हुकूमशाही कारभार, भ्रष्टाचार आणि अन्यायाप्रति संवेदनशून्य असणाऱ्या रावणासारख्या उन्मत्त व ‘माजवादी’ राजकीय-व्यवस्थेविरोधात उसळणाऱ्या…’अभिजीत दिपके’सह भारतवर्षातील समस्त तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवणारे, देवेंद्र फडणवीस कोण…???
भारतीय संविधान आणि संविधानाअंतर्गत येणाऱ्या निवडणूक-आयोगासह सगळ्याच संस्था (अगदी बहुतांश न्यायालयीन-व्यवस्थासुद्धा) आपल्या राक्षसी पकडीत ठेवणाऱ्या…सत्तेच्या ‘माजवाद्यां’नीच, देशात लोकशाहीला जिवंत ठेऊ पहाणार्या भारतीय तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवावं…हा एक धक्कादायक क्रूर विनोद आहे आणि त्याचा सर्व थरातून तीव्र निषेध झालाच पाहिजे. कारण, एव्हाना पडद्याआड कारस्थानं रचणं सुरु झालं असेल…त्या GEN-Z तरुणाईला ‘अर्बन नक्षलाईट’ ठरवत, ‘उमर खालिद’सारखी ‘उम्रकैद’ देण्याची तयारी सुरु झाली असेल किंवा गडचिरोलीतील नक्षलवाद्यांसारखी गोळ्या घालून मारण्याची तयारी सुरु झाली असेल. ‘कारस्थानी’ फडणवीसांनी त्याकामी, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा अधिनियमाची (Maharashtra Special Public Security Act)…याअगोदरच, तरतूद करुन ठेवलेली आहे, हे ध्यानात घ्या.
…विशेष बाब म्हणजे, “ये क्या लगाया है आंबेडकर आंबेडकर…आंबेडकर का नाम लेने की आजकल ‘फॅशन’ हो गयी है”, असं संसदेत उद्दामपणे उच्चारणार्या अमित शहांची थुंकी वरचेवर झेलणार्यांना, काय कळणार की, ‘आंबेडकर’ ही ‘फॅशन’ (Fashion) नसून संपूर्ण भारतीय समाजाची व अर्थातच, आजच्या तरुणाईची ‘पॅशन’ (Passion) आहे! अंतरंगी आंबेडकरांचा, मुस्लिमांसारखाच व कामगार-शेतकऱ्यांसारखाच द्वेष बाळगणाऱ्या ‘भांडवली-दलालां’नी…बाबासाहेब आंबेडकरांविषयी पुतना मावशीचं प्रेम दाखवावं…???
…ज्यांच्या प्रज्ञेची झेप व राजकीय समज, ‘संघीय भडभुंजे आदेश’ पाळण्यापलिकडे व निसर्ग-पर्यावरणाचा पार विध्वंस करत, विकासाची सैतानी-संकल्पना राबवण्यापलिकडे जात नसावी…अशांनीच, राज्यघटनेच्या सुरक्षेविषयी कोल्हेकुई करावी? …आणि, आमच्या तरुणाईवर ‘अराजकवादी’ असण्याचा शिक्का मारण्याचा घोर प्रमाद करावा?? …याचा अर्थच मुळी, गौतम बुद्धाला नववा अवतार ठरवून संपवण्यासारखं, हे या तरुणाईबाबत ‘संघीय-कारस्थान’ खात्रीने रचलं आहे!
…यांच्या पूर्वसुरींनी, अशीच हाकाटी करुन गौतम बुद्धाला ‘नववा अवतार’ ठरवला होता. जर चांगल्या अर्थाने व मनाने ठरवलाच होता; तर, मग राम-कृष्ण या अवतारांची जशी शब्दशः लाखो मंदिरे देशभरात उभारली गेली (अजूनही अयोध्येप्रमाणे नव्याने उभारली जातायत)…तशी, ‘गौतम बुद्ध’ या ‘नवव्या अवतारा’ची किमान नऊ मंदिरे तरी या वर्णवर्चस्ववाद्यांनी उभारायला हवी होती; नऊ सोडाच, एकही असं मंदिर न उभारलं जाण्यामागचं कारण, मोठं कारस्थानीवृत्तीने आरपार भरलेलं आहे.
…त्यामागचं पहिलं सूत्र हे की, गौतम बुद्ध अल्पावधीत एवढे भरतवर्षात लोकप्रिय झाले होते की, त्यांना आव्हान देण्याची ताकद, या अल्ममती-षडयंत्री वर्णवर्चस्ववाद्यांकडे तेव्हा नव्हती; म्हणून प्रबळ शत्रूला आपला मित्र वा तारणहार जाहीर करायचा (इथे ‘नववा अवतार’ जाहीर केलं गेलं)….
…त्या कारस्थानातलं दुसरं सूत्र म्हणजे, भाकड कथा रचायची व जनमानसात प्रचलित करायची…ती अशी की, तत्कालीन सतयुगी गुणधर्मांमुळे कुणीच नरकात जात नव्हते व अशारितीने, रिकाम्या पडत चाललेल्या ‘नरका’त पाप्यांची भरती व्हावी व आपल्याला काम मिळावं…या यमदुतांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी गौतम बुद्ध हा म्हणे, लोकांना कर्मकांडापासून दूर नेऊन (जे प्रत्यक्षात खरंतरं महान ‘पुण्यकर्म’ होतं) त्यांना ‘पापी’ बनवण्यासाठी ‘नववा अवतार’ धारण केला… मग, अर्थातच म्हणे, गौतम बुद्धांच्या नवव्या अवतारामुळे पृथ्वीवरील पापाचरण वाढून नरकात प्रचंड भरती सुरु झाली व ‘बेकार’ असलेल्या यमदुतांना ‘रोजगार’ मिळाला! परंपरेने एकेक काय यांच्या कारस्थानी डोक्यातून काल्पनिक-कथा निघतील, त्याचा थांग लागणं कठीणच. त्यामुळेच, गौतम बुद्धांची मंदिर उभारण्याचा पत्ता तर परस्पर ‘कट’ झालाच; पण, त्याचबरोबर, अज्ञानी बहुजनसमाजातून गौतम बुद्धांसारख्या हजारो वर्षांनी जन्म घेणाऱ्या महान व्यक्तित्वाचा, आपसूकच पाणउतारा व यथावकाश पूर्णतः पाडाव करण्यात आला! इथे लक्षणीय बाब ही की, राम-कृष्ण अवतारातला, ‘राम’ हा ‘अपूर्ण अवतार’; तर, कृष्ण हा ‘पूर्ण अवतार’… राम हा अत्यंत वात्सल्यपूर्ण व एकवचनी-सत्यवचनी; पण, मूलतः या ‘अपूर्ण अवतारा’च्या, मूळ वत्सलतेनं ओतप्रोत भरलेल्या स्वभावप्रकृती विरोधात असणारा उग्रप्रकृती-रागीट स्वभावाचा राम जाणिवपूर्वक रंगवला जातोय… *’जय सिताराम’ या प्रेमळ पारंपारिक उच्चाराऐवजी, ‘जय श्रीराम’ असा ‘उग्र जप’ यांच्या मुखातून सदैव केला जातोय, हे विसरु नका! तसेच, राजकीय-व्यवहारात ‘सत्यवचनी’ रामाची विडंबना करत, सातत्याने रेटून खोटं बोलणारी, ही भाजप-संघीय मग्रूर जमात आहे, हे ही विसरुन चालणार नाही.
…तेव्हा, देशात सद्यस्थितीत माजलेल्या एकूण ‘अराजका’विरुद्ध, लोकशाही मार्गाने आवाज उठवू पहाणाऱ्या, तरुणाईला संपवण्याचं भाजप-संघीय ‘कारस्थान’, अशातऱ्हेनं सुरु झालं असेल; तर, राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखालील ‘काँग्रेस आणि काॅक्रोच’…यांनी एकमेकात पूर्णतया मिसळलं जाणं, ही काळाची गरज; तसेच, या भीषण काळाची ती हाक आहे…फक्त, ती संबंधितांच्या कानापर्यंत, मेंदूपर्यंत पोहोचली पाहिजे व त्यावर, त्यांनी तातडीने सजग होऊन सकारात्मक विचार करायला हवा.
भाजप-संघीय नजरेत (सरन्यायाधीश वा CJI त्याच विचारधारेचे) ‘झुरळं आणि बांडगुळं’ असलेली तरुणाई (जी प्रत्यक्षात, देशाचं भविष्य आहे)…म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, भगतसिंग, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर… या चार महान प्रभृतींच्या विचार-वारशाला सोबत घेऊनच, आपली राजकीय पाऊलवाट चोखाळत असेल; तर, त्यांनी हकनाक वेगळी राजकीय चूल मांडून आपला वेळ व ऊर्जा निष्कारण खर्ची पाडू नये! राहुल गांधीं, हे आजच्या घटकेला, वरील चौघा राष्ट्रीय-नेत्यांचं, जाज्वल्य प्रतिनिधित्व करताहेत, हे या GEN-Z तरुणाईनं आवर्जून समजून घ्यायला हवं!
राहुल गांधींना सद्यस्थितीत अशा विचारशील, उत्तम राजकीय आकलन असणाऱ्या समाजहितैषी-सुशिक्षित नवतरुणांची नितांत गरज आहे… राहुल गांधींनीही, स्वतः पुढाकार घेऊन, या साऱ्या तरुणांना काँग्रेसमध्ये आग्रहपूर्वक बोलवावं व मोठ्याप्रमाणावर त्यांना काँग्रेसमध्ये, महत्त्वपूर्ण पदांवर, वेळ न गमावता (कन्हैय्या कुमारप्रमाणे) नेमावं व जागा अडवून बसलेल्या काँग्रेसी दुढ्ढाचार्यांना लवकरात लवकर सोडचिठ्ठी द्यावी! या सगळ्या मंथनातून, काँग्रेसला आपली स्वातंत्र्यपूर्व काळातील जुनी ओळख (Identity) पुन्हा प्राप्त होईल व देशाचं त्यातून नक्कीच चांगभलं होईल.
…तशीही झुरळं, ही किटकांची प्रजात, अत्यंत प्रतिकूल पर्यावरणीय स्थितीतही टिकून-टिच्चून राहू शकतात; ती त्यांची क्षमता एवढी अचंबित करणारी की, भविष्यात आण्विक युद्धाने जगाचा पूर्ण विनाश झाला, तरी झुरळं त्या आण्विक-विविकरणाच्या भयंकर प्रदुषणातही वाचणार आहेत आणि नुसती वाचणार नव्हेत; तर, त्यांचा आकार व संख्या कमालीची वाढणार आहे, असं म्हटलं जातं…
तसंही, ‘माणूस आणि झुरळं’, यांचं एक अनोखं नातं आहे; ते सैबेरिया-ग्रीनलँडसारख्या अतिशीत प्रदेशातही एकत्र दिसतात-रहातात आणि अरबस्तानाच्या अतिउष्ण वाळवंटी-प्रदेशातही… “जिथे माणूस, तिथे झुरळ”, हे एक समीकरणच!
…तोच प्रत्यय, ‘काँग्रेस आणि काॅक्रोच’, यांच्या सहअस्तित्वाच्या व विलिनीकरणाच्या रुपाने यावा; आजच्या लोकशाहीच्या दृष्टीकोनातून अत्यंत प्रतिकूल असलेल्या धोकादायक काळात, तो झुरळांसारखाच कुठल्याही वातावरणात टिकून-टिच्चून रहावा, हीच ईशचरणी प्रार्थना…जय हो!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

