‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल

छत्तीसगडच्या आपल्या निवडणूक-जाहीरनाम्यात, ज्या भाजपाने ‘हसदेव’च्या जंगलातल्या कोळसा-खाणकामाला, तेथील जनतेशी केलेली गद्दारी व धोका म्हटलं होतं व सत्तेवर येताच, ते खाणकाम थांबवण्याचा ‘वादा’ (खरं म्हणजे, ‘चुनावी-जुमला’) केला होता…त्याच, ‘हसदेव’च्या जंगलातल्या, ३०,००० प्राचीन वृक्षांवर, भाजप छत्तीसगडमध्ये सत्तेवर येताच तत्काळ गदा आली!
स्थानिक गावांमधील सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना व गेली १० वर्षे त्याविरोधात चळवळ करणाऱ्यांना…सलग तीन दिवस बेकायदेशीररित्या डांबून ठेवत, सुमारे ५०० पोलिसांकरवी (दिमतीला, झाडं कापणार्‍या ५०० इलेक्ट्रिक आरा मशिन्स होत्या), ही भारतीय-राज्यघटनेतल्या तरतुदींचं बेधडक उल्लंघन करणारी संतापजनक कारवाई करण्यात आलीय. त्याकामी, क्षणार्धात मोठमोठी तीला होत्या.


ॲमेझाॅनच्या जंगलांएवढं मोठं विस्तीर्ण नसलं; तरीही, शेकडो-हजारो हेक्टरमध्ये (दिल्लीपेक्षाही मोठं, असं १८७६ चौ. कि. मी क्षेत्रफळ) पसरलेलं, हे हसदेव’चं जंगल…ॲमेझाॅनच्या जंगलाप्रमाणेच निसर्ग-पर्यावरणाचं संतुलन राखण्याकामी आपलं स्वतःचं महत्त्वं राखून आहे. ‘भांडवली-भस्म्यारोग’ लागलेल्या महापातकी गौतम अदानीला जगातला अव्वल श्रीमंत करण्यासाठी (आणि, अर्थातच त्याच्याकडून हजारो कोटींचा ‘चंदा’ वसूल करण्यासाठी), तेथील खाणकामद्वारे करोडो टन कोळसा व त्या कोळशाच्या बळावर हजारो कोटींचा कोळशासारखा ‘काळा पैसा’ अदानीला मिळवून देण्यासाठी, भाजप-राजवटीत यापुढे चालूच रहाणार्‍या या निर्घृण वृक्षतोडीनंतर, त्या जंगलाचं हे महत्त्वपूर्ण निसर्ग-पर्यावरणीय वैशिष्ट्य लवकरच नष्ट होईल. करोडो टन कोळसा, खाणीतून उपसून हवेत जाळला जाईल आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ला त्यातून प्रलयंकारी चालना मिळेल…आणि तो, उर्वरित सजीवसृष्टीसह मनुष्यजात नष्ट होण्याचा एक धोकादायक संकेत असेल!

राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजप सरकारं असताना, इथलं सरकारी खाणकाम, अदानी-एंटरप्रायझेसला अपारदर्शक पद्धतीने अचानक कसं दिलं गेलं, ही एक महाभ्रष्टाचाराची चित्तरकथा म्हणून उजेडात येऊ शकेल (अर्थातच, २०२४च्या निवडणुकीत मोदी-शाह सरकारचा पाडाव झाला तरच)..असा ठाम दावा, ‘द वायर’तर्फे करण्यात आलाय. लक्षात घ्या, याच कोळसा-खाणकामाच्या कथित घोटाळ्याबाबत २०१४ साली भाजपाने, ‘कॅग’च्या विनोद रायना हाताशी धरुन रान उठवलं होतं…जो घोटाळा, कधि झालाच नव्हता, हे पुढे जाऊन सिद्ध झालं; पण तोपर्यंत, त्यातून भाजपाचे नरेंद्र मोदी-सरकार सत्तेवर येऊन, देशाचं अपरिमित नुकसान होऊन गेलं होतं.

म. प्रदेश, झारखंड व छत्तीसगड, या तिन्ही राज्यांच्या सीमांना भिडणारं व भारताच्या नकाशाच्या बरोबर मध्यावर असलेलं, तसेच अनुपम निसर्ग-सौंदर्याने व जैववैविध्याने नटलेलं हे ‘हसदेव जंगल’…भाजपाई-संघीय लोकं, त्या गौतम अदानी नावाच्या ‘भांडवली-बकासुरा’च्या घशात घालून मोकळे होतायत आणि तिकडे “अयोध्येत मारे, ‘राममंदिरा’चे बेगडी हिंदुत्ववादी वारे वहातायत”!
वस्तुतः, हिंदू, बौद्ध, जैन धर्म हे, निसर्ग-पर्यावरणाप्रति अत्यंत संवेदनशील! हिंदू धर्म, तर चराचर सृष्टीमध्ये, सर्व प्राणिमात्रांमध्ये परमात्म्याचा अंश पहाणारा धर्म! अशातऱ्हेच्या, आधुनिक मनुष्यजातिच्या या वासना-विकारांनी भरलेल्या चंगळवादी…विनाशकारी व जीवनविरोधी विकासाची, हिंदुधर्मातल्या एकातरी ग्रंथामधून, यत्किंचितही पुष्टी केलेली कुठे दिसत्येय का, ते डोळे उघडून एकदा नीट तपासून पहाच.
संपूर्ण ‘भारतीय-अध्यात्म’च मुळी (हिंदू, बौद्ध, शीख, जैन व अन्य भरतभूमीवर नांदणार्‍या आध्यात्मिक प्रवाह-उपप्रवाहांनी मिळून बनलेलं), या ‘जैविक-साखळी’ला निरतिशय पूजनीय-वंदनीय मानूनच, त्या भरभक्कम पायावर उभं राहीलेलं आहे…असं असतानाही अंदमान-निकोबारमधील ग्रेट-निकोबारमधील अतिप्राचीन असे ८ ते १० लाख महाकाय वृक्ष जसे तुटतायत, कापले जातायत आणि मुंबईतल्या आरे जंगलाची मेट्रोकारशेडसाठी रातोरात गवताची छाटणी करावी, तशी सहजगत्या कापणी केली गेली…तसेच, आता ‘हसदेव’च्या प्राचीन व दुर्मिळ घनदाट जंगलावर, तथाकथित ‘हिंदू-राष्ट्र’ व ‘हिंदुत्वाच्या भाकड बाजारगप्पा मारणाऱ्या, भाजप व संघाकरवी गंडांतर आलंय!
त्या हसत्या-खेळत्या ‘हसदेव’ जंगल-परिसराला शोकमग्न करुन ‘अरुण्यरुदन’ करायला भाग पाडणारे…संघीय आणि.भाजपाई लोकं, तरीही कुणाला अजूनही ‘हिंदुत्ववादी’ वाटू शकतात???
तसं असेल तर, अशा साऱ्याच धर्मविरोधी लोकांच्या अकलेची कीव करावी, तेवढी थोडीच…त्यांच्या मेंदुवरच्या ‘करड्या रंगाच्या घड्या’ (Grey Matter) ‘अंधभक्ति’ने साफ मिटून तर गेल्या नाहीत ना; याची जरुर तपासणी व्हावी…हो, कारण, “भक्त प्रल्हाद, या महान विष्णुभक्त असलेल्या, आपल्याच पुत्राचा अतोनात छळ करणाऱ्या भयंकर क्रूर व महाराक्षसीवृत्तीच्या “हिरण्यकश्यपु’लाच, ‘विष्णुचा अवतार’ मानण्याचा…नवा उफराटा जमाना आलाय”!
घनघोर कलियुग, अजून वेगळं काय असू शकेल???

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First Green-Political Party Of India)