गेल्या तीन-साडेतीन शतकांच्या आधुनिक जीवनशैली व ‘भांडवली-अर्थव्यवस्थे’द्वारे उद्भवलेल्या ‘जागतिक तापमानवाढी’च्या प्रलयंकारी पर्यावरणीय महासंकटाला ‘जागतिक-हवामानबदल’ असं सौम्य नामाभिधान देणं म्हणजे, “शहामृगासारखं वादळ येताच, वाळूत चोच खुपसून बसणं” होय! जोपर्यंत, “आम्ही विकासाच्या विरोधात नाही”, अशी दुटप्पी, मिळमिळीत-गुळमुळीत भाषा…राजकारण्यांकडून, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्त्यांकडून व बुद्धिमंत इतरेजनांकडून होत राहील; तोपर्यंत, हा ‘विकास नावाचा विनाश’ रोखता येणं अशक्यच!
…तो पृथ्वीच्या पाठीवर कुठे न् कुठे होत राहील आणि तेवढं तेवढं अवघ्या सजीवसृष्टीसह मानवजातीचं भविष्य धोक्यात येत राहील!
…ही अशी भयावह वस्तुस्थितीवर असताना; तुर्कस्तानातील COP-31 या ‘जागतिक पर्यावरणीय परिषदे’च्या पार्श्वभूमीवर, हे ‘सातारकर महाराज’, भाजप-संघाच्या नादाने व टक्केवारीच्या मोहाने, गुजराथी ‘टाॅरेंट’ कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी (नाव पाश्चिमात्य असलं, म्हणून ‘गुजराथी-मालकी’ थोडीच लपून रहाणार आहे?) तब्बल ३२ हजार महाकाय वृक्षांची (प्रत्यक्षात, लाखोंच्या संख्येत) कत्तल करत, कर्जतचा ‘सायसह्याद्री’ ओरबाडायला निघालेत…जेव्हा, महाराष्ट्र सरकारच, सौरऊर्जा बॅटरीत साठवून १ हजार ‘मेगावॅट-अवर’चा टप्पा गाठल्याचा मोठा दावा करतंय.
त्यातून होणार असं की, भविष्यात एकनाथराव आणि स्वतःची ५० कोटींची ‘बोली’ लावणाऱ्या त्यांच्या दोस्तमंडळींना, “काय डोंगर, काय झाडी”, पहायला साताऱ्यातल्या उघडाबोडका पडलेल्या सह्याद्रीवर नव्हे; तर, “गोवा किंवा गुवाहाटी”लाच सुरतेवरुन अधूनमधून जावं लागेलं! कारण, अंदमान-निकोबार, हसदेवचं जंगल किंवा अरवली पर्वतरांगावर पण जायची, त्यांना सोय उरलेली नसेल… विकासाच्या विकृत मनोवृत्तीतून टक्केवारी ओरपण्यासाठी व त्या मोठ्या पैशातून निवडून येण्यासाठी (EVM/SIR चे ‘मतघोटाळे’ किंवा ‘मतचौर्य’, ते तर आहेतच सोबतीला) यांच्यासारख्यांनीच, गुजराथी-भाषिक भांडवल’शहां’शी हातमिळवणी करुन, तिथला निसर्ग ओरबाडायला घेतलाय.
…म्हणे, आरे काॅलनी, ग्रेट निकोबार-हसदेव-अरवली व सह्याद्री पर्वतरांगा (त्यातला, सध्या टोरेंटो-प्रकल्पासाठी कर्जतचा सायडोंगर) वगैरे ठिकाणचे लाखो-करोडो भलेथोरले पुराणवृक्ष तोडले की, कित्येक कोटीच्या संख्येत ‘वृक्षलागवड’ केली जाणार आहे. ती झाडं किंवा ते वृक्ष, सायडोंगरीतून खोदून थेट लावले जाणार आहेत…की, वाढीसाठी तब्बल २५-३० वर्षे घेणारी इवलीशी ‘रोपं’ लावली जाणार आहेत? आणि, ती नेमकी कुठे लावली जाणार आहेत? चीनमध्ये की पाकिस्तानात?? ‘पाकिस्तान तसा आधीच झेंड्यात तरी किमान ‘हिरव्या’ रंगाचा आहे, ज्या रंगाचा भाजप-संघी कमालीचा द्वेष करतात! मग, ती कित्येक कोटी रोपं, हिरव्या पाकिस्तानऐवजी लाल चीनमध्ये लावली जाणार आहेत का? …’लाल’ चीनला ‘हिरवा’ करायचा बेत आखलाय की, काय भाजप-संघियांनी? जेणेकरुन, डोळे ‘लाल’ करुन, तो भाजप-संघियांना आणि त्यांच्या ‘NDA’तील साथीदारांना भिववायला नको??…लक्षात घ्या, विकासाची आपली ‘राक्षसी भूक’, पुढील पिढ्यापिढ्यांच्या कशी मुळावर उठलीय, ती आपली ‘महाकाय घोडचूक’ ओळखून, चीन आपली वाळवंटे, गेली काही दशके डेरेदार वृक्षांच्या शेकडो-हजारो किलोमीटर लांबीरुंदीच्या विस्तीर्ण रांगा उभारुन ‘हिरवी’ करत सुटलाय; आणि, इथे हे सगळे ‘NDA’वाले विनाशपुरुष, देशभरातील उरलीसुरली ‘हिरवाई’ नष्ट करुन, महाराष्ट्राच्या कपाळावर वाळवंटी ‘मळकट भगव्या’ रंगाचा ‘मळवट’, भरायला निघालेत…!!!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

