‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!!

आपल्या पक्षीय-रिवाजानुसारच, राजकारणात ‘विषाची आणि द्वेषाची शेती’ करणारा, अन्नामलाई नावाचा एक तामिळनाडुचा तथाकथित भाजपाई ‘फायरब्रॅण्ड’ नेता…एक दिवस उठतो काय, तब्बल ५०वर्षांपूर्वी हस्तांतरित झालेल्या ‘कच्चाथिवू’ बेटाबाबत, भारत-श्रीलंकेदरम्यान झालेल्या करारासंदर्भात केंद्र-सरकारच्या परराष्ट्रखात्यात ‘माहिती-अधिकार अर्ज (RTI) टाकतो काय आणि सरकारकडून त्यावर तत्काळ उत्तर येतं काय…सगळाच, ‘मोदी है, तो मुमकिन है’ असा, ‘मोदी-ब्रॅण्ड’चा ठरवून घडवलेला चमत्कार!
‘अगा जे, त्यास्वरुपी काही घडलेचि नाही’, असं असताना…जाणिवपूर्वक सगळे संदर्भ तोडून, धड ‘अर्धसत्य’ही नसलेली, अत्यंत बेजबाबदार व देशाच्या परराष्ट्र-व्यवहारासाठी अत्यंत घातक अशी (पण, निवडणुकीत मतं मिळवण्यास कदाचित हातभार लावू शकणारी), धादांत असत्य-मांडणी…पं. नरेंद्र मोदींनी आपल्या तामीळनाडुच्या निवडणूक-प्रचार दौर्‍यात केली व माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधीवर (म्हणजेच, पर्यायाने राहुल गांधींवर व काँग्रेसवर) एकच टीकेची झोड उठवली.
…काय तर म्हणे, “इंदिरा गांधींनी देशाच्या सार्वभौमत्व, अखंडतेबाबत तडजोड केली व देशाचं मोठं नुकसान केलं”! तामिळनाडुत धड एक जागा मिळण्याची शक्यता तशीही नाही (म्हणूनच, नरेंद्र मोदींच्या ताटाखालचं मांजर असलेला ‘निवडणूक-आयोग’, तिथल्या लोकसभा-निवडणुका १९ एप्रिलला एकाच टप्प्यात ‘चटावरच्या श्राद्धा’सारख्या उरकतोय…महाराष्ट्रात मात्र, लोकसभा-निवडणूक पाच टप्प्यात); पण, जाता जाता देशातलं वातावरण ‘थापेबाजी व दिशाभूल’ करुन साफ ढवळून टाकण्याचा व त्यातून, काही मतं चुकूनमाकून इकडेतिकडे वाढली तर पहाण्याचा, हा अश्लाघ्य व अक्षम्य राजकीय-प्रयोग होय!

‘ऑपरेशन ब्लू-स्टार’च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ‘शीखधर्मीय अंगरक्षक’ हटवण्याविषयी वारंवार गंभीर सूचना देऊनही, राष्ट्रीय-अखंडतेबाबत भारतीय-जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणूनच केवळ त्या अंगरक्षकांना, जीवावरचा उघड धोका पत्करुनही धैर्याने, विश्वासाने आपल्या सुरक्षासेवेत कायम ठेवणारी निडर-बेडर रणरागिणी व प्रखर-जाज्वल्य देशभक्त म्हणजे, इंदिरा गांधी (दुसर्‍या बाजुला, आठवा…५ जानेवारी-२०२२रोजी पंजाब दौऱ्यावर असताना एका उड्डाणपुलावर निदर्शक-शेतकर्‍यांनी पंतप्रधानांचा ताफा थोडावेळ नुसता अडवून ठेवल्यानंतर, पं. नरेंद्र मोदींनी भयभीत होऊन सुरक्षेतल्या त्रुटीबद्दल केलेलं आकांडतांडव)!

…देशात वादळ उठवणाऱ्या ‘कच्चाथिवू’ बेटाच्या समझोत्याविषयीची, पं. नरेंद्र मोदींची राजकीय क्षुद्रवृत्ती दर्शवणारी निवडणूक-प्रचारातली असभ्य चलाखी आणि त्याचे होऊ घातलेले गंभीर आंतरराष्ट्रीय परिणाम, याविषयी थोडक्यात विवेचन करुया….

** मुळातूनच कच्चाथिवू, हे केवळ २८५ एकर क्षेत्रफळात पसरलेले एक ‘निर्मनुष्य बेट’, जे भारताचा भूभाग कधिच नव्हतं…स्वातंत्र्य मिळण्याअगोदरपासूनच (ब्रिटीश-सिलोन, म्हणून जेव्हा श्रीलंका देश ओळखला जात होता) म्हणजे, १९२१पासूनच तो भूभाग विवादीत होता.

** वर्ष-१९७४ला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी अत्यंत मुत्सद्दीपणे व सामरिक दृष्टीकोनातून देशाच्या दीर्घकालीन हितासाठी श्रीलंकेच्या तेव्हाच्या पंतप्रधान सिरीमाओ भंडारनायके यांच्याशी द्विपक्षीय करार करुन ‘कच्चाथिवू’ बेटाचा रितसर ताबा श्रीलंकेला दिला…

** “इंदिरा गांधींनी ‘कच्चाथिवू’ बेटाचा ताबा श्रीलंकेला दिला”…एवढंच सांगून, पं. नरेंद्र मोदी एक मोठं वादाचं मोहोळ उठवून देत सोयीस्कररित्या गप्प बसतात. पण, त्याबदल्यात भारताला रामेश्वरमच्या दक्षिणेकडचा भूभाग श्रीलंकेकडून मिळाला (जो कन्याकुमारीचा भाग बनला) व त्या परिसरातील तेल-नैसर्गिक वायू उत्खननाचे महत्त्वपूर्ण अधिकार भारताला मिळाले, हे सांगत नाही आणि हे ही सांगत नाहीत की, “१९७१च्या बांगलादेश निर्मितीच्या युद्धात, श्रीलंकेने पाकिस्तानला आपल्या देशात पाकिस्तानच्या विमानांना इंधन भरु देण्याची, जशी सोय उपलब्ध करुन दिली होती…तशी ती पुन्हा कधिही उपलब्ध करुन न देण्याची व श्रीलंकेला ‘पाकिस्तानचा हवाईतळ’ म्हणून वापर करु न देण्याची, सामरिकदृष्ट्या महत्त्वाची अट इंदिरा गांधींनी करारात घातली होती.

** नरेंद्र मोदी हे सांगत नाहीत की, त्याच वर्षी इंदिरा गांधींनी जवळपास १७लाख एकराचा ईशान्यपूर्व सिक्कीमचा भूप्रदेश (चीनसारख्या घातकी शत्रूच्या संदर्भात, संरक्षण व दळणवळणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण) भारताला जोडून घेत ‘सिक्कीम’ हे भारताचं २२वं नवं राज्य बनवलं.

** नरेंद्र मोदी हे ही सांगत नाहीत की, कच्चाथिवू हस्तांतरित करण्यापूर्वी फक्त तीनच वर्ष अगोदर, स्व. इंदिरा गांधींनीच पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगलादेशाची निर्मिती केली व पाकिस्तानला कायमचा पंगू बनवला…उगीचच का अटलबिहारी बाजपेयी इंदिरा गांधींना ‘दुर्गेचा अवतार’ म्हणाले होते?

** याच बांगलादेशाला, वर्ष-२०१५मध्ये नरेंद्र मोदी सरकारने सीमातंटा सोडवण्याकामी केलेल्या कराराद्वारे, सुपीक व मोठ्याप्रमाणावर मनुष्यवस्ती असलेला जवळपास १०हजार एकराचा ‘अतिरिक्त भूभाग’ देऊन टाकला…मग, हा देखील कच्चाथिवू-हस्तांतरणापेक्षा अंदाजे ३५ पट मोठा (१०,००० एकर ÷ २८५ एकर) ‘राष्ट्रद्रोह’च मानायचा का?

** आजचे परराष्ट्रमंत्री असलेले एस. जयशंकर, हे १९८८ ते १९९०पर्यंत श्रीलंकेत भारतीय राजदूतावासात ‘प्रथम सचिव’ पदावर होते व श्रीलंकेतल्या भारतीय-शांतिफौजेचे राजकीय-सल्लागार होते…याचाच अर्थ, त्यांना हा सगळाच घटनाक्रम यथास्थित माहित्येय; म्हणूनच, ते या मोदींच्या बेजबाबदार वाक्ताडनावर भाष्य टाळण्यासाठी तोंड लपवून दूर पळतायत!
जयशंकरांनी असं तोंड लपवण्यापेक्षा, भारतीय-अर्थव्यवस्था गटांगळ्या खायला लागल्यामुळे लोकसभा-निवडणूक न लढवण्याची घोषणा करत, ज्याप्रकारे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलगद निवृत्ती घेतल्यात जमा आहे…त्यांच्यासारखीच निवृत्ती घेऊन सार्वजनिक-जीवनातून चालतं व्हावं, हे उत्तम…त्यामुळे, देशाची घसरणारी इभ्रत तरी थोडी वाचेल.

** नरेंद्र मोदींच्या राजवटीत अजून एका सख्ख्या शेजारी देशाची अवकृपा, भाजपाच्या राजकीय लाभासाठी आपण ओढवून घेतलीय. नरेंद्र मोदींच्या ‘कच्चाथिवू’ बेटासंबंधीच्या वादग्रस्त विधानामुळे श्रीलंकेन जनतेत संतापाचा मोठा लोळ उठलाय व तेथील जनताच नव्हे; तर, मंत्री देखील त्याविरोधात रस्त्यावर उतरलेत (जे ‘गोदी-मिडीया’तून कधिच दाखवलं जाणार नाही)

** या अशा भारतातल्या गढूळ वातावरणामुळे भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांनी मिळून बनलेल्या ‘सामरिक सुरक्षा संवादा’तील (QUAD OR Quadrilateral Security Dialogue) भारताचा सहभागही धोक्यात आल्याचं बोललं जातंय.
———————————————————————
“परराष्ट्र धोरण हे कुठल्याही राजकीय पक्षाचं म्हणून खास वेगळं धोरण असू शकत नाही, ते संपूर्ण राष्ट्राचं सकल-धोरण असतं”, असं अटलबिहारी बाजपेयी, तत्कालिन परराष्ट्रमंत्री, या नात्याने बोलून गेलेत.
सध्या, श्रीलंकेत भारताविरुद्ध उसळलेला प्रचंड रोष पहाता…. ‘परराष्ट्र-धोरण’, हा काय, भातुलकीचा पोरांचा खेळ आहे काय, हा प्रश्न विचारावासा वाटतो.
‘अब की बार ट्रंप सरकार’ असं अमेरिकेत जाऊन भारताच्या पंतप्रधानांनी बेधडक म्हटलेलं चालतं; पण, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटक प्रकरण व लोकसभा-निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बँक-खाती गोठवणं वगैरे बाबींवरुन जर्मनी, अमेरिका, संयुक्त-राष्ट्रसंघ (UNI) आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल यांनी भारतावर कडक टीका केलेली मात्र, यांना चालत नाही…हा दुटप्पीपणा कुठला?

गुजराथच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर क्रीक आणि नारायण-सरोवर पट्ट्यातील भारतीय कोळ्यांच्या हजारो कोटींच्या मासेमारीवर (जिथे, औषध-उद्योगासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा लाखो रु. किंमतीचा घोळ मासा मिळतो)… ‘No Fishing Zone’ जाहीर करुन भारतीय कोळ्यांसाठी (जे भाजपाचे मतदार नसल्याचा एकप्रकारे सूड उगवला जातोय) कठोर बंदी लादली गेलीय; पण, पाकिस्तानी कोळ्यांना मात्र, मासेमारीसाठी पूर्ण मोकळीक दिली गेलीय…मग, ‘देशद्रोही’ कोण? या घटनाक्रमाचा, पाकिस्तानच्या ‘हब-पाॅवर’सारख्या (HubPower) कंपन्यांनी ‘भाजप’ला दिलेल्या करोडोंच्या इलेक्टोरल-बाॅण्डच्या छुप्या देणग्यांशी, काही संबंध आहे काय, हे शोधायला नको?

“ज्यांना इतिहास घडवता येत नाही; ते इतिहास बिघडवण्याचं किंवा विकृतरित्या सांगण्याचं काम या देशात करतायत, करत आलेत”…कित्येक वर्षांपूर्वी अत्यंत सन्मानजनक व सौहार्दपूर्ण स्थितीत मिटलेल्या वादांवर काळाने धरलेली खपली, निहीत राजकीय-स्वार्थापोटी काढून जखम उघडी होऊ देणं, रक्त भळभळा होऊ देणं…हीच, भाजपाई-संघीय मानसिक-विकृती आहे! त्या विकृतीवर जगणारी, पोसली जाणारी शिक्षित-अशिक्षित ‘अंधभक्तां’ची एक मोठी फौज भारतात मौजूद आहे.
कुत्रा, जसं कुठलं तरी जुनंपानं हाडूक गवसलं की, चघळत बसतो…त्याच्या स्वतःच्याच तोंडातून हाड चघळत बसल्यामुळे शेवटी रक्तस्त्राव होतो. तो ते रक्त आनंदाने चाटत बसतो…ते रक्त, त्याचं स्वतःचंच असतं; हे त्याला आकळत नाही. हीच, विकृत-विक्षिप्त अवस्था, देशातील या ‘अंधभक्त-जमाती’ची आहे… ती जमात, आता कच्चाथिवू-बेटाचं, जमिनीतून उकरुन काढलेलं हाडूक, देशातल्या निवडणुका संपेपर्यंत चघळत बसेल…रक्त सांडेपर्यंत!
…सर्वसामान्य जनतेनं मात्र, त्यापासून पूर्ण सावध राहून, आपलं रक्त वाया घालवू नये, म्हणजे मिळवलं!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)