“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील अखेरचा लेख क्र.५)

“राजकारणी, एकवेळ चोर-दरोडेखोर असला तरी चालतो (बहुतांशी ते असतातच); पण, तो ‘बिल्डर’ वा बांधकाम-उद्योगाचा थेट ‘लाभार्थी’ (छुपा भागीदार वगैरे) असता कामा नये….”

महाराष्ट्रात मुंबई-लालबागच्या ‘कृष्णा देसाई’, या धडाडीच्या कामगार-नेत्याची हत्या झाली आणि तिथून मुंबई-महाराष्ट्रातला लालबावटा आणि त्याचबरोबर डावी-चळवळ थंडावली… कामगारांमधून बिनीचे राजकीय कार्यकर्ते होण्याच्या प्रक्रियेत खंड पडला, तो आजतागायत! राजकारणातला एक जिताजागता-जाणकार, संघर्षरत ‘समाजघटक’ किंवा राष्ट्रीय-संपत्तीचा ‘निर्माता’…या नात्याने वावरणारा ‘कामगारवर्ग’, झपाट्याने ‘दिशाहीन’ होत, वृत्तीने शब्दशः ‘हीन’ होत गेला. व्यसनाधीनता, क्षुद्र स्वार्थ किंवा भयगंडापोटी…फुटीरता, बेईमानी आणि गद्दारी वरचेवर करत रहाण्यातून, उरलीसुरली कामगार-चळवळ अस्तंगताला जात गेली. मराठी-कामगार, मग तो उरलासुरला ‘कायम’ कामगार असो वा ‘कंत्राटी-गुलाम’ असो; तो एवढ्या अवनतीला गेला की, आपल्याला सुळावर चढवणार्‍यांना उद्देशून ‘येशू ख्रिस्त’ जे म्हणाला होता; तेच तो आज पुन्हा जिवंत झाला तर, आजच्या कामगारवर्गाला उद्देशून म्हणेल, “ते काय करताहेत, हे त्यांच त्यांनाच कळत नाहीय!”
…त्यातच, अत्यंत बेजबाबदार व निव्वळ अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, वाटेल त्या थराला जाणारे ‘उत्तरभारतीय लोंढे’ कामगारक्षेत्रात, मायमराठ्यांना ढुशा देत मोठ्याप्रमाणावर घुसत गेले…आणि, मग, कामगार-चळवळीच्या दृष्टीने, उरलंसुरलं सगळंच संपलं!
…आणि, त्याचसोबत, राजकारण कामगारवर्गाच्या हातून निसटून, भांडवलदारवर्गाच्या व प्रामुख्याने, बिल्डर-लाॅबीच्या हातात गेलं…भांडवलदार पडद्याआडून; तर, बिल्डर-लाॅबी थेट छाती पुढे काढून राजकारणाचा कब्जा घेऊन बसली!

‘दहशतवादा’चा रोग तसा, ठाण्यासाठी फार जुना आहे; जोपर्यंत, तुम्ही त्यापासून ‘अस्पर्श’ असता किंवा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या त्याचे ‘लाभार्थी’ असता; तोपर्यंत, तुम्ही त्यावर अवाक्षर न काढता, एकप्रकारे त्याचे समर्थनच करत असता, करत रहाता….पक्ष-कार्यालयांतून वा संघटित गुंडगिरीतून चालणारी ‘घटनाबाह्य न्यायालये’ अथवा वाटली जाणारी कंत्राटे…ही मूळ गुन्हेगारीची सुरुवात होय; ‘ग्यानबाची मेख’ तिच आहे! त्याच्या फार खोलात न जाता, एवढंच म्हणता येईल की, हे दोनतीन पिढ्यांचं पाप आहे…पुढच्या पिढ्यांना ते धुवून काढावं लागेल; जसं, सध्या CJPच्या ‘अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरभ दास’सह CPI(ML) कम्युनिस्ट पक्षाच्या ‘AISA’ची ‘नेहा बोरा’…ही ‘Gen-Z’ नवतरुणाई, मोठ्या राजकीय कॅनव्हासवर, ते महत्कार्य पार पाडताना दिसतेय.

…मुद्दा, आज SRA आणि क्लस्टर-विकासाचा…जोडीला ३०-३५ वर्षातच जीर्ण होत चाललेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा! थोडं थबकून जरा विचार व्हायला हवा की, आज आपण फुकटात घरं देण्याच्या नावाखाली गगनचुंबी ‘टाॅवर्स’ बांधत चाललोत; पण, भविष्यात काय याच गतीने पुढे ‘आयफेल टॉवर्स’ बांधणार आहोत की, ‘बुर्ज खलिफा’…??? या अतिरेकी काँक्रीट-बांधकामांतून गुंतागुंतीच्या अनेक नागरी-समस्या उद्भवतील व एकूणच शहरी-गुन्हेगारीत अनिर्बंध वाढ होत जाईल, ते वेगळेच; पण, सामान्य नागरिकांच्या मासिक-उत्पन्नात महागाईच्या दराशी मेळ खाणारी वाढ होत नसताना…कितीकाळ ही मूळ मायमराठी माणसं, महागड्या होत जाणाऱ्या ठाण्यासारख्या शहरांमध्ये टिकून रहाणार आहेत? आताच, सर्वत्र मोठ्याप्रमाणावर फुकटात घरं व त्यात भर म्हणून, सवलतीच्या दरात वाढीव चटईक्षेत्र मिळाल्यानंतर, या सामान्य आर्थिक-स्थितीतल्या मराठ्यांचं शहरातून दूर दूर पलायन सुरु आहे…आणि, हेच नेमकं ‘बिल्डर-लाॅबी’ने वर्चस्व मिळवलेल्या राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेला (म्हणजेच, ‘भांडवली-व्यवस्थे’ला) हवं असतं. “सहन होत नाही आणि सांगता येत नाही”, असा हा एकप्रकारचा सर्वसामान्यांच्या आत्म्यावरचा बलात्कारच…पण, त्याला आक्रोशाचा करुण ध्वनी नाही की, आक्रंदनाची हलवून सोडणारी स्पंदनं नाहीत, एवढंच! कारण, वरकरणी कुठे जबरदस्ती झाल्याचं दृष्टोत्पत्तीस येत नाही…सगळा मामला वरवर बेमालूमपणे मिळवलेल्या संमतीचा असतो ना?
हे असंच चालू ठेवत, बहुतांश मूळ निवासींकडून यथावकाश शहरं रिकामी केली जावीत व उपटसुंभ ‘स्मार्ट’ (स्मार्ट म्हणजे, सुशिक्षित पण, आत्यंतिक स्वार्थी) लोकं, शहराचे ‘स्वामी’ व्हावेत… अशी एकूणच सामान्यांच्या जगण्यातलं ‘स्थैर्य’, कायमचं हिरावून घेणारी ‘भांडवली-संरचना’ आहे; पण, सांगायचं कुणाला आणि ऐकणार कोण?

सिंगापूरमध्ये तळागाळातील लोकांसाठी, त्यांच्या मासिक-मिळकतीच्या जेमतेम एक ते दोन टक्क्यांपर्यंत घरभाडे असलेली छोटी घरं, तेथील सरकार उपलब्ध करुन देतं; तसेच, त्यापेक्षा अधिक चांगल्या आर्थिक-स्थितीतील जवळपास ८०% जनतेसाठी ९९ वर्षांच्या करारावर (Lease) सरकार घरांची मालकी बहाल करतं; ज्यातून, खाजगी व सुसंघटित बिल्डर-लाॅबीच्या अतिरेकी नफेखोरीला व गुन्हेगारी-दहशतीला चांगलाच चाप बसतो. न्यूयॉर्कचे महापौर म्हणून जोहरान ममदानी, याच मुद्द्यावर निवडून आलेत…सध्या फ्रान्समध्ये जी सर्वसामान्यांसाठी ‘घरटंचाई’सदृश विस्फोटक स्थिती झालीय; तशी होऊ द्यायचीय?
“अन्न, वस्त्र, निवारा”, या तीन मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या गृहबांधणीकडे आपण, अल्पावधीत भरपूर परतावा देणारी ‘गुंतवणूक’ म्हणून पाहू लागलो…साठेबाजी व काळ्या बाजाराचं महापातक ‘बिल्डरशाही’तून आपल्याकडे व्हायला लागलं. “मूलभूत-गरजेचा म्हणजेच, मूलभूत-अधिकाराचा, बक्कळ नफा देणारा एक असा ‘उद्योग’ बनवला गेला की, ज्यात गुन्हेगारी व खुनाखुनीचा चंचूप्रवेश अपरिहार्यपणे आलाच!”
घरांचा ‘काळाबाजार’ (Black Market) सुरु झाला. त्यातूनच पुढे घरांच्या किंमती आकाशाला भिडण्यास सुरुवात झाली. एखादा प्रकल्प सुरु झालं की, गरज असणाऱ्यांपेक्षा ‘गुंतवणूक’ म्हणून फ्लॅट घेणाऱ्यांचीच संख्या जास्त व्हायला लागली.
अमानुष स्वरुपाच्या ‘आर्थिक-विषमते’तून “माणसांना घरं नाहीत आणि घरांना माणसं नाहीत”, असं व्यस्त-विपरीत समीकरण, तयार होऊ लागलं. कालांतराने, गृहबांधणी, हा एक फार मोठा किफायतशीर, करचोरी सहजी रिचवणारा आणि राजकीय-दहशत व राजकीय-प्रभावाच्या आधारे कुणालाही सहजी करता येणारा प्रमुख ‘उद्योग-व्यवसाय’ बनत गेला. सोन्यापेक्षाही बरकत आणणारी ‘एक गुंतवणूक’ किंवा ‘रोज सोन्याचं अंड देणारी कोंबडी’ म्हणून, त्याकडे पाहण्यास सुरुवात झाली. “काळ्या पैशा’ने कूस बदलली…खतरनाक गुन्हेगारीशी पाट लावून तो हिरेमाणके, सोनं, शेअर्स, चलनी-नोटांपेक्षा ‘काँक्रिट’च्या भक्कम आश्रयाने वस्ती ठोकून राहू लागला!”

आज देशभर आणि जगातसुद्धा या धनदांडग्या-मुजोर ‘शेठजी-संस्कृति’ची चलती आहे; पण, त्याची सुरुवात गुजराथमध्ये नव्हे…तर, दुर्दैवानं, तुमच्याआमच्या महाराष्ट्रात झाली; ती, आमच्या घराणेबाज, खंडणी आणि टक्केवारी वसूल करणार्‍या मराठी-राजकारण्यांचा हात धरुनच. ‘महालक्ष्मी’ तर शेठजींकडे आधीपासून पाणी भरतच होती; पण, आता ‘राजलक्ष्मी’ ही त्यांच्याशी शय्यासोबत करु लागली; असं हे सगळचं अंतिमतः, मराठी-माणसाला सर्वनाशाकडे आणि अखंड गुलामगिरीकडे नेणारं आहे!
…म्हणूनच, किमान आतातरी देवादिकांमध्ये, धर्मसंप्रदायांमध्ये व फाजील-उत्सवप्रियतेत पूर्णतया अडकलेल्या व हताश-वैफल्यग्रस्त झालेल्या सामान्य मराठी-माणसाला… ‘धर्मराज्य पक्षा’च्या शहरं-उपनगरांतून प्रत्येक प्रौढ व्यक्तिमागे जास्तीतजास्त ‘एक दुकान, एक मकान’ या धोरणाचं क्रांतिकारी महत्त्व पटावं! मराठी-माणसाच्या जगण्याची कोंडी फोडणाऱ्या, या ‘संपत्तीचं फेरवाटप’ करण्याच्या धोरणाकडे, जर मराठी-माणूस दुर्लक्ष करेल; तर, स्वतःच्या हाताने आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करुन ठेवेल. मग, त्या राख-रांगोळीच्या रेखाटनातूनच भविष्यातील मराठी-दिवाळ्या, त्याला साजऱ्या कराव्या लागतील; कारण, दिवसागणिक ‘महाग’ होत जाणाऱ्या ‘शहरांनी व शहरातल्या घरांनी’, आपलं ‘दिवाळं’ तेव्हा वाजवलेलं असेल…जेव्हा, लक्ष्मीपूजनाला बाहेर, धनदांडग्या गुज्जूंचे कानठळ्या बसवणारे फटाके वाजत असतील!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (समाप्त)