Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…???

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…???
Forget Not…We have been trained since school days : “Man is known by the company he keeps…!!!”
पं. नेहरुंची काय किंवा सोनिया गांधींची काय…’फोटोशाॅप’मधून बनवलेल्या खोट्यानाट्या फोटोंआधारित बदनामी करणारी व हिरेन जोशीच्या इशाऱ्यावर काम करणारी ‘अमित मालवीय’फेम बीजेपी ‘आयटी-गँग’…आणि, काश्मीरपासून केरळपर्यंतच्या बोगस ‘फाईल्स’ सिनेमाच्या पडद्यावर झळकावून, भारतात जातधर्मविद्वेषाचा विखार पसरवणारे ‘अंधभक्त’… ‘एपस्टिन फाईल्स’ प्रकरण, जर यदाकदाचित खरंच तडीस गेलं; तर, कुठल्या अवस्थेत असतील? जागतिकस्तरावरुन एकूणच जे संकेत प्राप्त होताहेत, त्यानुसार सतत दिसेल त्याला, जातधर्मद्वेषाचा विषारी डंख मारणाऱ्या आणि पं. जवाहरलाल नेहरु व म. गांधीसारख्या जगविख्यात व वंदनीय व्यक्तित्वांची बदनामी करत त्यांच्यावर विषयुक्त ‘फुत्कार’ टाकणार्या नागांना, थेट बिळं गाठावी लागू शकतात….
——————————————————————————
भारतात इस्त्रायली बनावटीचं ‘पेगॅसस’ हे हेरगिरी करणारं सॉफ्टवेअर पाठवणाऱ्या इस्रायलच्या, एका पाशवीवृत्तीच्या मोठ्या शक्तिशाली ‘नेत्या’वर, ‘एपस्टिन-फाईल्स’ प्रकरणातील पिडीत तरुणींनी जे आरोप केल्याचं समजतं…ते पहाता, सुसंस्कृत काळजाचा थरकाप उडावा, एवढ्या नृशंस पद्धतीने तो माणूस अल्पवयीन मुलींचं कथितरित्या लैंगिक-शोषण करत होता…मग, गाझामध्ये जो क्रौर्यपूर्ण वंशविच्छेद, गेली दोनअडीच वर्षे चाललाय, त्यात आश्चर्य ते कसलं?
जेफ्रे एपस्टिन हा अमेरिकी ज्यू, इस्त्रायलची कुख्यात गुप्तचरसंस्था ‘मोसाद’चा अट्टल हेर होता आणि तो पडद्याआडून बर्याच राष्ट्रप्रमुखांना, पद्धतशीर गोळा केलेल्या छुप्या व्हिडिओ व फोटोंमधून सरळसोट ‘ब्लॅकमेल’ करत होता.
जगभरातून पैसे मोजून (संबंधित मुलींच्या वा त्यांच्या कुटुंबियांच्या असहायतेचा गैरफायदा घेत) वा अन्य गुन्हेगारी मार्ग अवलंबून उफाड्याच्या अल्पवयीन मुली गोळा करायच्या (लैंगिक-तस्करी…Human-Trafficking)…त्यातही, जास्त वयाच्या मुलींची ‘भेसळ’ होऊ नये, म्हणून चक्क ‘आयडी-कार्ड’ तपासून त्या मुली १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या असल्याची (त्यातल्या, चांगल्या चणीच्या कित्येक मुली १२-१३ एवढ्या कमी वयाच्या देखील असायच्या) पूरेपूर खात्री करुन घ्यायचा… आणि, बड्या धेंडांच्या नृशंस-वासनापुर्तिसाठी त्यांच्या पुढ्यात लोटायचा (डोनाल्ड ट्रंप यांची बायकोच, काही मुलींना अशा लोकांसह, आपल्या नवर्यापासूनही सावध रहाण्याचा इशारा देताना आपल्याला दिसते).
ही सारी… पैसा, सत्ता आणि लैंगिक-वासनेनं वखवखलेली दोन पायांची श्वापदं, जर माणसंच म्हणायची; तर, तो अशा माणसांचा ‘कळप’ आहे की, ते जेथून येतात, ज्यांचं प्रतिनिधित्व करतात…त्या लोकांची त्यांना काडीचीही पर्वा नाही…त्यांच्यासाठी, माणसांसकट सगळं ‘सजीवविश्व’, हे एक फक्त उपयुक्ततेचं व उपभोगाचं संसाधन आहे, ज्याचा हवा तसा वापर करायचा व यथेच्छ ओरबाडून त्याचा आस्वाद घ्यायचा, बस्स! ते एका वेगळ्याच उपग्रहावर जगत असतात…त्या त्यांच्या निवडक ‘जत्थ्या’पलिकडे, त्यांच्यासाठी सारेजण जणू फक्त, पृथ्वी नावाच्या ग्रहावरचे ‘ग्राहक’ असतात…असे ‘ग्राहक’ की, ज्यांचं ‘माणूसपण’, त्यांनी या क्रौर्यपूर्ण ‘नवउदारमतवादी (Neo-Liberalism) भांडवली-व्यवस्थे’तून नाकारल्याला, आता जवळपास पाच दशके उलटून गेलीत!
त्यांच्या निष्ठा फक्त आपापसातच विभागलेल्या आणि केंद्रित झालेल्या असतात आणि म्हणूनच, त्यांना जोडणारा एक एपस्टिनसारखा नरपिशाच्च ‘दुवा’ म्हणून लागतो… एका अर्थाने, हे एक “शोषकांचं आणि श्वापदांचं मोठं कुटुंब”च होय! “त्यांच्याकडे ढीगभर पदव्या, राजकीय-प्रशासकीय सत्तेचा दांडगा अनुभव, सरकारी-मानमरातब व अफाट ऐश्वर्य असेल; पण, माणूसपणाच्या भिंगातून पहाता, ही माणसं, कुठल्या दर्जाची आहेत? ही लोकं यांच्या अल्लड मुली, नातींशी असाच व्यवहार करणाऱ्यांशी देखील, अशीच उठबस करतील काय, असाच ‘दोस्ताना’ ठेवतील काय…हा मूलभूत प्रश्न आहे. कुठल्या ‘मानवी न्याय-सन्माना’ची यांच्याकडून अपेक्षा करायची?? कल्पना करा, त्यांनी आपल्या राजवटीत काय आणि कसले न्यायनिवाडे केले असतील, निर्णय घेतले असतील वा धोरणं राबवली असतील???
…हीच लोकं आजवर आपल्या आयुष्याबद्दलचे निर्णय घेत आलीत; त्यामुळेच, तुमच्याआमच्या आयुष्यात दुःख आहे, वेदना आहे आणि म्हणूनच, तुमच्याआमच्या साध्यासुध्या गरजा अपुऱ्या रहातायत… कारण, ही माणसं, तुमची माणूस म्हणून ओळख कायम नाकारत आलीत!
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा आर्थिक-सल्लागार व जगविख्यात हार्वर्ड-विद्यापीठाचा प्रमुख राहिलेला लॅरी सॅमर्स, हा ‘अवघे पाऊणशे वयोमान’ असलेला, ‘हिरव्या देठा’चा अर्थतज्ज्ञ, एखाद्या षोडशवर्षीय नवथरासारखा एपस्टिनकडे निरर्गलपणे ‘डेटिंग-ॲडव्हाईस’ मागतो…आणि, विशेष बाब नमूद करायची; तर, याच लॅरी सॅमर्सची बायको, त्याचवेळेस एपस्टिनकडे अमेरिकन चित्रपट निर्माता व नट असलेल्या ‘वूडी ॲलन’ याची खाजगी भेट कशी मिळवता येईल, याची विचारणा करत असते. हे सगळं, केवळ अमेरिका भांडवलशाहीची ‘मक्का’ असण्याचंच नव्हे; तर, बलात्कारी, लिंगपिसाट, मनोविकृत डोनाल्ड ट्रंप यांच्या ‘मागा’ (MAGA…Make America Great Again) या पराकोटीच्या स्वार्थी व संवेदनशून्य धोरणाचं देखील विषारी फळ आहे. वर्ष-२००८च्या ‘सबप्राईम’ भांडवली-घोटाळ्यातील दोषींना, कडक शिक्षा करण्याऐवजी, त्यांना अमेरिकन जनतेच्या कररुपी पैशातून लाखो डाॅलर्सची खैरात वाटणारा, हाच तो बदमाष गडी..लॅरी सॅमर्स!
डेमोक्रॅटिक काँग्रेस-सदस्य ‘रो खन्ना’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकी न्याय-विभागावर (DOJ…Department Of Justice)…१९ नोव्हेंबरला उघड केलेल्या ‘फाईल्स’मधील प्रतिमा धूसर केल्या जाण्याचा (Redaction), ईमेलमधली नावं पुसली जाण्याचा तसेच, शेकडो पानं कोरी व त्यातील काही गहाळ केल्याचा अतिगंभीर आरोप केलाय. खरंतरं, ही सगळीच ‘हैवान’ मंडळी…खुलासा कमी आणि लपवाछपवी जास्त करण्यात सध्या दंग आहेत! बड्या नेत्यांच्या बद्दलची सगळी माहिती, यापूर्वीच नष्ट केली गेलीय. कुठे आहे अमेरिकी-पारदर्शकता…की, १९७२च्या रिचर्ड निक्सन या भूतपूर्व अमेरिकी अध्यक्षांच्या ‘वाॅटरगेट’ प्रकरणासारखी “All the President’s Men”, दारुण अवस्था आहे सध्याची?
एपस्टिन पहिल्या खेपेस १३ महिन्यांच्या तुरुंगवासाच्या ‘मॅनेज्ड’ शिक्षेने सुटतो आणि त्याही दरम्यान दररोज १२ तास स्वतःच स्थापन केलेल्या एका संस्थेत ‘सोशल किंवा कम्युनिटी सर्व्हिस’ करण्याची सवलत मिळवता होतो (म्हणजे, फक्त झोपण्यापुरताच तुरुंगात) आणि नंतर तर, त्याची दुसर्या खेपेस न्यूयॉर्कमधील तुरुंगात अतिशय संदिग्ध व संशयास्पद अवस्थेत आत्महत्या झाल्याचं जगासमोर येतं…भरीसभर म्हणून, ही आताची जगातल्या काही राष्ट्रप्रमुखांना व बड्या धेंडांना वाचविण्यासाठी चाललेली, लपवाछपवी व पुराव्यांमध्ये फेरफार करण्यासाठीची प्रचंड धावपळ…नेमकं काय दर्शवते?
राष्ट्रीय-सुरक्षेच्या बेगडी भूमिकेचा आधार घेत, अमेरिकी-प्रशासनाकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल वा पुराव्यांमध्ये खोडाखोड-अदलाबदल केली जात असल्याबद्दल…अमेरिकी न्याय-विभागावर व अमेरिकन अध्यक्षांवर ‘महाभियोग’ (Impeachment) आणण्याची ‘रो खन्ना’ यांनी केलेली घोषणा, या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ठरावी.
पण, या सगळ्यातून आमचा कामगार-कर्मचारीवर्ग काही बोध घेणार आहे का, कुठला धडा शिकणार आहे का…हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ‘लैंगिक-शोषणा’पासून अनेकविध गैरप्रकार, औद्योगिक-क्षेत्रात व ‘आयटी’सारख्या सेवा-उद्योगात सुरु आहेत; पण, तरीही ‘कॉर्पोरेटीय-शांति’चा सन्नाटा पसरलेला आहे तिथे! ही कुठल्याही प्रार्थनास्थळीची पवित्र-शांतता नव्हे; ती आहे, स्मशानातल्या मुडद्याफरासांची अपवित्र-निर्जीव शांतता…पण, कमांडोज अथवा सशस्त्र बाऊन्सर्स ठेऊन ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate-Terrorism) पसरवत पिडीतांचा आवाज-आक्रोश दडपण्यातूनच तिची आजवर जडणघडण झालीय…आयटी-उद्योग वा इतर औद्योगिक-विश्वातल्या अशा ‘एपस्टिन-फाईल्स’सदृश रोज घडणाऱ्या घटना टाळायच्या; तर, कामाच्या ठिकाणी ‘लोकशाही’ (Democracy At WorkPlace) हवी…कामाच्या ठिकाणी व्यवस्थापकीय मंडळींना जरब बसेल; असे पाश्चात्य धर्तीचे कडक कामगार-कायदे हवेत… आणि, आपल्याकडे तर, कामगार-कर्मचाऱ्यांचं व त्यांच्या संघटनांचं सबलीकरण-सक्षमीकरण करण्यासंदर्भात “षंढ नवरा कुंकवाला आधार” म्हणून असलेले कामचलाऊ व तकलादू कामगार-कायदे देखील बदलले जाऊन…परिपूर्ण व अखंड ‘गुलामी’ लादणारे ४ काळे कामगार-कायदे (Black Labour-Codes) आणले गेलेत…आणि, त्याद्वारे, औद्योगिक-सेवा क्षेत्रातील ‘एपस्टिन-फाईल्स’ कायमच्या बंद राखण्याची तरतूद भाजप-संघीय सरकारकडून केली गेलीय…
…तेव्हा, फक्त, ‘पगार आणि बोनस वाढ’ एवढ्याच त्रोटक भूमिकेतून ‘कामगार-चळवळी’कडे पहाणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांनो, सावध होऊन काळाच्या हाका वेळीच ऐका, धन्यवाद!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)