद्धर्म म्हणून करताना आपल्याला दिसतात…आणि तो ही, रामाच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिकच्या तपोवनात!

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात एकनाथरावांचं जन्मगाव दरे येतं…तेथील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात गोल्फ क्लब (गोल्फ कोर्स), मेटतळे गाव व मौजे नाकींदा वगैरे ठिकाणी झालेल्या अनधिकृत वृक्षतोडीची व उत्खननाची काही प्रमुख प्रकरणे समोर आलेली असतानाच; पाटण तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगांच्या आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या (Sahyadri Tiger Reserve) संवेदनशील परिसरात झालेली अवैध वृक्षतोड हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषय बनलाय…वृक्षतोडीसोबतच उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाटण तालुक्यात (उदा. मारुल हवेली, विहे, उरुल भाग वगैरे अनेक ठिकाणी) डोंगर पेटवून देण्याच्या घटना वाढल्या आहेत, ज्यामुळे मौल्यवान वनसंपदा, पक्षीप्राण्यांचा निवारा व खाद्य जळून खाक होत आहे; पण, त्यावर उपमुख्यमंत्र्यांची सोयिस्कर अळीमिळी गुपचिळी चालूच आहे.
…या सगळ्याच निव्वळ ‘देहबुद्धी’ बाळगणाऱ्या, बहकलेल्या उन्मादी राजकारण्यांना कानीकपाळी कोणी ओरडून सांगूनही काडीमात्र उपयोग नाही; कारण कानातून त्यांच्या मेंदूत काही शिरणं, एकूण कठीणच! आणि, दुर्दैवाने “आपण किती पापाच्या राशी उभ्या करताय; तेवढ्यांचं वजन झेपण्याएवढे तुमचे खांदे मजबूत आहेत का”, यासारखे संबंधित राजकारण्यांना व प्रशासकांना प्रज्ञावंत-जाज्वल्य सवाल करणारे व रोखठोक सल्ले देणारे…खरेखुरे संत-महंत आता, आहेतच कुठे मुळी शिल्लक? नाशिक-वाराणसीच्या कुंभमेळ्यात काय किंवा अयोध्येच्या राममंदिरात जमतात ते बहुतांश सगळेच, गल्लाभरु व धंदेवाईक संत, महंत, पुजारी!
तेव्हा, दलाल-स्ट्रीटवरच्या सट्टेबाजांच्याच योग्यतेच्या, स्वार्थाने आंधळे झालेल्या या धृतराष्ट्रासारख्या सत्ताबाजांना… आपण हे गर्जून सांगायला हवं की, हिरवाई मोठ्याप्रमाणावर नष्ट करुन, डोंगर-पर्वत उघडेबोडके करुन, नद्यानाले-हवा प्रदूषित करुन…मोजक्या पिढ्यांना व त्यातील मोजक्या अतिश्रीमंतांना ऐश्वर्य व ऊर्जा मनसोक्त उपभोगायचं स्वातंत्र्य देणं आणि भविष्यातल्या पिढ्यांचा श्वास कोंडून त्यांची राखरांगोळी करु पहाणं; म्हणजे, औटघटकेचा ‘विकास’, पण अंति ‘विनाश’ होय!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)