एका बाजुला ‘भारतरत्न’ पुरस्काराची ‘खिरापत’ वाटणार्या…आणि, दुसर्या बाजुला शेतकरी-शेतमजूर, कामगार, उच्चपदस्थ अधिकारीवर्गाकडून ‘खच्चीकरण’ करण्यात आलेला पोलीसदलातील हवालदार-शिपाईवर्ग, लष्करात भरती होऊ पहाणारी नवतरुणाई (तथाकथित, अग्निपथावरील अग्निवीर), ट्रकचालक-रिक्षावाले, सेवेतून निवृत्त झालेला समस्त कामगार-कर्मचारीवर्ग….अशा, देशातल्या तळागाळातील सर्वच समाज-घटकांवर ‘आफत’ आणणाऱ्या; मोदी-सरकारचं ‘मधुरा स्वामिनाथन’कृत ‘वस्त्रहरण’….
———————————————–
ज्यांनी, १९६०च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ आणली, त्या एम. एस. स्वामिनाथनांची मुलगी मधुरा स्वामिनाथन (स्वामिनाथन-प्रतिष्ठानच्या अध्यक्षा) यांनी, आपल्या पित्याला ‘भारतरत्न’ मिळाल्याच्या भर सत्कार-समारंभातच…सांप्रत, शेतकरी-आंदोलनासंदर्भात घेतलेल्या जाज्वल्य भूमिकेमुळे देशात एकच खळबळ उडालीय. त्यामुळे, निव्वळ आपल्या पित्याला (चरणसिंग) व कर्पुरी ठाकुरांना ‘भारतरत्न’ दिल्याचं निमित्त साधून NDA कळपात शिरलेल्या जयंत चौधरी व ‘पलटीमार’ नितीशकुमारांना आणि श्री श्री रविशंकर (खरं म्हणजे, बसल्या जागी वातानुकूलित हाॅलमध्ये, फुकाची प्रवचनं-निरुपणं झोडणाऱ्या ‘शी: शी: रविशंकरा’ला उन्हातान्हात-पावसापाण्यात शेतात राबायला पाठवला पाहिजे), रामदेवबाबांसारख्या भांडवली-व्यवस्थेच्या पालखीचे भोई असलेल्या भोंदू संतांना चांगलीच चपराक बसलीय!
मात्र, या मधुरा स्वामिनाथन यांनी घेतलेल्या निरतिशय कौतुकास्पद भूमिकेसोबतच, शेतीसंबंधी थोडं चिंतन होणंही गरजेचं आहे. “सोनखत-शेणखत-पालापाचोळा व जनावरांची विष्ठा-मलमुत्रातून निर्मिलेलं गांडूळखत आदी नैसर्गिक संसाधनं-निविष्ठा; तसेच, बैलजोडीच्या नांगराने व मूळ नैसर्गिक-बियाणे वापरुन पारंपारिक सेंद्रिय-शेती करणारा शेतकरी…आर्थिकदृष्ट्या वरकरणी गरीब भासला; तरीही, मनाने श्रीमंत असल्यामुळे आत्महत्या करण्याचा विचारही कधि त्याच्या मनात स्पर्शू शकला नव्हता. मात्र, ‘नाॅर्मन बोरलाॅग’पुरस्कृत रासायनिक-यांत्रिक व आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली बियाणे वापरुन केली जाणाऱ्या शेतीमुळे, यथावकाश देशात एकच हाहाःकार उडून लाखो शेतकर्यांच्या आत्महत्या होऊ लागल्यात!”
कालचा, शरीर व मनाने निरोगी-तंदुरुस्त असलेला शेतीप्रधान-भारत… आणि, बेलगाम यांत्रिकीकरणामुळे, संकरित/GM बियाण्यांच्या; तसेच, रासायनिक खते-रासायनिक कीटकनाशकांच्या बेगुमान वापरामुळे… लाखो लाखो शेतकर्यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त झालेला, आजचा आधुनिक शेती करणारा ‘अस्वस्थ-भारत’… याविषयी आपण कधि बोलणार? नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता घटून कर्करोग (कॅन्सर), हृदयविकार, मधुमेह आदि असंख्य गंभीर आरोग्य-समस्यांनी घेरला गेलेल्या भारताबद्दल (जो आज, मधुमेह-हृदयविकार व कर्करोगादी गंभीर आरोग्य-समस्यांची ‘जागतिक-राजधानी’ बनू पहातोय) सातत्याने बोललं गेलंच पाहिजे, आवाज उठवलाच पाहिजे!
विशेष उल्लेखनीय बाब ही की, अमेरिकेतून डॉ. नॉर्मन बोरलाॅग यांना भारतात बोलावून घेऊन, बियाणांचा विकास, सिंचन-पद्धतींचा विस्तार, शेतीव्यवस्थापनाचं आधुनिकीकरण, संकरित बियाण्यांचं, कृत्रिम खतांचं व किटकनाशकांचं वितरण इ.च्या आधारे शेतकी संशोधन-तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातलं कृषिउत्पादन कमालीचं वाढवत ज्यांनी, ‘हरितक्रांती’ घडवली… त्या, एम. एस. स्वामिनाथन या ‘हरितक्रांती’च्या जनकाला स्वतःलाच, कालांतराने आपण स्वतः पुरस्कार केलेल्या आधुनिक-शेतीच्या आनुषंगिक व अंतिम गंभीर परिणामांचं स्वरुप पाहून, खूप पश्चाताप झाला होता (जसा, अणुभंजनाचं रहस्य व सूत्र शोधल्याने, अल्बर्ट आईन्स्टाईनना पुढे पश्चाताप झाला होता). ‘हरितक्रांती’च्या या सत्यस्वरुप आकलनाने, ते आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात, एकूणच आधुनिक शेती-पद्धतीबाबत “यू-टर्न’ करण्याची भाषा बोलत होते…पण, आता, शेतकी-उत्पादनवाढीच्या आत्मघातकी नादानं खुळावलेल्या आपल्या देशात, त्यांचं अनुभवजन्य-कथन ऐकणारे कानच शिल्लक राहीले नव्हते! म्हणूनच, देशातील आजचं शेतकी-वर्तमान, प्रचंड आंदोलित आहे, आत्महत्याग्रस्त आहे व देशातील शेतकर्यांचं भविष्य धूसर आहे (त्यामुळेच, ‘उडता पंजाब’ घडलाय).
एम. एस. स्वामीनाथन यांनी आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मार्गात मोदी-शाह सरकारने ठोकलेले खिळे, उभे केलेले अडथळे आणि झालेला लाठीमार व गोळीबार पाहिला असता; तर, ‘भारतरत्न’ पुरस्कार, थेट भाजपाई-संघीय लोकांच्या थोबाडावर फेकून मारला असता, हे निर्विवाद…कारण, एम. एस. स्वामिनाथन म्हणजे कोणी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, कंगना राणावत किंवा अक्षय कुमार नावाची ‘भांडवली-व्यवस्थे’ची लाळ घोटणारी कलाकार-बुजगावणी नव्हेत!
उत्तरेतल्या शेतकरी-आंदोलनासंदर्भात वेळोवेळी, “खुल्या बाजारातली स्पर्धात्मक शेतकी-उत्पन्नाची किंमत घ्या”, हे भाजपाई-संघीय सरकारचं सांगणं म्हणजे… कामगारांचे पगार, त्याच बाजारु-पद्धतीने ठरवण्याचा दुराग्रह धरण्यासारखे आहे (म्हणजे, स्वाभाविकच अगदी तुटपुंजं). सध्याचं तुटपुंजं किमान-वेतन आणि नरेंद्र मोदी सरकारने देऊ केलेली वर्ष-२०१६ मधील फसवी व अपुरी आधारभूत किंमत… या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत.
तेव्हा, जे हिंदुत्वाच्या गळाला लागलेले, धार्मिक-उन्मादाच्या भ्रामक जळातले मासे आहेत…त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की, या ‘भांडवली-व्यवस्थे’चा शत्रू कुठला मुसलमान नव्हे किंवा अन्य कोणी जातधर्मीय नव्हे…तर, समाजाच्या तळागाळातली प्रत्येक व्यक्ति (त्यांनी ट्रक-ड्रायव्हरांना देखील सोडलं नाही), हा भाजपाई-संघीय लोकांचा शत्रू आहे.
यांना कधि तुम्ही कामगार-कर्मचारीवर्गाला सन्मानजनक वेतन व नोकरीत सुरक्षितता देण्यासाठी (म्हणजेच, कंत्राटी-कामगार पद्धती’चं निर्मूलन व ‘काळी कामगार-संहिता’ अथवा ‘ब्लॅक लेबर-कोड’ला विरोध करण्यासाठी वगैरे) करताना, लष्करी तरुणाईची अग्निपथावरील अग्निवीर म्हणून चाललेली कुचेष्टा व कुचंबणा थांबवण्याकामी आवाज उठवताना, शेतकरी-शेतमजुरांच्या आयुष्याला स्थिरता व सुखसमाधान देण्यासाठी (काळे तीन शेतकी-कायदे मागे घेण्यासाठीच्या अथवा MSPसाठीच्या) आंदोलनात वगैरे भाग घेताना पाहिलंय…???
मुद्दा हा आहे की, यांना सर्वसामान्यांच्या जगण्याला मुळातून आधारच द्यायचा नाहीच; उलटपक्षी, असलेले व उरलेसुरलेले कायदेशीर आधार त्यांना नष्ट करायचेत…तळागाळातल्या माणसांनी असुरक्षित ‘अस्तित्ववादी’ जगणंचं जगलं पाहिजे (ज्याला, आपण जगणं म्हणतं नाही; तर, निव्वळ ‘तगणं’ किंवा कसंबसं तगून रहाणं म्हणतो)…जेणेकरुन, ‘गुलाम’ म्हणून, ते या भांडवलदारवर्गाच्या अलगद हाती लागतील.
कामगार-कर्मचारीवर्गाला उत्तम वेतन, शेतकर्यांना चांगली आधारभूत किंमत देणे…ही दारिद्र्य-निर्मूलनाची मोहीम होय…तोच, म. गांधींनी दरिद्री-नारायणा’ला दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा दाखवलेला आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला ‘समतेचा संदेश’ व्यवहारात उतरवण्याचा राजमार्ग होय!
‘इंडिया-आघाडी’ सत्तेवर आल्यास… ‘स्वामिनाथन-आयोगा’च्या शिफारशीनुसार MSP देण्याच्या, राहुल गांधींनी केलेल्या घोषणेचं ‘धर्मराज्य पक्ष’ हार्दिक स्वागत करतो…मात्र, ‘जागतिक तापमानवाढी’तून उद्भवलेल्या निसर्ग-पर्यावरणीय महासंकटांकडे पहाता…रासायनिक खते-कीटकनाशके व संकरित-GM बियाणे, बेलगाम यांत्रिकीकरण व मोठ्याप्रमाणावर प्लास्टिक आच्छादने व शेतीसाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तू-अवजारांचा अतिरेकी वापर… यासारख्या, आधुनिक शेतीपद्धतीतील विविध निविष्ठांचा मानवी-आरोग्यावर व इतर सजीवसृष्टीवर होणारा अतिशय गंभीर व अंति घातकी परिणाम विचारात घेता…’रसायनमुक्त’ (संकरित अथवा GM बियाण्यांच्या; तसेच, रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशकांच्या वापराविना केलेली सेंद्रिय/नैसर्गिक शेती) व शेतातील जीवजिवाणू उध्वस्त करणारं शेतीचं ‘यांत्रिकीकरण’ शक्यतेवढं टाळणाऱ्या… ‘सेंद्रिय/नैसर्गिक शेती’द्वारे झालेल्या, ‘रसायनमुक्त आरोग्यदायक’ कृषिउत्पादनाला, अशा ‘आधारभूत-किंमती’चं अधिकचं (MSPमध्ये नैसर्गिक-शेतमालासाठीच्या खास अधिकच्या ‘जोडमूल्या’ची भर घालून, नैसर्गिक शेतमालाला वेगळी जास्तीची ‘आधारभूत किंमत’ अथवा MSP) संरक्षक-कवच अथवा पाठबळ दिलं जावं, ही निसर्ग-पर्यावरणवादी ‘धर्मराज्य पक्षा’ची पुढील रास्त मागणी आहे…धन्यवाद!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)